विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत रंग भरला असताना महायुती जिंकेल, की महाविकास आघाडी जिंकेल, याच्या पैजा लागल्यात. त्याचबरोबर दोन्ही तुल्यबळ आघाड्यांनी मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर न केल्यामुळे निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार??, याची उत्सुकता ताणली गेली आहे.
अशा वातावरणात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी जाहीरपणे वेगळाच फॉर्म्युला समोर आणला आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदी ना कुणाच्या मनातला, ना जाहीर चर्चेतला चेहरा येईल, कुणीतरी वेगळाच चेहरा मुख्यमंत्री होईल, असे साधार भाकित विनोद तावडे यांनी केले. त्यासाठी त्यांनी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडचा हवाला दिला. या तीनही राज्यांमध्ये भाजपने निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. त्यामुळे त्या राज्यांमध्ये अनेक नावांची नुसती चर्चा रंगली. माध्यमांनी वेगवेगळ्या अटकळी बांधल्या. तर्क वितर्क लढवले. अनेक नावे चेहरे – मोहरे पुढे – मागे सरकवले. पण यापैकी कुणीही मुख्यमंत्री झाले नाही.
राजस्थानात भजनलाल शर्मांचे नाव चर्चेत नव्हते, ते तिथे मुख्यमंत्री झाले. मध्य प्रदेशात मोहन यादव यांचे नाव कोणी घेत नव्हते, ते तिथे मुख्यमंत्री झाले. छत्तीसगडमध्ये विष्णु देव साय मुख्यमंत्री होतील, असे कोणाला वाटले नव्हते. त्यांना भाजपने तिथे संधी दिली. महाराष्ट्रात देखील चर्चेत नसलेले नाव मुख्यमंत्री होईल, असे विनोद तावडे यांनी सांगितले.
– महाविकास आघाडीत “राजकीय बॉम्ब”
त्यामुळे विनोद तावडे यांनी केवळ महायुतीमध्येच “राजकीय बॉम्ब” पेरला असे नाही, तर महाविकास आघाडीमध्ये देखील तसाच “राजकीय बॉम्ब” पेरून ठेवला. कारण महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तीव्र बनली आहे. आघाडीतून उद्धव ठाकरे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची नावे चर्चेत आली. शरद पवारांच्या मनातले नाव म्हणून माध्यमांनी सुप्रिया सुळेंचे नाव चालविले. पण विनोद तावडे यांनी ना कुणाच्या मनातला, ना जाहीर चर्चेतला, कुणीतरी वेगळाच चेहरा मुख्यमंत्री होईल, असे सूचित करून महाविकास आघाडीतली पण हवा काढून घेतली आहे.
– स्वतःचेही नाव नाकारले
मराठी माध्यमांनी खुद्द विनोद तावडे यांचेही नाव चर्चेत आणले. त्यांच्या दिल्लीच्या सत्ता वर्तुळातल्या दबदब्याचे वर्णन केले. विविध राज्यांमध्ये भाजपची सरकारे आणण्यामध्ये त्यांनी किती महत्त्वाची कामगिरी केली, हे सांगितले. पण विनोद तावडे यांनी स्वतःचे पण नाव स्पष्टपणे नाकारले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App