विशेष प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस खरी कोणाची, शरद पवारांची की अजित पवारांची??, हा काका – पुतण्याचा वाद उफाळला असताना ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांनी या वादात पडून शरद पवारांना एक सल्ला दिला आहे. शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर जाऊन केंद्राच्या राजकारणात लक्ष घालावे. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिल्लक राहिली नाही, तरी शरद पवार महानच ठरतील, असे वक्तव्य यशवंत मनोहर यांनी शरद पवारांच्या वाढदिवशी केले आहे.Though NCP dissolved in future, sharad pawar still remains great, asserts yashwant manohar
शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी यशवंत मनोहर नागपूरला आले. त्यांनी पवारांची भेट घेऊन त्यांना सदिच्छा दिल्या. त्यानंतर पवारांच्या राजकारणाविषयी त्यांनी माध्यमांसमोर भाष्य केले. यशवंत मनोहर म्हणाले, केंद्रातल्या भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी शरद पवारांनी 26 पक्षांच्या आघाडीला एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला होऊन केंद्रात जावे. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिल्लक राहिली नाही, तरी शरद पवार महानच आहेत, अशा शब्दांमध्ये यशवंत मनोहरांनी त्यांचे कौतुक केले.
शरद पवारांच्या कुटुंबात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, त्या प्रश्नाकडे पवारांनी दुर्लक्ष केले पाहिजे. त्या ऐवजी त्यांनी केंद्रीय राजकारणात लक्ष घातले पाहिजे, असे यशवंत मनोहर यांनी आवर्जून सांगितले.
यशवंत मनोहर यांनी थेट पवारांना दिलेल्या सल्ल्यामुळे महाराष्ट्रासह पुरोगामी चळवळीतल्या अनेकांच्या भुवया उंचावून कान लांब झाले आहेत. शरद पवार महाराष्ट्रातल्या अनेक पुरोगामी चळवळीतल्या साहित्यिकांचे “मेंटॉर” आहेत. पवारांनी किमान 8 ते 10 साहित्य संमेलनांची उद्घाटन केली आहेत. पवारच त्यांना पुरोगामी चळवळीसाठी विविध मुद्द्यांचे राजकीय सामाजिक बौद्धिक खाद्य पुरवत असल्याची चर्चा महाराष्ट्रात होत असते. पवार अनेक साहित्यिकांना “सुप्त सल्ले” देऊन त्यांच्या साहित्याला “पुरोगामी वळण” लावत असल्याचे सांगितले जाते. अनेक साहित्यिकांनी हे वळणावळणाने किंवा आड वळणाने बौद्धिक मुलाखती देऊन तसे सूचितही केले आहे.
पवारांच्या महानतेवर यशवंत मनोहरांचे शिक्कामोर्तब
पण प्रथमच यशवंत मनोहर यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकाने थेट पवारांनाच महाराष्ट्राचे राजकारण सोडण्याचा सल्ला देऊन नेमके काय साध्य केले??, याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्याचबरोबर भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिल्लक राहिली नाही, तरी पवार महान आहेत, असे वक्तव्य यशवंत मनोहरांसारख्या ज्येष्ठ साहित्यिकाने केल्याने पवारांच्या महानतेवरही कायमचे शिक्कामोर्तब झाल्याचे मानण्यात येत आहे.
पण त्या पलीकडे जाऊन राष्ट्रवादीच्या भवितव्याबद्दल त्यांनी वक्तव्य केल्याने भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडे शिल्लक राहणार नाही. ती अजित पवारांकडेच जाईल, असे तर यशवंत मनोहरांना सुचवायचे नाही ना??, अशीही चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App