ED Action : जरंडेश्वर साखर कारखाना 2 दिवसांनी ईडीच्या प्रत्यक्ष ताब्यात; डॉ. शालिनीताई पाटलांची माहिती


प्रतिनिधी

सातारा : जरंडेश्वर साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपला असून दोन दिवसांनी सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडी कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा घेईल. त्यानंतर हा कारखाना सभासदांच्या ताब्यात मिळावा, या मागणीसाठी आवश्यक तेवढ्या सभासदांच्या सह्यांचे निवेदन प्रतिज्ञापत्रासह ईडीच्या न्यायालयात दिले जाणार असल्याची माहिती जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संस्थापिका माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी आज कोरेगाव येथे पत्रकार परिषदेत दिली. Jarandeshwar Sugar Factory in direct possession of ED after 2 days

जरंडेश्वर’चा विषय ईडीच्या न्यायालयाच्या अखत्यारीतील असल्याने याप्रश्नी कोणालाही सुप्रीम कोर्टात जाता येणार नाही, असा दावाही श्रीमती पाटील यांनी केला. जरंडेश्वर साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपला असून, प्रोसेसमधील साखर काढण्यासाठी 2 दिवस जातील. त्यानंतर ईडी कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा घेईल, असे त्यांनी सांगितले.

– कागदोपत्री आधीच ईडीच्या ताब्यात

जुलै 2021 मध्ये कोर्टाच्या आदेशाने ईडीने कागदोपत्री कारखाना ताब्यात घेतला. परंतु कारखान्याच्या कामकाजात बाधा आणली नाही. तत्पूर्वी दोन वेळा ईडी आणि इन्कम टॅक्सने कारखान्यावर छापे घातले. त्यातून 1400 कोटींचा गैरव्यवहार बाहेर आला. दरम्यानच्या काळात किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून आमचे संचालक मंडळ ईडी कार्यालयाच्या संपर्कात होते. गेल्या 10 दिवसांपासून कोरेगाव, खटाव तालुक्यातील सभासदांच्या सह्या घेण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले आहे. आमदार महेश शिंदे यांनीही सहकार्य केले आहे. आता हा कारखाना सभासदांच्या ताब्यात मिळावा, या मागणीसाठी आवश्यक तेवढ्या सभासदांच्या सह्यांचे निवेदन प्रतिज्ञापत्रासह ईडीच्या न्यायालयात दिले जाणार आहे, अशी माहिती डॉ. शालिनीताई पाटील यांनी दिली.

– सुप्रीम कोर्टात जाता येणार नाही

आमच्या विरोधातील जिल्ह्यातील चोंबडे लोक जरंडेश्वरप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगत आहेत; परंतु हा ईडीच्या न्यायालयातील विषय असल्याने याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात जाता येणार नाही. कारखान्याचे यापुढील काम राज्य शासनाशी संबंधित नाही, तर ते केंद्र शासनाशी निगडित आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची 8 कोटी 34 लाखांची धनलक्ष्मी ठेव शिखर बँकेमध्ये असून, या ठेवीची मुदत वाढवण्यासाठी आमच्या कारखान्याच्या एमडींकडे शिखर बँकेने केलेला पत्रव्यवहार आमच्याकडे आहे, असेही श्रीमती पाटील यांनी नमूद केले.

कारखान्यासंदर्भातील माझे मुंबईतील काम संपल्याने यापुढे माझे कायमस्वरुपी वास्तव्य कोरेगाव तालुक्यातच राहणार आहे. कारखाना ताब्यात मिळाल्यावर तेथील बंगल्यावर जाता येईल. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची विशेष सभा कोरेगाव येथे येत्या 25 मे 2022 रोजी दुपारी 4.00 वाजता होणार असल्याचे श्रीमती पाटील यांनी सांगितले.

– कागदाचा वाघ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून शालिनीताई पाटील यांनी टोला लगावला. बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतरचा वाघ खरोखरच कागदाचा वाघ आहे. घडी घडी आजारी पडतात, त्यांनी मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा सोस कशाला करावा? त्यांच्या पक्षातील योग्य व्यक्तीला मुख्यमंत्रीपद द्यावे. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत महेश शिंदे यांना शिवसेनेचे उमेदवार म्हणून नव्हे, तर नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही पत्र दिले होते, याची आठवण त्यांनी आवर्जून करून दिली.

Jarandeshwar Sugar Factory in direct possession of ED after 2 days

 

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”