राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर : साम्य काय??, भेद काय??


विशेष प्रतिनिधी

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर या दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाच्या परिप्रेक्षात एक विलक्षण साम्य आणि भेद आहे. Raj Thackeray and Prakash Ambedkar : similarities and differences of leadership

दोन्हीही नेते आपापल्या मर्यादित ताकदीनुसार महाराष्ट्राच्या राजकारणात “रेलेव्हंट” राहण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही नेत्यांचे भाषणातले अपील उत्तम आहे. किंबहुना दोन्ही नेत्यांची आपल्या वक्तृत्वामुळे आपापल्या अनुयायांना खेचण्याची ताकदही उत्तम आहे. पण त्यापलिकडे संघटनात्मक आणि लोकप्रतिनिधींच्या पातळीवर मात्र दोन्ही नेतृत्वांना सध्यातरी फार मोठी मर्यादा आहे.

प्रकाश आंबेडकरांचे राजकीय प्रयोग

राज ठाकरे यांनी मनसे स्थापन करण्यापूर्वी म्हणजे ते शिवसेनेत असताना भारिप बहुजन महासंघाचा शरद पवारांनी जो अखंड काँग्रेस बरोबर राजकीय प्रयोग केला होता, त्यामधून प्रकाश आंबेडकर लोकसभेत पोहोचले होते. म्हणजे लोकप्रतिनिधित्वाची सर्वोच्च पातळी त्यांनी गाठली होती. त्यानंतर मात्र प्रकाश आंबेडकर वेगवेगळे राजकीय प्रयोग करत राहताना हळूहळू त्यांचा प्रभाव मर्यादित होत गेल्याचे दिसून येते… आणि आता तर गेले काही महिने प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांशी युती अथवा आघाडी करण्याची उघड भाषा बोलत असताना त्यांना या दोन्ही पक्षांचा प्रतिसाद मात्र अद्याप मिळालेला दिसत नाही.

प्रकाश आंबेडकरांचे विश्लेषण उत्तम पण…

प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचे विश्लेषण उत्तम करतात. भाजप आपला विस्तार करताना शिवसेनेला कसा डॅमेज करतो आहे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघेही भाजपला कसे नको आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादीने शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करताना शिवसेनेला अंतर्गत कसे पोखरले, याचे विश्लेषण प्रकाश आंबेडकरांनी उत्तम केले आहे. परंतु ते स्वतः काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षाच्या नेत्यांना राजकीय दृष्ट्या “रेलेव्हंट” का वाटत नाहीत?? किंवा या दोन्ही पक्षांचे नेते त्यांना प्रतिसाद का देत नाहीत?? या प्रश्नाचे उत्तर मात्र प्रकाश आंबेडकर देत नाहीत किंवा त्यांना ते सापडत नाही.

 संभाजी राजे आणि प्रकाश आंबेडकर

मराठा आरक्षणाचा विषय जोरावर असताना प्रकाश आंबेडकरांनी माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्याबरोबर काही राजकीय आघाडी करता येईल का??, याची चाचपणी जरूर केली होती. पण त्यानंतर त्याबाबतही फारशा राजकीय हालचाली दिसल्या नाहीत. एकूण महाराष्ट्रातल्या प्रस्थापित राजकीय पक्षांना प्रकाश आंबेडकर हे “रेलेव्हंट” वाटत नाहीत?? की त्यांची राजकीय भूमिका या प्रस्थापित पक्षांना अडचणीची ठरते??, या प्रश्नाचे उत्तर दोन्ही बाजूंकडून अद्याप आलेले नाही.

 राज ठाकरेंची केस वेगळी

राज ठाकरेंची राजकीय केस याबाबत थोडी वेगळी आहे. राज ठाकरे यांचे मास अपील फार मोठे आहे. पक्षाची संघटना इतर पक्षांच्या तुलनेत फार तोळामासा असताना त्यांच्या सभांना जी गर्दी होते, त्याला महाराष्ट्रात तोड नाही. त्यांच्या नेतृत्वाची दखल महाराष्ट्रातील सगळेच राजकीय पक्ष घेतात किंबहुना राज ठाकरेंचा दबदबा एवढा मोठा आहे की शिवसेना + भाजप या पक्षांचे वरिष्ठ नेते त्यांना घरी जाऊन भेटतात. राज ठाकरे देखील राजकीय दृष्ट्या “रेलेव्हंट” राहणारे विषय उचलतात. मशिदींवरील भोंग्यांचा विषय त्यांनी यशस्वी करून दाखविला आहे. भाजपच्या आणि हिंदुत्ववादी पक्षांचा तो पथ्यावर पडणारा विषय होता.

 स्वबळ की युती संभ्रम

पण त्याच वेळी त्यांच्या पक्षाशी उघड आघाडी करण्याबाबत मात्र बाळासाहेबांची शिवसेना किंवा भाजप फारसा पुढाकार घेताना दिसत नाहीत. महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात मनसे बरोबर हिंदुत्ववादी पक्षांचे स्ट्रॅटेजिक अलायन्स होऊ शकते, अशी चर्चा राज ठाकरे घडवत राहतात. एक प्रकारे तो त्यांचा “पॉलिटिकल रेलेव्हन्स” आहे. पण त्याच वेळी आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांमध्ये मात्र ते स्वबळावर लढण्याचा संदेश देत राहतात.

 भवितव्य दोलायमान की स्थिर??

एक प्रकारे प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे यांच्या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वातला हे साम्य भेदाची स्थळे आहेत. दोन्ही नेते मोठे, पण संघटनात्मक पातळीवर इतर पक्षांच्या तुलनेने कमकुवत… त्यामुळे त्यांचे राजकीय अस्तित्व राजकारण हे विशिष्ट दोलायमान परिस्थितीत दिसते. या दोन्ही नेत्यांच्या बाबतीत राजकीय भविष्य काय असेल??, हे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत दिसेल.

Raj Thackeray and Prakash Ambedkar : similarities and differences of leadership

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात