विशेष प्रतिनिधी
पुणे : देशातील सध्याची परिस्थिती व धोरणात्मक पातळीवर काश्मीरच्या बदलत्या परिस्थितीला समजून घेण्यासाठी तरुण अधिकाऱ्यांनी सज्ज राहावे. असे मत दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे एस नैन यांनी व्यक्त केले.
जम्मू काश्मीर मधील सध्याच्या सुरक्षाविषयक परिस्थितीचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने दक्षिण मुख्यालयाच्या कक्षेतील डेझर्ट कोअरच्या वतीने लेफ्टनंट जनरल नैन यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी चिनार कोअरचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी पी पांडे, लेफ्टनंट जनरल के जे एस ढिल्लों (निवृत्त), जम्मू काश्मीरचे माजी पोलिस महासंचालक राजेंद्र कुमार, पाकिस्तानातील माजी उच्चायुक्त परराष्ट्रनीतीमधील तज्ञ टी सी राघवन आदींनी सहभाग घेतला होता. या विषयातील जाणकार असलेले आदित्य राज कौल, लेखक ऐजाज वाणी, रजा मुनिब, डॉ. अशोक बेहुरिया आदींनी या संदर्भातील मते मांडले.
यावेळी कलम ३७० रद्द केल्यानंतर जागतिक व राष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीत झालेला आमूलाग्र बदल आणि त्यामुळे काश्मीरच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीवरील परिणाम यावर मान्यवरांनी विचार व्यक्त केले. तसेच भावी वाटचालीबाबत चर्चासत्र झाले.
लेफ्टनंट जनरल नैन म्हणाले, ‘‘काश्मीर येथील युवावर्गाने मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असून त्यासाठी शैक्षणिक व्यवस्थेत सुधारणा होण्याची गरज आहे. या भागात अंमलीपदार्थाशी संबंधित दहशतवाद रोखणे आणि प्रमुख संस्थांमध्ये घुसखोरी होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कलम ३७० रद्द करणे, राज्य म्हणून जम्मू-काश्मीर संदर्भात टप्प्याटप्प्याने घातलेल्या मर्यादा अशा अनेक निर्णय जम्मू काश्मीरच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरले. दरम्यान अधिक धोरणात्मक निर्णयासाठी पायाभूत सुविधांचा विकास आणि सामाजिक-आर्थिक परिणामाच्या विश्र्लेषणाची दखल घेतली पाहिजे.’’ पाकिस्तानच्या आगामी धोरणात्मक डावपेचांच्या दृष्टीने आधीच तयार राहण्याची सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
यावेळी तज्ञांनी प्रशासनाच्या विविध स्तरांवर आधिपत्य मिळवण्यासाठी ‘संपूर्ण राष्ट्र’ या ठोस आणि सयुक्तिक भूमिकेचा अवलंब करण्याच्या गरजेवर भर दिला. या चर्चासत्रात दक्षिण मुख्यालयाच्या ३२ विविध स्टेशनमधून सुमारे ११०० अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App