नाशिक : तुरुंगवारी करू, तरीही निवडणूक लढवू!!, हा “दमदार बाणा” दाखवत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगात असलेल्या दोन नेत्यांना वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये उमेदवारी दिली आहे. दिल्लीच्या दारू घोटाळ्यातले आरोपी राज्यसभा खासदार संजय सिंह यांना आम आदमी पार्टीने परत उमेदवारी दिली आहे, तर गुजरात मधले आम आदमी पार्टीचे नेते चैत्रा वासवा यांना भरूच लोकसभा मतदारसंघातून अरविंद केजरीवालांनी उमेदवारी जाहीर केली आहे. हे चैत्रा वासवा देखील वन अधिकाऱ्यांवरील हल्ल्याच्या प्रकरणात तुरुंगात आहेत. संजय सिंह आणि चैत्रा वासवा हे तुरुंगातून अनुक्रमे राज्यसभा आणि लोकसभेच्या मैदानात उतरून निवडणूक लढवणार आहेत.
आम आदमी पार्टीने संजय सिंह आणि चैत्रा वसावा यांना परस्पर “राजकीय शहीद” घोषित करून उमेदवारी दिल्याचे मानले जाते. केंद्रातल्या आणि गुजरात मधल्या भाजपच्या राजवटीच्या काळात आम आदमी पार्टी सारख्या “सज्जन पार्टीच्या” “सज्जन” नेत्यांवर असेच अत्याचार होत राहणार, त्यांना तुरुंगवारी करावी लागणार, पण तरी देखील आम आदमी पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते बधणार नाहीत. ते निवडणुकीच्या रणमैदानात उतरून लढतीलच, हा “दमदार बाणा” अरविंद केजरीवाल आणि त्यांची आम आदमी पार्टी दाखवत आहे.
पण आम आदमी पार्टी ही केवळ संजय सिंह आणि चैत्रा वासवा यांच्यासाठी “राजकीय शहिदी” दाखवत असली, तरी प्रत्यक्षात ही बाब पूर्णपणे वेगळीच आहे. तिचे “रहस्य” पूर्णपणे वेगळेच आहे.
येथे एक लक्षात घेतले पाहिजे की, आज संजय सिंह आणि चैत्रा वासवा हे दोन नेते वेगवेगळ्या आरोपांखाली तुरुंगात आहेत. यापैकी संजय सिंह हे दिल्लीच्या दारू घोटाळ्यात तुरुंगात आहेत, पण दारू घोटाळ्यातले ते एकमेव आरोपी नाहीत. उलट दिल्लीच्या दारू घोटाळ्याचा फास आणि त्यानंतरच्या औषध घोटाळ्याचा फास आता थेट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गळ्यापर्यंत येऊन ठेपला आहे. अरविंद केजरीवाल यांचे 4 मंत्री मूळातच वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये तिहारची तुरुंगवारीच करत आहेत. केजरीवाल यांना देखील केव्हाही तुरुंगवारी करावी लागू शकते, अशी स्थिती आहे. अशा वेळी आपणच तुरुंगात गेलो तर, आपल्या विरुद्ध आम आदमी पार्टीचे बाहेर राहिलेले कार्यकर्ते बंड करतील आणि आपल्याला राजकारणातून कायमचे उठवतील, ही भीती अरविंद केजरीवालांना भेडसावत आहे.
त्यामुळे तुरुंगवारी करणाऱ्या 2 नेत्यांना आम आदमी पार्टीचे तिकीट देऊन मैदानात उतरवले की उरलेल्या तुरुंगातल्या नेत्यांना देखील आपल्याला तिकीट मिळू शकते याची लालूच दाखवता येते आणि त्याचबरोबर आपणही स्वतः तुरुंगात गेलो तरी आम आदमी पार्टीच्या नेतेपदी राहून निवडणुकीच्या रणमैदानात उतरण्याचा आपला “हक्क” अबाधित राहू शकतो, असा अरविंद केजरीवाल यांचा होरा आहे. संजय सिंह आणि चैत्रा वासवा यांना तुरुंगवासात असताना देखील तिकीट देणे याचे खरे “रहस्य” हे आहे.
केजरीवालांना आम आदमी पार्टी वरची आपली पकड कोणत्याही स्थितीत ढिल्ली होऊ द्यायची नाही. दारू घोटाळा आणि औषध घोटाळ्याच्या आरोपात तुरुंगात गेल्यानंतरही आपला निवडणुकीचा मार्ग मोकळा करून घेण्याचा हा खरा प्रकार आहे. किंबहुना ही अरविंद केजरीवालांची खरी राजकीय खेळी आहे!!… संजय सिंह आणि चैत्र वासवा यांची “राजकीय शहीदी” ही दिखाऊ आहे, खरे “राजकीय शहीद” तर अरविंद केजरीवालांना व्हायचे आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App