विशेष प्रतिनिधी
पुणे : उद्याच्या दिवाळी पाडवा कार्यक्रमासाठी बारामतीतल्या शरद पवारांच्या निवासस्थानी गोविंद बागेत येणाऱ्या नेत्यांना धनगर आरक्षण आंदोलकांनी अडवू नये म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः धनगर आरक्षण प्रश्नात लक्ष घातले. बारामतीतल्या धनगर आरक्षण आंदोलकांना त्या आंदोलन स्थळी जाऊन भेटल्या. गोविंद बागेत येणाऱ्या नेत्यांना अडवू नये, अशी विनंती त्यांनी आंदोलकांना केली. त्यावेळी आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्याच राजीनामाची मागणी केल्यावर माझ्या राजीनाम्याने धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे का??, असा उलटा सवाल केला. Supriya Sule’s focus on Dhangar Reservation Movement
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी बारामतीत धनगर युवक आंदोलन करत आहेत. गोविंद बागेत येणाऱ्या नेत्यांना अडवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. आंदोलक चांगलेच आक्रमक झाले होते. या पार्श्वभूमीवर उद्याचा गोविंद बागेतला दिवाळीचा कार्यक्रम अडचणीत सापडला असता आणि धनगर आरक्षणाचीच मोठी बातमी झाली असती म्हणून सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला फोन लावला तसेच मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनाही फोन लावून धनगर आरक्षणात मुख्यमंत्र्यांना लक्ष घालण्याची विनंती केली. त्याचबरोबर उद्या बारामतीच्या गोविंद बागेत येणाऱ्या नेत्यांना अडवू नये अशी विनंती त्यांनी आंदोलकांना केली. त्यावर एका आंदोलकांनी संतप्त होऊन त्यांच्याच खासदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली. परंतु माझ्या राजीनाम्याने धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे का?? बारामती मतदारसंघात 60000 धनगर मतदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने कायमच त्यांच्यासाठी काम केले आहे, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला. त्यावर धनगरांना वेगळे आरक्षण दिले तर आपण राजीनामा देऊ, अशी धमकी विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांनी दिली, याकडे आंदोलकांनी सुप्रिया सुळेंचे लक्ष वेधल्यावर त्यांनी तत्काळ आता नरहरी झिरवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नाहीत, असा दावा केला.
पण मूळात उद्या गोविंद बागेतल्या दिवाळी कार्यक्रमात धनगर आरक्षण आंदोलनाचा अडथळा येऊ नये यासाठीच सुप्रिया सुळेंनी त्या विषयात लक्ष घातल्याचे मानले जात आहे.
उद्या अजितनिष्ठाभ राष्ट्रवादीचे काही आमदार शरद पवारांना गोविंद बागेत जाऊन भेटणार असल्याची बातमी आहे. या पार्श्वभूमीवर देखील धनगर आरक्षणाचा विषय उद्याच्या दिवाळी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आणखी आक्रमक होऊ नये, यासाठी सुप्रिया सुळे यांनी धनगर आरक्षण विषयात लक्ष घालून आंदोलकांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App