उद्धव ठाकरेंनी दंडात काढल्या स्वबळाच्या बेटकुळ्या; पण काँग्रेसच्या पोटात का आला गोळा??

नाशिक: महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणकून पराभव झाल्यानंतर काय व्हायचे ते होऊ द्या, असा निर्वाणीचा इशारा देत उद्धव ठाकरेंनी मुंबईसह महाराष्ट्रातल्या महापालिका स्वबळावर लढवायचा निर्णय जाहीर केला. त्यांनी स्वतःच्या दंडात स्वबळाच्या बेटकुळ्या काढल्या, पण त्यामुळे काँग्रेसच्या पोटात गोळा आला. काँग्रेसच्या मुंबईतल्या नेत्यांनी ठाकरेंच्या निर्णयावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पण या क्रिया – प्रतिक्रियांपलीकडे खरंच उद्धव ठाकरेंचे स्वबळ आणि त्याचा काँग्रेसवर होणारा परिणाम, याचा बारकाईने आढावा घेतला, तर काँग्रेसच्या पोटात गोळा का आला??, याचे “राजकीय रहस्य” उलगडता येईल.

2025 मध्ये मुंबई महापालिका निवडणूक होणे अपेक्षित आहे. पण त्यापूर्वी 2017 मध्ये झालेल्या किंवा अगदी त्याआधीच्या 2002 पर्यंतच्या निवडणुकांमधला आकडेवारीच्या धांदोळा जरी घेतला, तरी काँग्रेसची राजकीय स्थिती आकड्यांनी कशी घसरली हे उघडपणे दिसून येते. 2017 मध्ये शिवसेना अखंड होती भाजप बरोबर सत्तेवर होती. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस होते. पण त्यावेळी मुंबई महापालिकेचे निवडणूक शिवसेना आणि भाजप यांनी स्वतंत्रपणे लढवली होती. त्यामुळे सहाजिकच त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळणे अपेक्षित होते.

पण प्रत्यक्षामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्या टकरीचे घामासन एवढे माजले की, हे दोन पक्ष 84 आणि 82 जागांवर पोहोचले. त्या उलट काँग्रेस आधीच्या 2012 च्या निवडणुकीच्या तुलनेत 52 वरून 31 जागांवर घसरली. याचा अर्थ जी काँग्रेस एकेकाळी मुंबई महापालिकेत 227 जागांपैकी मोठ्या बहुमतात असायची, ती काँग्रेस 31 जागा पर्यंत खाली आली. त्या उलट शिवसेना आणि भाजप या दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये मोठी लढत होऊन देखील हे दोन्ही पक्ष 84 आणि 82 अशा जागांवर पोहोचले.

2025 च्या संपूर्णपणे बदललेल्या राजकीय परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी जो स्वबळाचा नारा दिला आहे, त्याचे मूळ 2017 च्या निवडणुकीच्या आकडेवारीत आहे. भले आज त्यांची शिवसेना फुटली असेल, त्यातला मोठा भाग एकनाथ शिंदे घेऊन गेले असतील, पण म्हणून उद्धव ठाकरेंना महापालिका निवडणूक लढविण्यासाठी शिवसैनिकांची कमतरता भासणार नाही. उलट तिकीट वाटपासाठी इच्छुकांची जास्तीत जास्त भरती करण्याचा “डाव” उद्धव ठाकरे खेळू शकतील. तो “डाव” काँग्रेसवरच शेकायची भीती खासदार वर्षा गायकवाड यांच्यासारख्या नेत्यांना वाटते.

भाजपच्या बाबतीत देखील हाच “डाव” वेगळ्या प्रकारे “वर्क” होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. उद्धव ठाकरेंची शिवसेना असो किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना असो, या दोन वगळून सुद्धा बाकीच्या पक्षातले इच्छुक “जिंकून येण्याची क्षमता” आणि “जिंकून आणू शकणारे चिन्ह” या निकषावर भाजपकडे वळू शकतात. “जिंकून येण्याची क्षमता” आणि “जिंकून आणू शकणारे चिन्ह” या निकषांवर धनुष्यबाण आणि मशाल ही दोन्ही चिन्हे मुंबई महापालिका परिक्षेत्रातल्या 227 जागांवर चालू शकतात.

*त्या उलट आता काँग्रेसचे संघटनात्मक बळ एवढे कमी झाले आहे की, काँग्रेसला स्वबळावर निवडणूक लढवायला लागली, तर त्यांना “जिंकून येण्याची क्षमता” असलेले उमेदवार किती मिळतील??, हा खरा सवाल आहे. त्याचबरोबर “हाता पंजा” हे आता “जिंकून आणू शकणारे” चिन्ह उरलेले नाही.
काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर आणि राजकीय तत्त्वज्ञानाच्या पातळीवर गेल्या काही वर्षांमध्ये जे स्वतःचे मोठे नुकसान करून घेतले, त्यामध्ये त्यांनी फक्त मुस्लिम पॉकेट्स वर कॉन्सन्ट्रेट करणे हे कारणीभूत ठरले. त्याऐवजी काँग्रेसने मूळातली सर्वसमावेशक धर्मनिरपेक्ष भूमिका घेतली असती, ती कायम राखून संघटनात्मक बळकटी टिकवून धरली असती, तर उमेदवारांची संख्या या विषयाची चिंता काँग्रेसला करावी लागली नसती.*

– बंदूक कुणाच्या खांद्यावर??

2025 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे हे खरे दुखणे आहे. काँग्रेस “पॉलिटिकल कंपल्शन” म्हणून स्वबळावर लढेल देखील, पण ती किती जागांवर लढेल आणि “निवडून येण्याची क्षमता” असणारे किती उमेदवार देऊ शकेल??, हा पक्षाच्या नेत्यांसाठी सगळ्यात मोठा चिंतेचा विषय असेल. त्याउलट उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला नसता, तर त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसी नेत्यांनी उमेदवारांच्या आकड्यांची जमवाजमव करून महाविकास आघाडीची म्हणून मुंबई महापालिका निवडणूक “मारून” नेली असती. पण उद्धव ठाकरे यांनी स्वबळ घोषित करून खांदा काढून घेतल्याने काँग्रेसला आता बंदूक कुणाच्या खांद्यावर ठेवायची??, याची चिंता भेडसावत आहे. “लढवय्ये” उमेदवार आणायचे कुठून ही उत्तरार्धातली चिंता आहे!!

Shivsena UBT breaks MVA, most worries for Congress

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात