वृत्तसंस्था
नवी दिल्ली : 5 डिसेंबर 2023 पर्यंत लोकसभा निवडणूक 2024 ची सेमी फायनल कंप्लिट झाली असेल. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या सर्व तारखा निवडणूक आयोगाने जाहीर करून लोकसभा निवडणूक 2024 ची सेमी फायनल सूचित केली. वेब कास्टिंग मतदान हे या 5 राज्यांच्या निवडणुकांचे वेगळे वैशिष्ट्य ठरणार आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्यांमध्ये नियोजित वेळेनुसार विधानसभा निवडणुका होत आहेत. याच्या मतदानाच्या आणि मतमोजणीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जाहीर केल्या.
त्यानुसार मिझोराम मध्ये 7 नोव्हेंबर, छत्तीसगड मध्ये 7 आणि 17 नोव्हेंबर मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबर, राजस्थानात 23 नोव्हेंबर, तर तेलंगणात 30 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होईल. 5 राज्यांपैकी फक्त छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबर या दोन टप्प्यांमध्ये मतदान होईल. बाकी सर्व राज्यांमध्ये वर उल्लेख केलेल्या एकाच तारखेला मतदान होईल. सर्व राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी 3 डिसेंबरला सुरू होईल आणि 5 डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपवली जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
या सर्व राज्यांमध्ये निवडणुका जाहीर केल्याबरोबर आचारसंहिता लागू झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, या राज्यांमध्ये एकूण 16.14 कोटी मतदार आहेत. यामध्ये ८.२ कोटी पुरुष आणि ७.८ कोटी महिला मतदार असतील. यावेळी 60.2 लाख नवीन मतदार प्रथमच मतदान करणार आहेत.
8192 मतदान केंद्रांची महिलांकडे सूत्रे
पाच राज्यांतील 679 विधानसभा जागांसाठी 1.77 लाख मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
60.2 लाख नवीन मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्यांचे वय १८ ते १९ या दरम्यान आहे. 15.39 लाख मतदार असे आहेत ज्यांना 18 वर्षे पूर्ण होत आहेत.
17734 मॉडेल बूथ आणि 621 मतदान केंद्रे दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे व्यवस्थापित केली जातील. 8192 मतदान केंद्रांवर महिला कमान सांभाळतील.
1.01 लाख मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग होणार आहे. आदिवासींसाठी खास बूथ असतील. 2 किलोमीटर परिसरात मतदान केंद्रे असतील.
छत्तीसगड-ओडिशा सीमेवरील चांदमेता आणि जगदलपूर बस्तरमधील तुलसी डोंगरी हिल भागात पहिल्यांदाच मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. पूर्वी गावकऱ्यांना मतदानासाठी 8 किलोमीटर पायपीट करून बूथपर्यंत जावे लागत होते.
राजस्थानमधील माझोली बारमेरमध्ये बूथ 5 किलोमीटर अंतरावर होते. 2023 च्या निवडणुकीसाठी 49 मतदारांसाठी नवीन बूथ बांधण्यात आले आहे.
सी व्हिजिल ॲपच्या माध्यमातून निवडणुकीच्या कामांवर लक्ष ठेवले जाणार आहे. ॲपच्या माध्यमातून लोकांना तक्रार करता येणार आहे.
कोणत्या राज्यात किती मतदार?
मध्य प्रदेश : 5.6 कोटी, राजस्थान : 5.25 कोटी, तेलंगणा : 3.17 कोटी, छत्तीसगड : 2.03 कोटी, मिझोरम 8.52 लाख
2018 मध्ये 11 डिसेंबरला निकाल
2018 मध्ये राजस्थानमध्ये 7 डिसेंबर, मध्य प्रदेशात 28 नोव्हेंबर, तेलंगणात 7 डिसेंबर आणि मिझोराममध्ये 18 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झाले होते, तर छत्तीसगडमध्ये 12 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यांत मतदान झाले होते. 11 डिसेंबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर झाले होते. यंदा ही सर्व प्रक्रिया 8 दिवस अलीकडे आली आहे.
5 राज्यांमधली पक्षनिहाय स्थिती
मध्य प्रदेशात गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर बरेच राजकीय नाट्य रंगले होते. निवडणूक निकालात काँग्रेसला भाजपपेक्षा पाच जागा जास्त मिळाल्या होत्या. काँग्रेसला 114, तर भाजपला 109 जागा मिळाल्या होत्या. बसपाने दोन तर सपाने एक जागा जिंकली. युती करून काँग्रेसने बहुमताचा 116 आकडा गाठला आणि कमलनाथ राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. कमलनाथ यांचे सरकार फक्त पंधरा महिने टिकले त्यानंतर शिवराज सिंह चव्हाण मुख्यमंत्री झाले ते सध्या राज्याचे मुख्यमंत्रीच आहेत.
काँग्रेसचे सरकार केवळ 15 महिने टिकू शकले. प्रत्यक्षात काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिला. यात सहा मंत्र्यांचा सहभाग होता. सभापतींनी मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले. राजीनाम्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आले. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, न्यायालयाने कमलनाथ सरकारला फ्लोअर टेस्ट करण्याचे आदेश दिले. पण फ्लोअर टेस्टपूर्वी कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. नंतर भाजपने बंडखोर आमदारांचा समावेश करून 127 आमदारांची संख्या वाढवली आणि सरकार स्थापन केले. शिवराजसिंह चौहान चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले.
राजस्थानमध्ये नियमित अदलाबदल
नियमित अदलाबदल हे राजस्थानचे वैशिष्ट्य राहिले आहे गेल्या 25 वर्षात भाजप आणि काँग्रेस यांच्याकडे आलटून-पालटून सत्ता आली आहे.राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. १९९ जागांवर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या होत्या. एक जागा मिळालेल्या काँग्रेसला येथे आरएलडीने पाठिंबा दिला. अशा प्रकारे काँग्रेसने 100 जागा मिळवून सरकार स्थापन केले.
नंतर, 2019 मध्ये झालेल्या रामगढ जागेच्या निवडणुकीतही काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आणि काँग्रेसला 101 जागांवर नेले. काँग्रेसने अशोक गेहलोत यांना राज्याचे मुख्यमंत्री केले.
छत्तीसगडमध्ये 15 वर्षांनंतर काँग्रेसचे सरकार
छत्तीसगडमध्ये 2018 च्या विधानसभा निवडणुकीत 15 वर्षांनी काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली. 90 जागांवर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसला दोन तृतीयांश बहुमत मिळाले. भाजपला केवळ 15 तर काँग्रेसला 68 जागा मिळाल्या. नंतर काही आमदारांनी पक्ष बदलला.
सध्या छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे ७१ आमदार आहेत, भाजपचे १३ आमदार आहेत, बसपाकडे दोन, जनता काँग्रेस छत्तीसगड पक्षाचे तीन आमदार आहेत आणि एक जागा रिक्त आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल आहेत.
2018 मध्ये तेलंगणा विधानसभेत भाजपला फक्त 1 जागा
तेलंगणात 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ 1 जागा मिळाली होती. सध्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पक्ष TRS (पक्षाचे नाव तेलंगणा राष्ट्र समिती वरून बदलून 2022 मध्ये भारत राष्ट्र समिती असे करण्यात आले) यांना सर्वाधिक 88 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला १९ जागा मिळाल्या.
मिझोराममध्ये MNF 10 वर्षांनंतर परतले
मिझोराममध्ये 2018 च्या विधानसभा निवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंट (MNF) 10 वर्षांनी परतले. एकूण 40 जागांवर झालेल्या निवडणुकीत एमएनएफला 26 तर काँग्रेसला पाच जागा मिळाल्या. याशिवाय झोराम पीपल्स मुव्हमेंटला आठ जागा मिळाल्या असून एक जागा भाजपच्या वाट्याला गेली आहे. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट पक्षाने झोरमथांगा यांना मुख्यमंत्री केले.
विधानसभेच्या सद्यस्थितीबद्दल बोलायचे तर मिझो नॅशनल फ्रंटकडे सध्या २८ आमदार आहेत. काँग्रेसचे पाच, झोराम पीपल्स मूव्हमेंटचे एक, भाजपचे एक आणि पाच अपक्ष आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App