ठाकरेंना घरातलीच महिला मुख्यमंत्री करायचीय, नवनीत राणांचा टोला; पण मराठी माध्यमांनी लावली तिघींमध्ये स्पर्धा!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहूशक्ती कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री करण्याचा मनसूबा बोलून दाखवला आणि त्यावर मराठी माध्यमांनी जोरदार चर्चा सुरू केली. काही नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या, पण अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना घरातल्याच महिलेला मुख्यमंत्री करायचे आहे, असा टोला हाणला. असे असताना मात्र मराठी प्रसार माध्यमांनी महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री कोण? यासाठी तीन नावांमध्ये जणू स्पर्धाच लावली आहे.  Maharashtra woman Chief Minister : marathi media’s self proclaimed battle among Supriya sule, Pankaja Munde and Rashmi Thackeray

उद्धव ठाकरे यांना घरातल्याच महिलेला मुख्यमंत्री करायचे आहे. त्यासाठीच त्यांचा आटापिटा चालला आहे. पण आधी त्यांनी विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेतेपद अंबादास दानवे यांच्याकडून काढून घेऊन ते महिलेला द्यावे, असा टोला नवनीत राणा यांनी लगावला. पण मराठी माध्यमांनी मात्र आपल्या हाती बटेर गवसले, अशा थाटात महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्रीपदासाठी जणू स्पर्धाच लावली. त्यामध्ये अर्थातच मराठी माध्यमांनी पहिला नंबर खासदार सुप्रिया सुळे यांचा ठेवला. त्यानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा नंबर लावला आणि सगळ्यात शेवटी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा नंबर लावला. महाराष्ट्रात ही चर्चा सुरू असल्याची मखलाशी मराठी माध्यमांनी केली.सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार हा निवडक मराठी माध्यमांचा आवडता सिद्धांत आहे. वास्तविक शिवसेना, भाजप अथवा राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांनी अधिकृतरित्या कोणत्याही महिला नेत्याचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केलेलेच नाही. पण सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार. शरद पवारांच्या मनात त्यांनाच मुख्यमंत्री करायचे आहे. त्यासाठी ते अजितदादा पवारांना अनेकदा डावलत असतात, अशा चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा मराठी माध्यमेच जास्त घडवत राहतात. मुख्यमंत्री पदाविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अनेकदा स्पष्ट खुलासे केले आहेत. पण सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या बातम्या मात्र मराठी माध्यमे राष्ट्रवादीच्याच सूत्रांच्या हवाल्याने चालवतात.

जे सुप्रिया सुळे यांच्याबाबत तेच पंकजा मुंडे यांच्या बाबत घडते. पंकजा मुंडे यांना मराठी प्रसार माध्यमे कायम महाराष्ट्रातल्या कुठल्याही राजकीय पदाच्या स्पर्धेत ठेवत राहतात. त्या सध्या पक्षाच्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत. मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत. पण पंकजा मुंडे मध्य प्रदेशात नेमके काय काम करतात??, याच्या बातम्या मराठी माध्यमे देत नाहीत. उलट महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळणार का??, किमान पक्षी विधान परिषदेसाठी त्यांना भाजप उमेदवारी देणार का??, अशा चर्चांना मराठी माध्यमे हवा देतात. आता देखील उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री या वक्तव्यानंतर पंकजा मुंडे यांचे नाव मराठी माध्यमांनीच स्पर्धेत आणले आहे. त्याला ना पंकजा मुंडे यांनी दुजोरा दिला आहे, ना भाजपने त्यावर हमी भरली आहे. पण मराठी माध्यमांनी मात्र चर्चा चालवली आहे.

रश्मी ठाकरे यांच्या बाबतीतही प्रसार माध्यमांनीच परस्पर त्यांचा तिसरा नंबर ठरवून टाकला आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेतून फुटून नवे सरकार बनवण्यापूर्वी अब्दुल सत्तारांनी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याची सूचना केली होती. उद्धव ठाकरे आजारी असल्यामुळे घराबाहेर पडून शकत नाहीत. मंत्रालयात येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाऊन रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी नेमावे आणि राज्याचा कारभार स्वतःच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडून करून घ्यावा, अशी सत्तारांची सूचना होती. पण त्या सूचनेला उद्धव ठाकरे अथवा बाकीच्या शिवसेना नेतृत्वाने मान्यता दिली नव्हती.

असे असताना उद्धव ठाकरे यांच्या कालच्या वक्तव्यामुळे मराठी प्रसार माध्यमांनी पुन्हा एकदा रश्मी ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत आणून ते तिसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे आणि महाराष्ट्रात वरील तीन पैकी कोणीही महिला मुख्यमंत्री होऊ शकते असे स्वतःचेच राजकीय समाधान करून घेतले आहे

Maharashtra woman Chief Minister : marathi media’s self proclaimed battle among Supriya sule, Pankaja Munde and Rashmi Thackeray

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण