महाविकास आघाडीचे ओझे उतरवून उद्धव ठाकरे बाजूला; भाजपशी संबंधांवरून शरद पवार मात्र संशयाच्या घट्ट जाळ्यात!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात आजचा प्रजासत्ताक दिन आणि गेल्या दोन दिवसांमध्ये राजकीय घडामोडींचा बारकाईने आढावा घेतला, तर एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे शिवसेनेवरचे ओझे बाजूला काढून ठेवून स्वतः बाजूला झाले आहेत. त्याच वेळी फडणवीस – अजितदादा शपथविधीच्या मुद्द्यावरून शरद पवार मात्र संशयाच्या जाळ्यात पुन्हा एकदा अडकले आहेत!! Uddhav Thackeray made a safe passage out of MVA, but sharad Pawar trapped in by prakash Ambedkar over the issue of Pawar – BJP relations

प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करून उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेसह अन्य निवडणुकांमध्ये स्वतःचा स्वतंत्र मार्ग चोखाळला आहे. यातून जागा वाटपाची गणिते काय तयार व्हायची ते होवोत, पण एक बाब मात्र निश्चित झाली आहे, ती म्हणजे जे जागावाटप होईल ते महाविकास आघाडी म्हणून न होता, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्येच होईल. त्यामुळे अर्थातच दोन्ही पक्षांना मुंबई महापालिकेच्या जागा वाटपात एकमेकांच्या वाट्याला भरपूर जागा येऊ शकतील. म्हणजेच दोन्ही पक्षांसाठी मुंबई महापालिका आणि अन्यत्र देखील स्वतःची “पॉलिटिकल लेव्हल प्लेइंग फिल्ड” तयार झाली आहे.

त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेतून निघून गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर संघटनात्मक पातळीवर प्रचंड मोठे आव्हान निर्माण झाले आहे हे खरेच. ते नाकारण्यात मतलब नाही. पण त्याच वेळी एक वस्तुस्थिती देखील समोर आली आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरे यांना शिंदे गट बाजूला झाल्यामुळेच निवडणुकीमध्ये “अँटी इन्कम्बन्सी” हा फॅक्टर नगरसेवक आणि आमदार यांच्या पुरता तरी भेडसावणार नाही. उलट स्वतःच्या मर्जीने त्यांना हवे तसे तिकीट वाटप करून ते उमेदवार निवडून आणता येऊ शकतात. त्याच वेळी हे प्रथमच निवडून येणारे उमेदवार असल्याने फार मोठी ताकद लावावी लागेल हे खरे. पण त्यांना राजकीय दृष्ट्या सांभाळून ठेवणे देखील फारसे कठीण जाण्याची शक्यता नाही. कारण जी फूट पडायची आहे, ती शिवसेनेत पडून गेली आहे!!

ही एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे ओझे उतरवून ठेवताना स्वतःची राजकीय सोय बघितली आहे. शिवसेनेला जी मते कमी पडू शकतील, ती टक्केवारी वंचितच्या रूपाने भरून काढण्याचा प्रयत्नही चालवला आहे. त्याला यश किती मिळेल हे येणाऱ्या निवडणुका सांगतील. पण त्याच वेळी प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा एकाच वेळी भाजपला आणि महाविकास आघाडीतल्या उपद्रवमूल्य जास्त असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला अंगावर घेणारा नेता आज उद्धव ठाकरे यांच्या बाजूने येणे ही त्यांची जमेची बाजू ठरली आहे!!

प्रकाश आंबेडकरांनी याची चुणूक दाखवलीच आहे. शरद पवार यांच्या भोवती भाजपशी संबंधांचे संशयाचे जाळे घट्ट विणण्यात त्यांना यश आले आहे. शरद पवार – पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे मोदींचे फारसे बिघडले नाही. पण पवारांभोवती संशयाचे वातावरण कायम राहिले. त्यात आता फडणवीस – अजितदादा शपथविधीच्या निमित्ताने जयंत पाटलांनी देखील भर घातली आहे. फडणवीस – अजितदादा शपथविधी ही पवारांचीच खेळी असल्याचे सांगून त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या मताला दुजोरा दिला आहे. पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असताना जयंत पाटलांनी शरद पवारांभोवतीचे संशयाचे जाळे घट्ट केले आहे, ही विशेष नोंद घेण्यासारखी बाब आहे. या मुद्द्यावर अजून अजितदादा बोललेले नाहीत किंवा फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही हा भाग अलहिदा!!

पवारांच्या बचावासाठी चार नेते

पण प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अमोल मिटकरी, जितेंद्र आव्हाड या चार नेत्यांना शरद पवारांचा बचाव करणारी भूमिका घेऊन प्रतिक्रिया व्यक्त करावी लागली. यातच बऱ्याच गोष्टी राजकीय दृष्ट्या अधोरेखित झाल्या आहेत. येथेच नेमके शरद पवार यांच्या भोवतीचे संशयाचे जाळे घट्ट झाले आहे.

शिंदेंच्या ठाण्यात ठाकरेंचा हल्लाबोल

दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी प्रजासत्ताक दिनाच्या आजच्या मुहूर्तावर एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाण्यात जोरदार हल्लाबोल केला आहे. याचा अर्थ त्यांना मुंबई पलिकडे देखील जाऊन एकनाथ शिंदे यांचे बंड वेगळ्या प्रकारे मोडीत काढायचे आहे. यासाठी जेवढी होईल, तेवढी ते प्रकाश आंबेडकरांची मदत घेणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या दोन दिवसातल्या घडामोडींच्या या “बिटवीन द लाईन्स” आहेत.

शिंदेंच्या बालेकिल्लात आव्हानाची भाषा

शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर आणि सत्तांतरानंतर शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे प्रथम गुरुवारी ठाण्यात गेले होते. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. याच बालेकिल्ल्यात जाऊन उद्धव ठाकरेंनी थेट बंड केलेल्या शिंदे गटाला आव्हान दिले आहे. लवकरात लवकर ठाण्यात एक प्रचंड मोठी जाहीर सभा घेऊन समाचार घेणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. जैन समाजाच्या मुनींचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे गुरुवारी ठाण्यात पोहोचले होते. त्यावेळी जैन बांधवांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला.

नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘महाराष्ट्रात निष्ठेच्या पांघरुणाखाली हे जे काही लांडगे घुसले गेले ते विकले गेले. यामुळे महाराष्ट्रासोबत शिवसेनेची बदनामी झाली आहे. गेले ते जाऊ द्या, त्यांच्याबद्दल दुःख व्यक्त करण्यात काही अर्थ नाहीये. पण जे अस्सल निखाऱ्यासारखे, धगधगणारे शिवसैनिक शिवसेनेसोबत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि माझ्यासोबत राहिलेत. हे निखारेच उद्या महाराष्ट्रात मशाल पेटवणार आहेत. अन्यायावरती लाथ मारा हे तर शिवसैनिकांचं ब्रीद वाक्य आहेच. पण त्याचबरोबरीनं शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला शिकवलं की, ८० % समाजसेवा २० % राजकारण. जे अस्सल निष्ठावंत शिवसैनिक ते इकडे आहेत. बाकी जे विकाऊ होते ते विकले गेले. काय भावानं विकले गेले हे काही सांगण्याची गरज नाही. लवकरात लवकर ठाण्यामध्ये एक प्रचंड आपली जाहीरसभा घेणार म्हणजे घेणारचं. आणि त्यावेळेला कोणाचा काय तो समाचार घ्यायचा आहे तो घेईन!!

आता उद्धव ठाकरे म्हटल्याप्रमाणे ठाण्यात प्रचंड मोठी जाहीर सभा केव्हा घेणार?? ती कशी घेणार आणि त्याचा परिणाम काय होणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!!

Uddhav Thackeray made a safe passage out of MVA, but sharad Pawar trapped in by prakash Ambedkar over the issue of Pawar – BJP relations

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात