मास्टर स्ट्रोक : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले, पण पवारांच्या सूचनेनुसार नव्हे, तर फडणवीसांच्या पाठिंब्याने!!


आज 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे तिसावे मुख्यमंत्री बनले खरे पण शरद पवारांच्या सूचनेनुसार नव्हे, तर देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्याने!! ही आजची राजकीय वस्तुस्थिती आहे. Master Stroke : eknath shinde accepts offer of BJP and devendra Fadanavis, but rejected offer by sharad Pawar

– पवारांची ऑफर स्वीकारली नाही

वास्तविक एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याबरोबर स्वतः शरद पवारांनीच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची सूचना मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. परंतु, उद्धव ठाकरे यांनी ही सूचना मान्य केली नव्हती. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांना ताबडतोब मुख्यमंत्री पद सोडायचे होते परंतु पवारांनी त्यांचा राजीनामा रोखून धरला होता. त्यावेळी देखील पवारांना आपण आपल्या पद्धतीने राजकीय खेळी करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवून महाविकास आघाडीचे सरकार वाचवू शकतो, असे वाटले होते. परंतु एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांची ही खेळी वेळीच ओळखली आणि त्यांच्या ऑफरला प्रतिसाद दिला नाही. पवारांवर एकनाथ शिंदेंनी विश्वास ठेवला नाही आणि आज ते भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनत आहेत!!

– शिंदेंनी महत्त्वाकांक्षा जाहीर केली नाही

आपल्या राजकीय आयुष्यात एकनाथ शिंदे यांनी आपली महत्त्वाकांक्षा कधीच जाहीर केली नव्हती. ते गुवाहाटी पासून गोव्यापर्यंत प्रवास करून आले, परंतु त्यांनी एकदाही आपण शिवसेना सोडली. आपण मुख्यमंत्री पदासाठी हापापलेले आहोत, असे दाखविले नाही. त्यांच्या गटापैकी कोणत्याही आमदाराने जाहीरपणे कोणतीच महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली नव्हती. उलट एकनाथ शिंदे गटाच्या वतीने गेल्या पाच-सहा दिवसांमध्ये दीपक केसरकर यांनी जी प्रवक्ते पदाची बॅटिंग केली त्याला खरंच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात तोड नाही. अत्यंत संयमी आणि दीर्घकालीन खेळी करणारा फलंदाज जसे स्ट्रोक मारतो तशी केसरकर यांची बॅटिंग होती .

त्याचबरोबर स्वतः शिंदे देखील अनावश्यक पणे कुठेही काहीही बोलले नव्हते. शरद पवारांची मुख्यमंत्री पदाची ऑफर त्यांच्यापर्यंत पोहोचली नव्हती, असे मानणे राजकीय दृष्ट्या भोळेपणाचे ठरेल. परंतु शरद पवारांकडून आलेली ऑफर एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली नसल्याचेच वास्तव आज समोर आल्याचे दिसले.

– माध्यमांचे तोकडेपण

राजभवनात देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत जाईपर्यंत किंबहुना फडणवीस आणि शिंदे हे नेते राजभवनात असेपर्यंत कोणालाही एकनाथ शिंदे हे शिवसेना – भाजप युतीचे पुढचे मुख्यमंत्री असतील याची भनक लागली नव्हती. फक्त एकनाथ शिंदे हे स्वतःच्या हाताने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हातात पत्र सोपवत आहेत, हा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर काही प्रसार माध्यमांना काही वेगळा संशय आला होता. परंतु स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जोपर्यंत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील हे जाहीर केले नव्हते तोपर्यंत कोणत्याही प्रसार माध्यमांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नेमके काय ठरवले आहे आणि कसे ठरवले आहे? याची भनकही लागली नव्हती ही वस्तुस्थिती आहे.

