वर्चस्व गाजविण्यासाठी नव्हे तर जगाला प्रेरणा देण्यासाठी भारताचा उदय नारद पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात खा. डॉ. सुधांशू त्रिवेदी यांचे प्रतिपादन


विशेष प्रतिनिधी 

पुणे : स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात नव्या भारताचा उदय होत असून भारताचा हा उदय अन्य राष्ट्रांवर वर्चस्व गाजविण्यासाठी नाही तर जगाला प्रेरणा देण्यासाठी होत आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी शनिवारी केले.
India’s rise not to dominate but to inspire the world

विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराचे वितरण खा. त्रिवेदी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पत्रकारिता आणि राष्ट्रीय चारित्र्य या विषयावर प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. यावेळी विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी उपस्थित होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फीथिएटरमध्ये झालेल्या या पुरस्कार उपक्रमाचे हे ११वे वर्ष असून देवर्षी नारद जयंतीच्या निमित्ताने हे पुरस्कार दरवर्षी देण्यात येतात. पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या चार पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. कोरोना महामारीमुळे गेली २ वर्षे हा पुरस्कार कार्यक्रम न झाल्यामुळे २०२०, २०२१ आणि २०२२ या तीन वर्षांचे पुरस्कार एकत्र देण्यात आले. प्रत्येक वर्षासाठी ज्येष्ठ पत्रकार, आश्वासक पत्रकार, छायाचित्रकार/व्यंगचित्रकार आणि सोशल मीडिया या वर्गातून पुरस्कार देण्यात आले. ज्येष्ठ पत्रकारांना २१ हजार रुपये तर अन्य तीन पुरस्कार ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.



या प्रसंगी ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, ’टाईम्स ऑफ इंडिया’ पुण्याचे उप निवासी संपादक अभिजित अत्रे आणि नाशिक येथील दैनिक ’देशदूत ’च्या संपादक वैशाली बालाजीवाले यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ’केसरी’च्या कोल्हापूर ब्यूरो चीफ अश्विनी टेंबे, ’महाराष्ट्र टाईम्स’ पिंपरी-चिंचवडचे विशेष प्रतिनिधी सुनील लांडगे आणि ’सकाळ’ पुणेच्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांना आश्वासक पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.

लोकमत कोल्हापूरचे आदित्य वेल्हाळ आणि पुण्यातील ’टाईम्स नाऊ वाहिनी’चे व्हिडियो जर्नलिस्ट रूख्मांगद पोतदार यांना छायाचित्रकार तसेच पुण्याचे घनश्याम देशमुख यांना व्यंगचित्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील द ‘फोकस इंडिया’चे संपादक विनायक ढेरे, पुण्यातील अमित परांजपे आणि सांगली येथील विनीता तेलंग यांना सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसरचा पुरस्कार देण्यात आला.

https://youtu.be/7wFoJUxgzHE

यावेळी खा. त्रिवेदी म्हणाले की हा अमृतकाळाच्या उषःकिरणांचा काळ आहे. आपल्याला 75 वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाले मात्र ‘स्व’चे तत्त्व बाकी होते. ते आता साकार होऊ लागले आहे. या काळात प्रचार माध्यमांनी संभ्रम निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. स्वातंत्र्य प्राप्त करण्यात सर्वांचे योगदान होते आणि राजकीय चळवळी, क्रांतिकार्य आणि सैन्य अभियान हे त्याचे तीन अंग होते. मात्र प्रसार माध्यमांमध्ये याला महत्त्व देण्यात आले नाही. पुस्तके आणि चित्रपट हेही प्रसार माध्यमांचेच अंग आहे. या माध्यमांतून भारतीय संस्कृतीच्या विरोधी विचार तीन पिढ्यांच्या मनात रूजवले गेले. मात्र प्रसार माध्यमांनी निर्माण केलेल्या वातावरणावर आता तंत्रज्ञान मात करत आहे.

भारतीय संस्कृतीबद्दल बोलताना ते म्हणाले, की प्राचीन काळापासून आजपर्यंत अखंड चालत आलेली आपली एकमेव संस्कृती आहे. आपल्यामध्ये एक बहुमीतीय सचेतन (मल्टीडिमेंशनल कॉन्शियस) ऊर्जा आहे. ती आपल्याला टिकून राहण्यास मदत करते. राजकीय दृष्ट्या जमिनीचा तुकडा कोणाकडेही असला तरी या राष्ट्राला समाप्त करणे सोपे नाही. आपण जगाला ईश्वराचा मार्गही सुचवू शकतो आणि भौतिक उपायही देऊ शकतो.

प्रास्ताविक करताना विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी म्हणाले की आपल्याकडे जी शाश्वत मूल्ये आहेत त्यांबद्दल आपण बोलत नाही. आपल्या सर्वच प्रेरणा विदेशी असायला हवेत, असे नाही. देवर्षी नारद यांना आम्ही आद्य पत्रकार मानतो. आधुनिक पत्रकाराला हवे असलेले सर्व गुण नारदांमध्ये होते. त्यामुळेच आम्ही नारदांच्या नावाने पुरस्कार देतो. गेल्या 10 वर्षांत विश्व संवाद केंद्राच्या वतीने 30 माध्यमकर्मींना सन्मानित करण्यात आले आहे. कोरोना काळात माध्यमकर्मींनी जीवावर उदार होऊन आणि निष्ठेने काम केले. त्यामुळे यंदाचे पुरस्कार विशेष आहेत.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी संस्थेच्या वाटचालीची आणि तिच्या उज्ज्वल इतिहासाची माहिती दिली. तसेच पत्रकारांच्या मागे आपली संस्था उभी असल्याची ग्वाही दिली.

आरंभी दीपा भंडारे यांनी नारद स्तवन केले. वसुंधरा काशीकर यांनी सूत्रसंचालन तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सचिव धनंजय कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

उमेद देणारा पुरस्कार

सध्या समाजात खूप आव्हाने आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी बळ देणाऱ्या लेखणीचा हा सन्मान आहे, असे पुरस्कार प्राप्त पत्रकारांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना वैशाली बालाजीवाले म्हणाल्या. अभिजित अत्रे म्हणाले की असे पुरस्कार बळ देतात आणि जबाबदारीही वाढवतात. दैनंदिन वार्तांकन करताना पत्रकारांना कौतुक आणि टिकेलाही सामोरे जावे लागते. मात्र आपण ज्या वाटेवर चाललो आहोत ती वाट बरोबर आहे हे दाखवणारे असे पुरस्कार असतात. विजय बाविस्कर यांनी पुरस्काराच्या रकमेत आणखी भर घालून विश्व संवाद केंद्राला देणगी देण्याची घोषणा केली. ते म्हणाले की हा पुरस्कार ही गुणवत्तेची तीर्थयात्रा आहे. पत्रकार केवळ समाजातील दोष दाखवत नाहीत तर ते चांगली बाजूही मांडतात. मात्र कोणतीही भूमिका एकांगी असू नये, असा सल्लाही त्यांनी नागरिक तसेच नवीन पत्रकारांना दिला.

India’s rise not to dominate but to inspire the world

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात