राष्ट्रपतीपद ते मुंबई महापालिका निवडणूक ; शरद पवारांचे टॉक नॅशनली, ॲक्ट लोकली!!


कॉर्पोरेट सेक्टर मध्ये मध्यंतरी एक संकल्पना खूप फेमस झाली होती, “थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकली” म्हणजे तुम्ही विचार जागतिक किंवा वैश्विक करा पण त्याची अंमलबजावणी किंवा त्याच्यासारखी कृती स्थानिक पातळीवर करा, असा त्याचा अर्थ होता आणि आहे.Sharad Pawar : from presidential election to Mumbai municipal election, talk nationally act locally!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच मूळ मधून “व्होकल फोर लोकल” अर्थात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक उत्पादनांसाठी जास्तीत जास्त प्रचार करा, अशी उपसंकल्पना विकसित केली. पण ही संकल्पना फक्त कॉर्पोरेट सेक्टरपुरती किंवा कुठल्याही व्यापारापुरती मर्यादित नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणाची देखील हीच स्टाईल आहे. शरद पवार हे नेहमी आपण राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहोत असे सांगतात. संजय राऊत त्यांचा तसा प्रचारही करतात. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर कृषिमंत्री पदासारखे पदही भूषविले आहे, पण त्याच वेळी ते “टॉक नेशनली, ॲक्ट लोकली” ही भूमिका बजावतानाही दिसतात. साधारण गेल्या महिनाभरात शरद पवारांचा हा राजकीय प्रवास राष्ट्रपतीपदाची निवडणूक, त्यामध्ये थेट सर्व विरोधकांचे पहिल्या पसंतीचे उमेदवार ते आता मुंबई महापालिका निवडणुकीचे राष्ट्रवादीचे मुख्य सूत्रसंचालक इथपर्यंत येऊन ठेपला आहे!! दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातले त्यांच्या मार्गदर्शनाखालचे सरकार निघून गेले आहे आणि पवारांची देशातच काय जगातल्या राजकारणासाठी देखील दुर्मिळ असलेली राजकीय लवचिकता सर्वांना दिसली आहे. यालाच “टॉक नॅशनली आणि ॲक्ट लोकली” असे म्हणता येईल!!मुंबई महापालिका निवडणुकीसाठी बैठक

शरद पवारांनी गेले दोन दिवस मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मॅरेथॉन बैठक घेतली. त्यामध्ये मध्यावधी विधानसभा निवडणुकीपासून ते मुंबई महापालिका आणि स्थानिक निवडणुकांपर्यंत पक्षाच्या परफॉर्मन्सचा आणि राजकीय परिस्थितीचा बारकाईने आढावा घेतला. विशेषतः कालच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मुंबई महापालिकेवर अधिक लक्ष केंद्रित करून स्थानिक पातळीवरच्या नेत्यांच्या बैठका घेतल्या आणि त्यांना स्पष्टपणे कोणी सोबत येवो अथवा न येवो महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा. कोण सोबत येतोय याचा विचार करू नका. मुंबई महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याची संधी आली आहे, असे सांगितले.

 शिवसेनेच्या विस्कळीतपणाचा फायदा

पवारांचा यातला राजकीय मनसूबा उघड आहे. शिवसेना पूर्णपणे मुंबईतच काय पण महाराष्ट्रात विस्कळीत झाली आहे. नेमकी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे यांची??, हा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. म्हणजेच शिवसेनेसाठी 100% आयडेंटिटी क्रायसिस तयार झाला आहे. अशा वेळी मुंबई महापालिका परिक्षेत्रात जी राजकीय पोकळी तयार होऊ शकते अथवा झाली आहे ती भरून काढण्यासाठी शरद पवारांनी स्वतःच्या हातात सूत्रे घेऊन आगेकुच करण्याचा मनसूबा रचला आहे. समोर अर्थातच तगडा प्रतिस्पर्धी भाजप आणि मनसे असेल. किंबहुना अशीच राजकीय नेपथ्य रचना व्हावी याची तयारी शरद पवारांनी राज्य सरकारच्या सर्व घडामोडींच्या बॅकग्राऊंडला करून ठेवली आहे!!

शिवसेनेच्या अस्तित्वाला नख कोणी लावले?

शिवसेनेच्या राजकीय अस्तित्वाला नख लावण्यात पवारांचा किती मोठा वाटा आहे हे लपून राहिलेले नाही. एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उघडपणे त्याची वाच्यता केलीच आहे. अर्थातच त्याचा दीर्घकालीन परिणाम राष्ट्रवादीसाठी अनुकूल ठरावा यासाठी स्वतः शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेऊन मुंबई महापालिका निवडणुकीची सूत्रे हाती घेतली आहेत. महाराष्ट्रातल्या सत्तेचा राजमार्ग मुंबई महापालिकेतून जातो हे पवारांना राजकीय उत्तरआयुष्यात लक्षात आलेले दिसत आहे!! आणि जेव्हा शिवसेना आपल्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये गुंतली आहे तेव्हा ते मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीच्या शिरकावासाठी फार तर दमदार शिरकावासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहेत. म्हणूनच त्यांनी स्वतः दर 20 दिवसांनी राष्ट्रवादीचा परफॉर्मन्सचा वार्डनिहाय आढावा घेण्याची तयारी दाखवली आहे. ज्या नगरसेवकांना अथवा ज्या इच्छुकांना पाहिजे त्या वॉर्डात ते उपलब्ध असणार आहेत.

टॉक नॅशनली प्रत्यक्षात फेल… मग??

याचा अर्थच असा की राष्ट्रवादीच्या सर्व टीमचे नेतृत्व स्वतः पवार करणार आहेत आणि हेच वर उल्लेख केल्याप्रमाणे शरद पवारांचे राजकीय लवचिकत्व आहे. राष्ट्रपतीपदाचे सर्वसंमत विरोधी उमेदवार ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मुख्य सूत्रधार हा गेल्या साधारण महिनाभरातला शरद पवारांचा राजकीय प्रवास “असा” घडताना दिसतो आहे. यालाच शरद पवारांचे “टॉक नॅशनली, ॲक्ट लोकली” म्हणता येईल!! आता “टॉक नॅशनली” मधून पवारांनी यशस्वी माघार घेतली आहे. म्हणजे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ते सर्व संमतीचे पहिल्या क्रमांकाचे विरोधी उमेदवार असूनही ते उभे राहिले नाहीत. त्या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली आणि यशवंत सिन्हांना उमेदवारी दिली… मग “ॲक्ट लोकली”मध्ये ते किती यशस्वी होतात?? मुंबई महापालिकेत त्यांच्या सूत्रसंचालकत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस किती आतवर शिरकाव करू शकते आणि शिवसेना किती आतपर्यंत पोखरू शकते??, हे येणारा काळच सांगेल!!

Sharad Pawar : from presidential election to Mumbai municipal election, talk nationally act locally!!

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*