विशेष प्रतिनिधी
मुंबई : दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (Omicron Variant) जगभरात भीतीचं सावट पसरलं आहे. इतर देशाप्रमाणेच भारतानंही सावध पावलं उचलण्यास सुरूवात केली असून, महाराष्ट्रातही सरकार आणि प्रशासनही सर्तक झालं आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याचं समोर येताच सरकारने नव्याने निर्बंध लागू केले आहेत.
भारतातही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरूवात झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी बैठक घेतली. महाराष्ट्र सरकारने तातडीने काही निर्बंध लागू केले असून, आफ्रिकन देशांसह परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन आणि चाचण्यांचा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये डेल्टापेक्षाही अधिक म्युटेशन आढळून आल्यानं त्यांच्या संसर्गाचा वेग प्रचंड असल्याचं शास्त्रज्ञांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी 5:30 वाजता राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
राज्यातील दैनंदिन कोविड रुग्णांची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारने बरेच निर्बंध शिथिल केले होते. पहिलीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे. तर उर्वरित निर्बंधही हळूहळू शिथिल केले जाणार असल्याचं बोललं जात असतानाच नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. त्यामुळे राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार याकडे राज्यातील जनतेचं लक्ष असणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App