वृत्तसंस्था
इंफाळ : मणिपूरमध्ये ( Manipur ) म्यानमारमधून 900 कुकी दहशतवाद्यांची घुसखोरी उघडकीस आली आहे. राज्याचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी शुक्रवार, 20 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या तीन-चार दिवसांपासून दहशतवाद्यांच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे.
सुरक्षा सल्लागाराच्या म्हणण्यानुसार, घुसखोरी करणारे अतिरेकी ड्रोन, बॉम्ब, प्रोजेक्टाइल, क्षेपणास्त्रे आणि गनिमी युद्धाचा वापर करत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. ते 30-30 लोकांच्या गटात असून वेगवेगळ्या भागात लपून बसले आहेत.
कुलदीप सिंह म्हणाले, 28 सप्टेंबरच्या सुमारास अतिरेकी मेईतेई गावांवर हल्ला करू शकतात. हल्ल्याच्या भीतीने चुराचंदपूर, तेंगनौपाल, उखरुल, कमजोंग आणि फेरजौलसह अनेक जिल्ह्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
मणिपूरमध्ये 3 मे 2023 पासून कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये आरक्षणावरून हिंसाचार सुरू आहे. सरकारी आकडेवारीनुसार, हिंसाचारात आतापर्यंत 237 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 60 हजारांहून अधिक लोकांनी आपली घरे सोडली आहेत.
इंफाळमध्ये मंत्र्यांच्या स्वीय सहायकाचे अपहरण
दुसरीकडे, शुक्रवारी इंफाळ पूर्व जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी मणिपूरचे मंत्री एल. सुसिंदरो यांच्या स्वीय सहाय्यकाचे त्यांच्या राहत्या घराजवळून अपहरण करण्यात आले होते. सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली.
43 वर्षीय सारंगथेम सोमरांद्रो असे स्वीय सहायकाचे नाव आहे. घटनेच्या वेळी ते त्यांच्या कार्यालयीन कामासाठी जात होते. अपहरणकर्त्यांनी अनेक गोळ्याही झाडल्या, असे पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळावरून पाच रिकामी काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अपहरण झालेल्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. त्याच्या अपहरणामागचे कारण समजू शकलेले नाही. तसेच कोणत्याही बंडखोर गटाने या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App