सुप्रिया सुळे म्हणतात, यशवंतरावांचे माझ्यावर संस्कार म्हणून मी अजितदादांच्या आरेला कारे करत नाही; पण या संस्कारांचे खरे “रहस्य” काय??

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पक्षात आपल्याकडे खेचून घेण्याचा वाद सुरू असताना जुन्या नेत्यांचा वयाचा आणि निवृत्तीचा उपवाद उसळून वर आला आहे. अजित पवारांनी शरद पवारांचे 84 वय काढणे आणि त्यांना निवृत्त होण्याचा सल्ला देणे सोडलेले नाही, इतकेच नाही तर ते मी रोहित पवारांवर बोलत नाही, कारण तो “बच्चा” आहे, असे म्हणाले. Supriya sule says, she follows y. b. chavans Sanskar what is the political mystery of that??

या मुद्द्यावर शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत अजितदादांना प्रत्युत्तर दिले. पण त्यावेळी पत्रकारांनी तुम्ही अजित पवारांची नेहमी बाजू का घेता??, असा नेमका सवाल केल्यावर सुप्रिया सुळे यांनी वेगळेच उत्तर दिले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारात वाढली आहे. त्यामुळे मी प्रत्येक वेळी आरेला कारे करत नाही. अजित पवार माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे आहेत. ते सीनियर सिटीजन आहेत आणि रोहितचे काका असल्यामुळे त्यांना रोहितला “बच्चा” म्हणण्याचा अधिकार आहे.

अर्थात, सुप्रिया सुळे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या संस्काराचा वारसा काही केवळ कालच्याच फक्त पुण्यातल्या पत्रकार परिषदेत सांगितला असे नाही, तो आधी देखील अनेकदा सांगितला आहे. त्यामुळे “यशवंतरावांचे संस्कार” म्हणजे नेमके काय?? हा सवाल तयार होतो.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सभ्य आणि सुसंस्कृत नेते म्हणून कायम ओळखले गेले. त्यांची ती प्रतिमा त्यांच्या विशिष्ट राजकीय वर्तणुकीतून आणि समर्थक नेत्यांच्या आणि पत्रकारांच्या प्रतिमा निर्मितीतून विकसित झाली होती. यशवंतराव एकाच वेळी राजकारण, समाजकारण आणि साहित्यकारण या तिन्ही कारणांमध्ये रमत. यशवंतराव मोठे साहित्यिक होते. त्यांची अनेक पुस्तके आज उपलब्ध आहेत. पण त्याचबरोबर यशवंतराव दीर्घकाळ महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात वावरलेले एक प्रभावी नेते होते. शरद पवारांचे ते राजकीय गुरू होते. त्यामुळे सुप्रिया सुळे यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारांचा नेहमी उल्लेख करतात.


सोनिया – ठाकरे – पवारांची 15 दिवसांपूर्वी दिल्लीत बैठक, अजून 8 – 10 दिवसांनी जागावाटप जाहीर करू; सुप्रिया सुळेंचे वक्तव्य


पण हा झाला यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वातला एक विशिष्ट पैलू!! त्या पलीकडे जाऊन सुप्रिया सुळे यांच्या यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार या विधानात बरेचसे “बिटवीन द लाईन्स” देखील दडले आहे.

यशवंतराव जसे राजकारणात सभ्य आणि सुसंस्कृत म्हणून गणले गेले होते, तसे ते संघर्षवादी नेते म्हणून कधीच गणले गेले नव्हते. ते नेहमी समन्वयाची भूमिका घेऊन सत्तेच्या केंद्राभोवती राहण्यास प्राधान्य द्यायचे. त्यांना सर्वोच्च पदाची राजाकीय महत्त्वाकांक्षा होती, यात शंका नाही. पण त्यासाठी त्यांची पक्षातल्या अतिवरिष्ठ अशा कुठल्याच नेतृत्वाशी संघर्ष करायची बिलकुल तयारी नव्हती. किंबहुना त्यांचा तो पिंड आणि वकूब नव्हता. त्यामुळे पंतप्रधान पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि त्यानंतर इंदिरा गांधी या तीनही पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव नेहमीच दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचे नेते म्हणूनच वावरले. नेहरू आणि शास्त्री यांच्याशी यशवंतरावांनी राजकीय संघर्ष करण्याचा कधी प्रश्नच उद्भवला नाही. कारण दोन्ही नेते यशवंतरावांना नुसते सीनियरच नव्हते, तर त्यांच्यापेक्षा ते कितीतरी प्रभावी आणि भारतव्यापी नेते होते. त्या उलट यशवंतराव कायमच “महाराष्ट्र सीमित” नेते राहिले होते.

इंदिरा गांधींची सुरुवातीला त्यांनी संघर्षाची भूमिका जरूर घेतली, पण त्यांच्यापुढे यशवंतरावांचा टिकाव लागला नाही. 1970 ते 1980 या 10 वर्षांच्या काळात यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व इंदिरा गांधींपुढे टप्प्याटप्प्याने निष्प्रभ होत गेले. 1980 नंतर तर, यशवंतराव चव्हाण एवढे निष्प्रभ झाले की, इंदिरा गांधी यांच्यापुढे राजकीय शरणागती पत्करून “काँग्रेसवासी” होण्याशिवाय त्यांना पर्याय उरला नव्हता.

यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणाचे “हे” संस्कार कधीच संघर्ष करून आपली राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे नव्हते, तर शक्यतो समन्वय राखून सत्तेच्या वळचणीला बसण्याचे होते. यशवंतरावांच्या राजकीय चरित्रात याचे तपशीलवार उल्लेख आहेत.

सुप्रिया सुळे जेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारांचा उल्लेख करतात, त्या उल्लेखातले हे खरे “बिटवीन द लाईन्स” आहे!!

– सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाची मर्यादा

सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शरद पवारांचा गट सावरायचा आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे बारामतीची लोकसभा सीट राखायची आहे. ती राखताना बारामतीत अजित पवारांशी टक्कर घेणे त्यांना बिलकुलच परवडणार नाही आणि अजित पवारांना उघडपणे अथवा छुप्या पद्धतीने भाजपच्या इच्छेविरोधात जाऊन पणे सुप्रिया सुळेंना मदत करणे परवडणार नाही कारण ते भाजपच्या टर्म्स अँड कंडिशन नुसार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना जर आपली सीट बारामतीची सीट कायम टिकवायची असेल, तर अजित पवारांची उघड संघर्ष करण्यापेक्षा समन्वयवादी भाषा वापरूनच काही राजकारण साधता आले तर ते साधता येऊ शकणार आहे.

त्या पलीकडे जाऊन सुप्रिया सुळे अथवा शरद पवार गटाची अजित पवारांची खऱ्या अर्थाने टक्कर घेण्याची क्षमता देखील नाही. याची चुणूक काहीच महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये देखील दिसली. बारामती तालुक्यातल्या 32 पैकी 29 ग्रामपंचायती अजित पवारांच्या गटाने जिंकल्या. त्यामुळे बारामती तालुक्यात आणि लोकसभा मतदारसंघात अजित पवारांचा राष्ट्रवादी नावाच्या संघटनेवर मोठा पगडा आहे. तो सुप्रिया सुळे यांना भारी ठरणारा आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे जो यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारांचा उल्लेख करतात आणि आपण त्या संस्कारातून अजितदादांना आरेला कारे करत नाहीत, असे म्हणतात त्याचे खरे “रहस्य” बारामतीतली अजितदादांची “दादागिरी” आणि सुप्रिया सुळे यांची दुर्बलता यामध्ये आहे.

संघर्ष करून आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यापेक्षा समन्वयातून सत्तेच्या वळचणीला बसण्याचा प्रयत्न करा, हा यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय संस्कार त्या पाळत आहेत.

Supriya sule says, she follows y. b. chavans Sanskar what is the political mystery of that??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात