“पाटलांच्या पोरांना लग्नाआधी बाळं”; राजन पाटलांवर महिला आयोगाची कारवाई कधी??


विशेष प्रतिनिधी

मुंबई : काही प्रकरणांमध्ये तत्परता दाखवून महिलांचा अपमान झाल्याच्या नोटिसा अनेकांना पाठवणाऱ्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या तटस्थतेवर ठळक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिला पत्रकाराला केवळ, “तू कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो,” असे म्हणणाऱ्या संभाजी भिडे गुरुजींना महिलांचा अपमान झाल्याची नोटीस पाठवणाऱ्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची राजन पाटलांवर मात्र कारवाई कधी होणार??, असा सवाल आता महाराष्ट्रातून विचारला जात आहे. When will the Women’s Commission take action on Rajan Patal?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध शिंदे – फडणवीस सरकार मधले मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिव्या शेरेबाजी केल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी त्यांना नोटीस पाठवली. त्यानंतर संभाजी भिडे गुरुजींनाही नोटीस पाठवली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटलांनी टाकळी सिकंदरच्या सभेत, “आम्ही पाटील आहोत. पाटलांना लग्नाआधी बाळं होतात,” असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सोयीस्कर मौन बाळगलेच. पण राज्य महिला आयोगाने देखील राजन पाटलांचे वक्तव्याची दखल घेतली नाही, की त्यांना महिलांच्या अपमान केल्याची नोटीसही पाठवली नाही.

सध्या राष्ट्रवादीला जितेंद्र आव्हाडांचा मुद्दा पेटवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आपोआपच राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय चतुराईने राजन पाटलांचा वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा बासनात गुंडाळून टाकला आहे. पण राज्य महिला आयोग अध्यक्षपदी जरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर असल्या तरी महिला आयोग ही काही राष्ट्रवादीशी संलग्न संस्था नव्हे, तरी देखील अब्दुल सत्तार आणि संभाजी भिडे गुरुजींना महिलांचा अपमान केल्याच्या नोटीसा पाठवणाऱ्या महिला आयोगाने राजन पाटलांना मात्र नोटीस पाठवलेली नाही.

पक्षपाताची उदाहरणे

रूपाली चाकणकरांच्या नेतृत्वाखालील राज्य महिला आयोगाच्या पक्षपाताचे हे काही एकमेव उदाहरण नाही. अशी अनेक उदाहरणे गेल्या अडीच वर्षात घडले आहेत त्याची जंत्री फार मोठी आहे.

अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध शिवराळ भाषा वापरल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी त्यांना कारवाईची नोटीस पाठवली. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले.

मात्र, रूपाली चाकणकरांच्या संदर्भात शिवसेनेच्या उपनेत्या, प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी तक्रार केली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील आपल्या विरुद्ध शिवराळ भाषा वापरली होती. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी आपण रूपाली चाकणकर यांना दोनदा फोन केला. परंतु त्यांनी आपला फोन उचलला नाही आणि गुलाबराव पाटलांवर कारवाई देखील केली नाही, अशी तक्रार सुषमा अंधारे यांनी केली आहे. एक प्रकारे त्यांनी राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवरच ठळक प्रश्नचिन्ह लावले आहे.

रूपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष होत्या. त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राहून ज्या कारवाया केल्या आहेत, पण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर कारवाया केल्या नसल्याचे दिसून आले आहे. त्यात आता माजी आमदार राजन पाटलांची भर पडली आहे.

महिला पत्रकार, कुंकू आणि भिडे गुरुजी

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी एका महिला पत्रकाराला कुंकू लावण्याची सूचना केली म्हणून त्यांना महिलांचा अवमान केल्याची नोटीस रूपाली चाकणकर यांनी तातडीने धाडली. इतकेच नव्हे, तर त्यांनी पहिल्या नोटीशीला उत्तर दिले नाही म्हणून दुसरे नोटीस धाडून एकतर्फी कारवाई करण्याचा इशाराही दिला. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्या विरोधात शिवराळ भाषा वापरणाऱ्या मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले. राज्य महिला आयोगाने अतिशय तत्परतेने ही कारवाई केली. परंतु गेल्या 2.5 वर्षांमध्ये राज्य महिला आयोगाकडे अनेक महिलांनी ज्या तक्रारी केल्या, त्याची साधी दखलही महिला आयोगाने घेतली नसल्याचे दिसून आले आहे.

 कंगना विरुद्ध शिवराळ भाषा

कंगना राणावत हिने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात टीकास्त्र सोडल्यानंतर तिला नोटिसा पाठवल्या. पण त्याच कंगना राणावत विरुद्ध संजय राऊत यांनी अनेकदा शिवराळ भाषा वापरली. त्यांना एकही नोटीस गेली नाही. इतकेच नाही, तर संजय राऊत यांनीच स्वप्ना पाटकर यांच्या विरोधातही शिवराळ भाषाच वापरली होती. स्वप्ना पाटकर यांनी आपला छळ होत असल्याची तक्रार महिला आयोगाकडे केली. पण त्याही वेळी राऊतांना महिला आयोगाने नोटीस पाठवली नाही अथवा पोलिसांना कारवाईचे पत्र लिहिले नाही.

नवनीत राणांचा अवमान

मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांनी खासदार नवनीत राणा यांच्यासारख्या घाणेरड्या सिनेमात काम करणाऱ्या नटीवर आम्ही घरंदाज बायका बोलत नसतो, असे वक्तव्य केले होते. त्या संदर्भात देखील तक्रार होऊन महिला आयोगाने त्या तक्रारीची दखलही घेतली नाही अथवा किशोरी पेडणेकर यांना नोटीस पाठवली नाही. किशोरी पेडणेकर यांनी फक्त नवनीत राणा यांच्या विरोधातच आक्षेपार्ह वक्तव्य केले होते असे नाही, तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांच्या विरोधातही बांबू घालू वगैरेची भाषा वापरली होती. परंतु पेडणेकरांवर महिला आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही.



करुणा शर्मा मुंडे यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष

महाविकास आघाडीतली मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्यांची पत्नी करुणा शर्मा मुंडे यांनी देखील महिला आयोगाकडे आपल्या होत असलेल्या छळा विरोधात वारंवार तक्रारी केल्या. त्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. परंतु, महिला आयोगाने करुणा शर्मा मुंडे यांच्या तक्रारीची दखल घेऊन धनंजय मुंडे यांना नोटीस पाठवली नाही अथवा त्यांच्यावरही कोणती कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला नाही.

केतकी चितळे विरुद्ध अश्लील शेरेबाजी

केतकी चितळे या अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिलेले विडंबन काव्य पोस्ट केले पोलिसांनी तिच्यावर कारवाई केली परंतु तिला पोलीस तिच्या घरातून घेऊन जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्त्यांनी तिच्यावर शाई फेकली. सोशल मीडियात तिच्यावर अश्लील शेरेबाजी केली. तिने देखील याविषयीची तक्रार दिली असूनही महिला आयोगाने त्या तक्रारीची दखल घेतली नाही.

कारवाई फक्त सुप्रिया सुळे प्रकरणात

अशा असंख्य तक्रारी महिला आयोगाकडे पडून असताना त्यावर महिला आयोग तत्परतेने कारवाई करताना दिसला नाही. परंतु, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अब्दुल सत्तारांनी शिवराळ टिपण्णी केल्यानंतर त्यांच्यावर कारवाईची तत्परता दाखवली. त्याचबरोबर भिडे गुरुजींनी एका महिला पत्रकाराला तू कुंकू लाव. मग मी तुझ्याशी बोलतो, असे म्हटल्यानंतर महिला पत्रकाराचा अवमान झाल्याचा दावा करून त्यांनाही सलग दोन नोटीसा पाठवल्या. या तत्परतेवरून महिला आयोगाच्या तटस्थतेवर ठळक प्रश्नचिन्ह लागले आहे.

विजया रहाटकर यांनी केल्या होत्या तटस्थ राहून भाजप आमदारांवर कारवाया

याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत विजया रहाटकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना त्यांनी तटस्थ राहून कायदेशीर कारवाया केल्या यामध्ये भाजपच्या दोन आमदारांचाही समावेश होता. भाजपचे आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात मुली पळवून नेण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. त्या मुद्द्यावर राम कदम यांना त्यावेळी महिला आयोगाने नोटीस पाठवून आयोगासमोर बोलून घेऊन माफी मागायला लावली होती. त्याचबरोबर भाजपचे दुसरे आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील सैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह उद्गार काढले होते. सैनिक सीमेवर पहारा देत असताना इकडे त्यांना मुले कशी होतात?, असे आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून आमदार परिचारक यांना देखील महिला आयोगाने नोटीस पाठवून आयोगासमोर बोलून घेतले होते आणि त्यांना माफी मागायला लावली होती.

या पार्श्वभूमीवर सध्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर आणि निवडक पद्धतीने कारवाया करून नेमके त्यातून राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वगळण्याच्या मुद्द्यावरून त्यांच्या तटस्थतेवर ठळक प्रश्नचिन्ह लागले आहे.

When will the Women’s Commission take action on Rajan Patal?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात