महाराष्ट्रातील 200 आमदार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील; एकनाथ शिंदे यांचा दावा


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेतील 200 आमदार राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या खासदार व आमदारांशी संवाद साधण्यासाठी मुर्मू मुंबईत आल्या होत्या. यावेळी आयोजित बैठकीत शिंदे बोलत होते.
200 MLAs from Maharashtra will vote for Draupadi Murmu

शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य घरातील एका कर्तबगार महिलेला सर्वोच्च पदावर बसण्याची संधी दिली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मुर्मू यांना महाराष्ट्रातून राज्यात विक्रमी मते मिळतील, असा विश्वास असल्याचे शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे, रामदास आठवले आणि डॉ. भारती पवार, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, सी. टी. रवी, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, आमदार भारत गोगावले उपस्थित होते. शिवसेनेसह एनडीएचे घटकपक्ष, सहयोगी पक्ष व अपक्ष आमदारांनी या बैठकीस हजेरी लावली.

महाराष्ट्राच्या पवित्र भूमीला नमस्कार

महाराष्ट्राच्या पवित्र भूमीला माझा नमस्कार, अशी मराठीतून सुरुवात करून द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, देशाला गौरन्वित करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबडकरांसारख्या महान व्यक्ती या राज्याने दिल्या. उद्योग, व्यापार, शिक्षण, कृषी अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राने प्रगती केली आहे. राज्यातील आमदार खासदारांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभारी आहे.

अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळतील : गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, भाजपाच्या संसदीय मंडळाने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राष्ट्रपतीपदाचा मान शोषित, पीडीत समाजातील महिलेला देण्याचे ठरविले व द्रौपदी मुर्मू यांची एकमताने निवड केली. त्यांच्या रुपाने प्रथमच एक आदिवासी महिला राष्ट्रपती होणार आहे. त्यांना महाराष्ट्रातून अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळतील.

‘ते’ आमदार-खासदारही मतदान करतील

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ही नव्या युगाची सुरुवात आहे. या निवडणुकीत एनडीएचे खासदार – आमदार मते देतीलच पण येथे नसलेले अनेकजण मतदान करतील आणि मुर्मू या विक्रमी मतांनी निवडून येतील.

पारंपरिक आदिवासी नृत्य करून स्वागत

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू गुरुवारी सायंकाळी ४ च्या सुमारास मुंबईत दाखल झाल्या. त्यांच्या स्वागताला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, पियुष गोयल, रामदास आठवले यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. पालघरमधील मोखाडा, जवाहर तालुक्यातील आदिवासी बांधवांनी पारंपरिक आदिवासी नृत्य करून मुर्मू यांचे स्वागत केले.

200 MLAs from Maharashtra will vote for Draupadi Murmu

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती