मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस एकटेच नाहीत; मग एवढी चर्चा का??; उपमुख्यमंत्री की कार्यकारी मुख्यमंत्री??


महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा राजकीय धमाक्याचा दिवस होता. एक तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार अशी दुपारपर्यंत अपेक्षा असताना अचानक राजभवनातील पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करून महाराष्ट्राला पहिला धक्का दिला. त्यानंतर आपण शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नसून बाहेर राहून या मंत्रिमंडळाला पाठिंबा देऊ, असे जाहीर करून दुसरा छोटा धक्का दिला. पण त्या पलिकडचा सगळ्यात मोठा धक्का देवेंद्र फडणवीस यांनी नव्हे, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिला. Dy Chief minister devendra Fadanavis, people can’t digest the political fact


DEVENDRA FADANVIS : ती डायरी-‘मातोश्री’अन् 2 कोटी रुपयांचं गिफ्ट…देवेंद्र फडणवीस काय म्हणाले!


– नड्डा अमित शहांचा आग्रह

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधी समारंभाला अवघा अर्धा पाऊण तास उरला असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी एएनआय वृत्तसंस्थेला बाईटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सरकारमध्ये असणे अर्थात मंत्रिपदी असणे फार महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी हे आवश्यक आहे, असे स्पष्ट करून देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात सामील होतील, असे स्पष्टपणे सूचित केले. जे. पी. नड्डा यांच्या या वक्तव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील अनुमोदन देत फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब केले. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर दोनदा फोनवरून चर्चा करून त्यांचे मन वळविण्याच्या देखील बातम्या आल्या. अखेरीस देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

– फडणवीस धक्क्याची चर्चा का??

पण महाराष्ट्राच्या राजकारणात आजच्या “फडणवीस धक्क्याची” जोरदार चर्चा झाली. त्याचे कारण काय?? देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदानंतर उपमुख्यमंत्री होणारे काही पहिलेच नेते नाहीत. यापूर्वी अनेक नेत्यांनी मुख्यमंत्रीपदी काम करून नंतर राज्याच्या मंत्रिमंडळात काम केल्याची अनेक उदाहरणे आहेत. यातले नजीकचे उदाहरण तर महाविकास आघाडीतल्याच मंत्रिमंडळात होते. अशोक चव्हाण हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. ते महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मात्र अशोक चव्हाण यांच्या मंत्रिपदाची फारशी चर्चा झाली नाही. एवढेच नाही तर खुद्द त्यांचे वडील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी देखील मुख्यमंत्रीपदानंतर शरद पवारांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून काम केले होते. आणीबाणीच्या काळात 1975 मध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. परंतु शरद पवारांच्या नंतरच्या मंत्रिमंडळात त्यांनी अर्थमंत्री म्हणून काही महिने कार्यभार सांभाळला होता. तसेच दुसरे उदाहरण शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे होते. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे 1985 मध्ये मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून काम केले होते.

शंकरराव चव्हाण, निलंगेकर, अशोक चव्हाण

याचा अर्थ शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि अशोक चव्हाण या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी नंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले आहे. यापैकी कोणालाही त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा दिला नव्हता. त्यावेळी सोशल मीडिया नव्हता. प्रसार माध्यमे देखील फारशी प्रभावी नव्हती हे खरे. परंतु आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी वर उल्लेख केलेल्या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्रीपदी राहुन देखील दुसऱ्या नेत्याच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदी राहणे पसंत केले होते. त्यावेळी त्याची चर्चा देखील फारशी झाली नव्हती.

– नाराजीच्या बातम्या

पण मग आता देवेंद्र फडणवीस यांनी यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून पद स्वीकारायला लावल्यानंतर या विषयाची चर्चा का व्हावी?? फडणवीसांना अचानक उपमुख्यमंत्री करून केंद्रीय नेतृत्वाने त्यांना नाराज केले आहे. त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद हवे होते, वगैरे बातम्या प्रसार माध्यमांनी दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री पद दिल्याने जणू काही देवेंद्र फडणवीस यांचे “राजकीय डिमोशन” झाले आहे, अशी भावना अनेक जण व्यक्त करताना दिसत आहेत. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी आपण पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पक्ष नेतृत्वाचा आदेश शिरोधार्य मानतो, असे ट्विट केले आहे.

– प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळेच चर्चा

पण देवेंद्र फडणवीस यांचे उपमुख्यमंत्री पद या सगळ्यांच्या पलिकडचे दिसते आहे. फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात जो ठसा उमटवला होता, जे प्रभावी मुख्यमंत्री पद राबविले होते त्याची छाप त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून गेलेली नाही. गेली अडीच वर्षे ते जरी विरोधी पक्षनेते होते तरी पहिल्या सहा महिन्यातच राजकीय धक्क्यातून सावरून त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रावरची राजकीय मांड पक्की केली होती. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने विरोधी पक्षनेता वावरत नसून “कार्यकारी मुख्यमंत्री” वावरतो आहे असेच चित्र गेल्या दीड दोन वर्षांमध्ये विशेषतः कोरोना काळामध्ये महाराष्ट्राने पाहिले आहे.

– कार्यकारी मुख्यमंत्र्याची प्रतिमा

2019 च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचे “मी पुन्हा येईन”, हे वक्तव्य जरूर गाजले होते. पण ते पुन्हा आले नाहीत म्हणून त्यांची टवाळी देखील झाली. परंतु विरोधी पक्षनेते पदाच्या रूपाने त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला आणि जणू काही महाराष्ट्रात “कार्यकारी मुख्यमंत्री” फिरतो आहे, अशी प्रतिमा निर्माण केली. हे देवेंद्र फडणवीस यांचे मोठे यश आहे.

– उपमुख्यमंत्री की कार्यकारी मुख्यमंत्री??

या पार्श्वभूमीवर आजच्या अचानक घडलेल्या घटना क्रमाकडे पाहिल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारणे या गोष्टीवर चर्चा का होते??, यावर प्रकाश जरूर पडेल. फडणवीसांचे व्यक्तिमत्व गेल्या सात वर्षांमध्ये महाराष्ट्रातला सर्वात प्रभावी नेता असे बनले आहे. उपमुख्यमंत्री पदावर राहून देखील त्यांचा वावर कार्यकारी मुख्यमंत्री म्हणून राहू शकतो ही वस्तुस्थिती आहे. अर्थात फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री पदाची राजकीय अडचण तुलनेने सौम्य प्रकृती असलेल्या एकनाथ शिंदे यांना होते का??, हा ही महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण एकनाथ शिंदे हे मंत्री जरूर राहिले पण उपमुख्यमंत्री राहिले नाहीत. ते थेट मुख्यमंत्री झाले आहेत, ही वस्तुस्थिती देखील नजरेआड करून चालणार नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते एकमेकांना कसे राजकीय दृष्ट्या ऍडजेस्ट करून घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!!

Dy Chief minister devendra Fadanavis, people can’t digest the political fact

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था