अडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून??; कराडातच नाही, तर बारामतीत कुठून?, हे शीर्षक जरा विचित्र वाटेल, पण ते विचित्र असले तरी ते निश्चित अर्थवाही आहे, हे पुढे लिहिलेल्या मुद्द्यावरून स्पष्ट होईल. Not only sharad pawar but also his political guru y b chavan could make it only double digit mlas in maharashtra assembly elections in 1978 and 1980 on his own
यातला महत्त्वाचा मुद्दा असा, की नेहमीच शरद पवारांच्या स्वबळावर आमदार आणि खासदार निवडून आणण्याच्या क्षमतेवर चर्चा होते. पवारांना स्वबळावर महाराष्ट्रात स्वतःची सत्ता कशी मिळवता आली नाही, याची चर्चा, विश्लेषण, मखलाशी होते. त्याची आकडेवारी सादर केली जाते. पवारांच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत काँग्रेस सोडून वेगवेगळ्या पक्षांच्या आमदारांची संख्या 60 च्या आसपास राहिल्याचे सांगितले जाते आणि ती वस्तूस्थिती देखील आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वोच्च आमदार संख्या 71 आहे, तर सर्वात कमी आमदार संख्या 42 आहे. पवारांच्या नेतृत्वाची मर्यादा अशा प्रकारे स्पष्ट केली जाते आणि ती वस्तुस्थितीला धरूनही आहे.
पण पवार ज्या राजकीय गुरूंचे चेले आहेत, त्या राजकीय गुरूंचे स्वबळाचे स्वतंत्र कर्तृत्व हा कधीच महाराष्ट्राच्या दृष्टीने चर्चेचा विषय राहिला नाही. अर्थात हेही तितकेच खरे की पवारांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांच्या दीर्घ राजकीय कारकीर्दीत त्यांना स्वबळावर निवडणूक लढविण्याची वेळ फक्त दोनदाच आली. त्यापूर्वी आणि त्यानंतर म्हणजे 1978 आणि 1980 या दोन निवडणुका सोडल्या, तर यशवंतरावांनी कायम काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात राहून महाराष्ट्राचे नेतृत्व केले आणि 1980 नंतर त्यांचे नेतृत्व टप्प्याटप्प्याने अस्तंगत होत गेले. पण ज्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी काँग्रेसचा मुख्य प्रवाह सोडला आणि स्वबळाची कास धरली, त्यावेळी खुद्द यशवंतराव चव्हाणांची ताकद नेमकी किती होती??, याची आकडेवारी तपासली, तर यशवंतराव चव्हाणांच्या स्वबळाची मर्यादा देखील लक्षात येते.
1978 मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यापूर्वी 1977 मध्ये इंदिरा गांधींचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला आणि देशात जनता पक्षाची सत्ता आली. यशवंतराव चव्हाण काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येऊन लोकसभेतले विरोधी पक्ष नेते बनले, पण दरम्यानच्या काळात एवढ्या मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या, की यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी इंदिरा गांधींचे नेतृत्व झुगारून देऊन आपणच मूळ काँग्रेस आहोत, असा दावा करून संघटना काँग्रेस किंवा रेड्डी काँग्रेस काढली. त्यांची सर्व राजकीय आणि सामाजिक तत्वे काँग्रेसनिष्ठच राहिली.
ब्रह्मानंद रेड्डी आणि यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या काँग्रेस मधून इंदिरा गांधी यांना काढून टाकले आणि यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र पुरती तरी स्वबळावर स्वतंत्र वाटचाल सुरू केली आणि तेवढ्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आल्या. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत 25 फेब्रुवारी 1978 रोजी मतदान झाले. या निवडणुका इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस यांनी स्वतंत्रपणे लढविल्या. यावेळी रेड्डी काँग्रेसमध्ये स्वतः यशवंतरावांचे नेतृत्व होतेच, पण त्यांच्याबरोबर वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यासारखे तगडे नेते देखील होते. पण यशवंतरावांचे स्वबळाचे नेतृत्व महाराष्ट्रात किती मर्यादित होते, हे 1978 च्या विधानसभा निवडणुकीत सिद्ध झाले. यशवंतराव चव्हाणांना महाराष्ट्रात स्वबळावर ट्रिपल डिजिट देखील गाठता आला नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली रेड्डी काँग्रेसला 24 % मते मिळवून फक्त 69 आमदार निवडून आणता आले, तर इंदिरा काँग्रेसला 22 % मते मिळवून 62 आमदार निवडून आणता आले. 1978 मध्ये यशवंतरावांच्या नेतृत्वाची डबल डिजिटची मर्यादा स्पष्ट झाली.
1978 मधल्या शरद पवारांच्या बंडा विषयी महाराष्ट्र मध्ये नेहमीच उलट सुलट चर्चा राहिली. शरद पवारांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि सरकार बनविले अशी चर्चा आजतागायत सुरू आहे. त्यावर खुलासे – प्रतिखुलासे आणि दावे – प्रतिदावे सातत्याने होत असतात, पण यशवंतराव चव्हाण यांना आपल्या बाजूने वसंतदादा पाटील आणि शरद पवारांसारखे तगडे नेते असताना देखील रेड्डी काँग्रेसकडून आमदारांची शंभरी देखील गाठता आली नव्हती, या वस्तुस्थितीवर कधी चर्चा होत नाही.
1978 मध्ये जनता पक्षाची लाट टिकून होती. त्यामुळे महाराष्ट्रात जनता पक्षाने शंभरी गाठणे अपेक्षित होते, पण प्रत्यक्षात त्यांची गाडी बरोबर 99 आमदारांवर अडकली होती. त्यामुळे बहुमत कुणालाच नाही. सगळेच पक्ष आणि त्यांची नेतृत्व तोकडी ठरली होती, पण त्यातही यशवंतरावांचे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री जाण्यासारखे उत्तुंग नेतृत्व महाराष्ट्रात स्वबळावर मात्र फक्त 69 आमदार निवडून आणू शकले होते, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.
1980 च्या निवडणुकीत, तर यशवंतरावांच्या नेतृत्वाच्या मर्यादेचा, तर तळ गाठला होता. 1980 च्या विधानसभा निवडणुकीत 21 मे रोजी मतदान झाले आणि रेड्डी काँग्रेसला फक्त 16 % मते मिळून 47 आमदार निवडून आणता आले, पण त्या निवडणुकीत इंदिरा गांधींची एवढी जबरदस्त लाट होती, की महाराष्ट्रात त्यांच्या बाजूने यशवंतराव चव्हाण नसताना देखील इंदिरा काँग्रेसचे तब्बल 186 आमदार निवडून आले होते.
त्यावेळी वसंतदादा पाटील यांच्यासारखा तगडा नेता बाजूला सारून इंदिरा गांधींनी अब्दुल रहमान अंतुले या मुसलमान नेत्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसविले होते. 1980 ची निवडणूक यशवंतरावांसाठी राजकीय कुठाराघात ठरली. त्यांचे स्वबळाचे स्वप्न भंगले आणि तब्बल वर्षभर तंगवत ठेवल्यानंतर इंदिरा गांधींनी त्यांना 1981 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश दिला. महाराष्ट्रातल्या एकापेक्षा एक तगड्या नेत्यांच्या राजकीय कर्तृत्वाच्या स्वबळाची ही मासलेवाईक कहाणी आहे.
यात हिंदुत्ववादी नेते बाळासाहेब ठाकरे किंवा प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचा तोपर्यंत विषयच आला नव्हता, पण या तिन्ही नेत्यांचे स्वबळही तितकेच मर्यादित राहिले. त्यातल्या त्यात बाळासाहेब ठाकरे थोडे सुदैवी. कारण त्यांनी मांडलेला हिंदुत्ववाद हा प्रादेशिक मर्यादेत न राहता, तो देशव्यापी झाला आणि बाळासाहेबांचा ब्रँडही देशव्यापीच ठरला.
या राजकीय पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या नेतृत्वाच्या मर्यादा लक्षात घेता, वर शीर्षक दिल्याप्रमाणे कराडातच पुरेसे तगडे स्वबळ नव्हते, तर ते स्वबळ बारामतीत तरी कुठून येणार??, याचा आत्तापर्यंत कोणी विचार केला नाही, तो आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक आयोगात भवितव्य ठरण्याच्या दिवशी केला इतकेच!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App