विशेष प्रतिनिधी
मुंबई : सत्ताधारी गोटातल्या दोन मुस्लिम नेत्यांची आपापल्या पक्षात सुरुंग पेरणी; सध्या भाजप शांत, पण निवडणुकीनंतर किंमत लागेल मोजावी!! नेमकी अशी राजकीय अवस्था सत्ताधारी महायुतीची सध्या दिसून येत आहे.
नवाब मलिक आणि अब्दुल सत्तार हे अनुक्रमे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन मुस्लिम नेते भले मोठे दावे करत आपापल्यास पक्षांमध्ये राजकीय सुरुंग पेरणी करत आहेत. दोन्ही नेत्यांचा कटाक्ष भाजपच्याच नेत्यांवर दिसतो आहे. नवाब मलिकांना उमेदवारी देऊ नये, यासाठी भाजपने अजितदादांना स्पष्ट बजावले होते, पण तरी देखील अजितदादांनी भाजपचे न ऐकता नवाब मलिकांना शिवाजीनगर मानखुर्द मधून उमेदवारी दिली.
भाजपने नवाब मलिकांचा प्रचार करायला नकार दिला. त्यामुळे नवाब मलिक चिडले. त्यांनी आपल्या जुन्या अवतारात येत भाजप विरोधात बोलायला सुरुवात केली. बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्रात चालणार नाही. सत्तेच्या चाव्या अजितदादांच्या हातात आहेत. ते किंगमेकर बनतील आणि महायुतीचे गणित बिघडवतील, असा दावा नवाब मलिक यांनी केला. अजितदादांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तो दावा फेटाळून लावला. पण भाजपचे नेते सध्या तरी नवाब मलिकांवर फारसे काही बोललेले दिसत नाहीत. पण निवडणूक संपल्यानंतर भाजपचे नेते शांतच बसतील आणि नवाब मलिकांवरती काही बोलणारच नाहीत, याची कुठलीही गॅरेंटी नाही.
– अब्दुल सत्तार यांचे दावे
इकडे नवाब मलिक भाजप विरोधात बोलत असताना दुसरीकडे रावसाहेब पाटील दानवे यांच्यावरच्या रागातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर दुगाण्या झोडल्या. पण असे करताना त्यांनी आपण मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवून आहोत. आपण मुख्यमंत्री बदलू शकतो. आम्ही गुवाहाटी ला गेलो शिवसेनेत बंद केले म्हणून भाजपला सत्तेवर येता आले, असा दावा केल्याने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्येच अस्वस्थता निर्माण झाली. रावसाहेब पाटील दानवे आणि अब्दुल सत्तार यांचे स्थानिक राजकारणात वैर आहे. म्हणून अब्दुल सत्तार भाजपवर शरसंधान साधत आहेत.
पण हे सगळे भाजप निवडणूक होईपर्यंत ऐकून घेईल. नंतर भाजपच आक्रमक झाला तर नवाब मलिक आणि अब्दुल सत्तार यांचे राजकीय भवितव्य काय असेल?? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीत ते कायम राहिले, तरी भाजपच्या वर्चस्वाखाली असलेल्या पुढच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळेल का??, हा गंभीर सवाल आहे. त्याचबरोबर निवडणुकीपूर्वी या चालवलेल्या सुरुंग पेरणीची राजकीय किंमत त्यांना निवडणुकीनंतर चुकवावी लागेल, ही दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App