प्रतिनिधी
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील तहसिलदार श्रीमती ज्योती देवरे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकार्यांवर केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत. त्यांनी आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप सुद्धा जारी केली आहे. या प्रकरणाची तातडीने दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि त्यांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेत त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. Tahasildar Jyoti Devre issue; Dvenendra Fadanavis written letter to CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, नगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसिलदार श्रीमती ज्योती देवरे यांनी 11 मिनिटांची एक ऑडियो क्लिप जारी करून अनेक गंभीर आरोप स्थानिक लोकप्रतिनिधीवर आणि वरिष्ठ अधिकार्यांवर केले आहेत. लसीकरणावरून काही कर्मचार्यांना पोलिस अधिकार्यांच्या समोर मारहाण करणे, अश्लील शिविगाळ करणे, महिला कर्मचार्यांना मारण्यासाठी महिला पोलिसांना बोलाविण्यास सांगणे, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांपर्यंत प्रकरण नेल्यानंतर तहसिलदार ज्योतीताई देवरे यांच्याच बदनामीचा प्रयत्न करणे, वरिष्ठ अधिकार्यांकडूनही त्यांना धमक्या प्राप्त होणे, कोरोना काळात नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यातही अडचणी उत्पन्न करणे आणि मग थेट मंत्र्यांकडे त्यांच्या बदलीची शिफारस करणे, यातून महिला अधिकार्यांचे खच्चीकरण करणे, असे अनेक गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.
– दीपाली चव्हाण प्रकरणाचा उल्लेख
थेट दीपाली चव्हाण प्रकरणाचा उल्लेख करून मी सुद्धा तुझ्याकडे येतेय्, हा त्यांचा ऑडिओमधील आवाज अंगावर शहारे आणणारा आहे. एक स्त्री अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत असताना संपूर्ण यंत्रणाच तिचे मानसिक खच्चीकरण करीत असेल आणि परिणामी त्या महिला अधिकार्याला आत्महत्येचा इशारा द्यावा लागत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आणि मनाला वेदना देणारी आहे. खरे तर कोरोना काळात संपूर्ण यंत्रणा दबावात काम करीत असताना त्यांना आणखी नाहक त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणे अतिशय आवश्यक आहे. माझी आपल्याला विनंती आहे की, आपण यात तत्काळ लक्ष घालून हस्तक्षेप करावा. या महिला अधिकार्याला आपण स्वत: बोलावून घेऊन त्यांची तक्रार ऐकून घ्यावी आणि त्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात आणि तत्काळ त्यावर तोडगा काढून त्या अधिकार्याला न्याय द्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या महिला अधिकार्याची इतकी अवहेलना होऊ नये, हीच कळकळीची विनंती, असेही देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App