– तथाकथित चाणक्यांपेक्षा फडणवीस भारी

कोणत्याही प्रसार माध्यमांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील आणि देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात बाहेर राहून संपूर्ण मंत्रिमंडळाला मार्गदर्शन करतील अशी केव्हाही बातमी दिली नव्हती. तशा शक्यता देखील वर्तवल्या नव्हत्या. सर्व प्रसार माध्यमे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, अशीच बातमी शेवटपर्यंत चालवत होते. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी मास्टर स्ट्रोक लगावत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आणि आपण महाराष्ट्रातल्या तथाकथित चाणक्यांपेक्षा भारी राजकीय खेळी करू शकतो हे सिद्ध केले!! एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनत असताना ते शरद पवार यांच्या सूचनेनुसार नव्हे, तर देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री बनताहेत हेच आजचे राजकीय वास्तव आहे!!

– मराठा पॉलिटिक्सची मखलाशी

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनत असताना महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा पॉलिटिक्स सुरू झाले आहे अशी मखलाशी काही माध्यमांनी सुरू केली आहे. भाजपने आपली महाराष्ट्रातली राजकीय प्रतिमा बदलण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मराठा नेत्याला मुख्यमंत्री केले अशी मखलाशी मराठी माध्यमांनी चालवली आहे. वास्तविक स्वतः भाजपकडे मराठा नेत्यांची कमी नाही. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर केंद्रातही नारायण राणे यांच्या रूपाने एक बडा मराठा नेता भाजपकडे आजही उपलब्ध आहे. परंतु त्यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री करून एक प्रकारे देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेतृत्वाने महाराष्ट्रातल्या मराठा पॉलिटिक्स मिथक देखील तोडले आहे!!

– मराठा स्ट्रॉंग मॅन मिथक तोडले

दिल्ली आणि महाराष्ट्रात शरद पवारांना मराठा स्ट्रॉंग मॅन म्हणण्याची माध्यमांची प्रथा आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मराठा मुख्यमंत्री करून ही प्रथा देखील भाजपच्या नेतृत्वाने मोडीत काढल्यात जमा आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेत आवर्जून मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या दोन महत्त्वाच्या प्रश्नांच्या उल्लेख केला आहे. यामागचे राजकीय इंगित देखील हेच आहे. सर्वसामान्य शिवसैनिक भाजपच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले हे दोन प्रश्न पुढच्या अडीच वर्षात सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे, हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले आहे.

– शिंदेंचे पॉलिटिक्स जातीच्या पलिकडचे

शरद पवार यांनी महाराष्ट्रात मराठा पॉलिटिक्स केले असले तरी त्यांचे मराठा पॉलिटिक्स हे राष्ट्रवादी केंद्रित आणि त्यातही कुटुंब केंद्रित राहिले आहे. एकनाथ शिंदे वर्षानुवर्ष राजकारणात असले तरी राष्ट्रवादी केंद्रित मराठा पॉलिटिक्सशी त्यांचा दुरान्वये संबंध आला नाही. त्यांनी कधीही राष्ट्रवादी केंद्रित जातीआधारित पॉलिटिक्स केले नाही. उलट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे आधारावर वर्षानुवर्षे राजकीय वाटचाल केली. एक प्रकारे सच्चा शिवसैनिक जातीपाती पलिकडे असतो हेच एकनाथ शिंदे यांनी आजवर दाखवून दिले. त्यांच्या बंडानंतर त्यांना आज भाजपच्या नेतृत्वाने खुलेपणाने दिलेले मुख्यमंत्रीपद हे त्याचेच द्योतक आहे.

– मास्टर स्ट्रोक मधले वेगळेपण

उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्यासाठी म्हणजेच आपले वर्चस्व टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊ इच्छित होते. परंतु ते त्यांनी नाकारून भाजपच्या पाठिंब्यावर विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री होताहेत हे आजच्या राजकीय मास्टरस्ट्रोक मधले वेगळेपण आहे.

Master Stroke : eknath shinde accepts offer of BJP and devendra Fadanavis, but rejected offer by sharad Pawar

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात