साहित्य अकादमीचा प्रादेशिक भाषांसाठीचा मुख्य पुरस्कार कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे अधीक्षक, साहित्यिक डॉ. किरण गुरव यांना, युवा लेखक प्रणव सखदेव यांना युवा साहित्य पुरस्कार, तर संजय वाघ यांना बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिन्ही साहित्यिकांचे अभिनंदन केले आहे. Sahitya Akademi Award announced for Kiran Gurav, Pranav Sakhdev, Sanjay Wagh, congratulated by CM Thackeray, Deputy CM Ajit Pawar
वृत्तसंस्था
मुंबई : साहित्य अकादमीचा प्रादेशिक भाषांसाठीचा मुख्य पुरस्कार कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे अधीक्षक, साहित्यिक डॉ. किरण गुरव यांना, युवा लेखक प्रणव सखदेव यांना युवा साहित्य पुरस्कार, तर संजय वाघ यांना बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिन्ही साहित्यिकांचे अभिनंदन केले आहे.
मराठी भाषा अभिजात आहेच. या आपल्या मायमराठीत वैविध्यपूर्ण साहित्यकृतींमधून आणखी समृद्ध प्रवाह आणण्याचे महत्त्वाचे काम लेखक, साहित्यिक मोठ्या उमेदीने करत असतात. त्यांच्या या लेखन प्रवासाला साहित्य अकादमी पुरस्कारामुळे आणखी बळ मिळते, असे नमूद करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लघुकथाकार किरण गुरव, कादंबरीकार प्रणव सखदेव आणि संजय वाघ यांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाशी नातं सांगणाऱ्या, गावखेड्यातलं जीवन साहित्यातून मांडणाऱ्या, गाव व शहरातल्या बदलत्या संस्कृतीतलं द्वंद्व अधोरेखित करणाऱ्या लेखकांना मिळालेला हा पुरस्कार ग्रामीण भागातील युवकांना लिहिण्यासाठी प्रेरीत करेल, यातून मराठी भाषा अधिक समृद्ध होईल, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मार्ग सुकर होण्यास मदत होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाचे अधीक्षक डॉ. किरण गुरव यांच्या ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ कथासंग्रहास साहित्य अकादमीचा प्रादेशिक भाषांसाठीचा मुख्य पुरस्कार, संजय वाघ यांच्या ‘जोकर बनला किंगमेकर’ कादबंरीला बालसाहित्य पुरस्कार, प्रणव सखदेव यांच्या ‘काळे करडे स्ट्रोक्स’ कादबंरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर झाल्यानं मराठी भाषा, संस्कृती, साहित्यातली वैविध्यता, समृद्धता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. मराठी साहित्यिकांचा राष्ट्रीय स्तरावर होणारा गौरव हा प्रत्येक मराठी भाषाप्रेमीला सुखावणारा आहे. डॉ. किरण गुरव, प्रणव सखदेव आणि संजय वाघ यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक तरुण साहित्यिक लिहिते होतील. मराठी भाषा अधिक समृद्ध करतील, असा मला विश्वास आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी पुरस्कारविजेत्या साहित्यिकांचं अभिनंदन केलं आहे.
कोंकणी भाषेतील साहित्यासाठीचे पुरस्कारविजेते संजीव वेरेंकार, साहित्य अकादमी वार्षिक पुरस्कार विजेत्या सुमेधा कामत देसाय, बालसाहित्य पुरस्कारविजेत्या श्रद्धा गरड या कोकणी साहित्यिकांसह सर्व पुरस्कारविजेत्या साहित्यिकांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे.
लेखिका सोनाली नवांगुळ यांना मराठी भाषेसाठी, तर डॉ. मंजुषा कुलकर्णी यांना संस्कृत भाषेकरिता साहित्य अकादमीचे मानाचे अनुवाद पुरस्कार प्रदान करण्यात आले. श्रीमती नवांगुळ यांनी ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ आणि डॉ. कुलकर्णी यांनी ‘प्रकाशमार्गा:’ या अनुवादित साहित्याची निर्मिती केली आहे.
देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने वर्ष 2021 च्या युवा पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील २२ प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कारांची निवड व घोषणा करण्यात आली. इंद्रजित भालेराव, नागनाथ कोत्तापल्ले आणि भास्कर चंदनशिव या साहित्यिकांचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी युवा पुरस्कार निवडीच्या परीक्षक मंडळात समावेश होता. 50 हजार रुपये आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून साहित्य अकादमीच्या विशेष कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात येईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App