यशवंत – शरदाच्या सत्तेच्या चांदण्यात न्हालेल्या मराठा नेत्यांना आज आठवताहेत पंजाबराव!!

chhagan bhujbal becoming cm says  jarange patil

मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा विषय उचलून धरताना, “कुणबी नोंदी शोधा” हा मर्मावर घाव घातल्यानंतर मराठा समाजातल्या नेत्यांना विशेषतः नवनेत्यांना अचानक डॉ. पंजाबराव देशमुख आठवायला लागले आहेत. पण यशवंत – शरदाच्या सत्तेच्या चांदण्यात न्हालेल्या मराठा नेत्यांना आज आठवत आहेत पंजाबराव!!, असेच म्हणण्याची वेळ त्यांनी आणली आहे. After enjoying fruits of power by y. b. chavan and sharad pawar now maratha leaders remembers Punjabrao deshmukh for maratha reservation

कारण ज्या डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री म्हणून मोलाची कामगिरी बजावली, त्या पंजाबराव देशमुख यांना अवघा महाराष्ट्र आणि मराठा समाज केव्हाच विस्मृतीच्या गर्दीत ढकलून मोकळा झाला होता. महाराष्ट्र म्हणजे यशवंतराव, महाराष्ट्र म्हणजे शरद पवार, एवढेच समीकरण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या आणि दिल्लीतल्या महाराष्ट्राकडे बघणाऱ्या नेत्यांच्या माथी मारले गेले होते.
“हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला”, “मराठा स्ट्रॉंग मॅन” वगैरे बिरूदे, यशवंतराव आणि शरद पवारांना चिकटवली गेली. जणू काही यशवंत – शरद बोले आणि महाराष्ट्र डोले असे चित्र यशवंतराव चव्हाण आणि शरद पवारांच्या समर्थक पत्रकारांनी निर्माण करून ठेवले होते. महाराष्ट्रातून पंतप्रधान पदाचे मटेरियल असणारे दोनच नेते उदयाला आले, ते म्हणजे यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार असे परसेप्शन विद्वान मराठी पत्रकारांनी तयार केले आणि हे परसेप्शन जेव्हा फेल गेले, यशवंतराव चव्हाण आणि शरद पवारांना पंतप्रधानपद स्वतःच्या राजकीय कर्तृत्वातून खेचून घेण्यात अपयश आले, त्यावेळी “दिल्लीने महाराष्ट्रावर अन्याय केला” अशी हाकाटी यशवंत आणि शरद समर्थक पत्रकारांनी गेल्या 40-50 वर्षांमध्ये पिटली. जणू काही यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्याखेरीज महाराष्ट्रात दुसरे कर्तृत्ववान नेतेच नव्हते, अशी भावना त्यांनी सर्वत्र पसरवून ठेवली. त्या भावनेत गेल्या 50 वर्षात अख्खा महाराष्ट्र अडकवून ठेवला होता. आजही तोच प्रयत्न जसाच्या तसा सुरू आहे.पण तरी देखील मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर “कुणबी नोंदी शोधा” हा मर्मावर घाव घातल्यानंतर अनेकांना पंजाबराव देशमुख आठवले. हे पंजाबराव देशमुख मराठा समाजाने विस्मृतीच्या गर्तेत ढकलून ठेवले होते.

मग कोण होते हे पंजाबराव देशमुख आणि आत्ताच का आठवले त्यांचे नाव आणि त्यांचे राजकीय कर्तृत्व??, हा खरा सवाल आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख भारताचे पहिले कृषिमंत्री होते. 1952 ते 62 हा राजकीय काळ त्यांनी कृषिमंत्री म्हणून गाजवला होता. अत्यंत विद्वान आणि परखड व्यक्तिमत्त्वाचे पंजाबराव ऋजू भाषेत पण परखड मते व्यक्त करीत असत. ज्या काळात विदर्भात शिक्षणाचा दुष्काळ होता, त्या काळात पंजाबराव विदर्भातून पुण्याला आले फर्ग्युसन कॉलेजमधून पदवीधर झाले आणि 1920 मध्ये ते लंडनला शिकण्यासाठी गेले. तिथे त्यांनी बॅरिस्टरीची पदवी तर मिळवलीच, पण “वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास” या विषयावर डॉक्टरेट मिळवली. त्यांनी सोनार समाजातील विमला वैद्य या मुलीशी विवाह केला. त्यामुळे त्यावेळच्या मराठा समाजात प्रचंड खळबळ माजली होती. पण पंजाबरावांचे व्यक्तिमत्व इतके प्रखर होते की तो विरोध नंतर मावळावा लागला होता. विमलाबाईंनी पंजाबरावांना केवळ वैवाहिक जीवनात साथ दिली असे नाही, तर सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात देखील तितकीच तोलामोलाची साथ दिली आणि त्या स्वकर्तृत्वाने राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या. ही झाली पंजाब रावांची एकूण वैयक्तिक पार्श्वभूमी.

पण पंजाबरावांचे राजकीय आणि सार्वजनिक जीवन पारदर्शक होते. काँग्रेसचे ते कार्यकर्ते तर होतेच, पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव होता. 1952, 1957 आणि 1962 मधून ते अमरावती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून जात असत आणि तब्बल 10 वर्षे ते केंद्रीय कृषिमंत्री आणि एक वर्ष सहकार मंत्री राहिले.

आपण सगळे मराठी बोलणारे मराठी भाषक म्हणजे मराठा आहोत. मराठा ही जात नव्हे आपण कृषी करणे म्हणजे शेतकरी आहोत. म्हणजे कुणीबी आहोत ही डॉ. पंजाबराव देशमुख यांची वैचारिक भूमिका होती.

त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी समाजाला कुणबी नोंदी करण्याचा आग्रह धरला होता. हा आग्रह विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यातल्या काही शेतकऱ्यांनी मान्य केला आणि त्यांनी कुणबी नोंदी केल्या. पण पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या काही भागातल्या जमीनदारी प्रभावाच्या प्रभावाखालच्या मराठ्यांनी तो आग्रह मान्य केला नाही आणि त्या नोंदी मराठाच राहिल्या.

आज जेव्हा मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आला असताना अनेक मराठा नवनेत्यांना पंजाबराव देशमुख आठवत आहेत. पण ही आठवण देखील “सिलेक्टिव” आहे. कारण पंजाबराव देशमुख यांचे सामाजिक आणि वैचारिक योगदान हे वैदिक तत्त्वज्ञानावर आधारित राहिले. “भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद गाडा आणि सेवाभाव धरा” हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. आजचा मराठा समाज या ब्रीदवाक्यातला आशय आणि अर्थ किती समजतो आणि किती पाळतो??, हा कळीचा सवाल आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी कर्ज लवाद स्थापन करून त्याच्या कायदा करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. 1950 मध्ये पंजाबरावांनी लोक विद्यापीठाची पुण्यात स्थापना केली, पण महाराष्ट्र शासन पंजाबरावांचे नाव विसरले आणि त्याचे रूपांतर महाराष्ट्र शासनाने नंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात केले.

महाराष्ट्राने पंजाबरावांसारखी कर्तृत्ववान नेते तर दिलेच, पण त्याचबरोबर चिंतामणराव देशमुख, स. का. पाटील यांच्यासारखे केंद्रीय पातळीवर तेजाने झळकणारे अन्य जातींचे नेतेही दिले. त्यांचे कर्तृत्व जातीपातींच्या पलीकडचे होते पण महाराष्ट्र आणि मराठा समाज हे सगळे विसरला आणि यशवंत – शरदाच्या भजनी लागला. त्यातून आजची मराठा आरक्षणासारखी मोठी समस्या उद्भवली. यात मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे कोण उभे आहे??, त्यांना आंदोलनासाठी कोणती चिथावणी देत आहे??, त्याचे मूळ राजकीय कारण काय??, हे उघड गुपीत अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. कारण महाराष्ट्रातला मराठा समाज यशवंत शरदाच्या सत्तेच्या चांदण्यात गेली 50 – 60 वर्षे न्हाहून निघाला आहे.

पण मराठा समाजाच्या आरक्षण समस्येच्या काट्याचा नायटा झाला, तेव्हा ही मूळ समस्या सोडवण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या नेत्याला पुन्हा आठवावे लागले, यातच मराठा समाजाने विस्मृतीत ढकललेले त्यांचे राजकीय आणि सामाजिक कर्तृत्व किती मोठे होते, हे देखील सिद्ध होते.

After enjoying fruits of power by y. b. chavan and sharad pawar now maratha leaders remembers Punjabrao deshmukh for maratha reservation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात