Shivsena – NCP Feud : निधी वाटपात राष्ट्रवादीची आघाडी, पण भाजपशी पंगा घेताना राष्ट्रवादीची पिछाडी; मुख्यमंत्र्यांच्या “मुख्य” तक्रारी!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्रीय तपास संस्थांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात शिवसेना केंद्र सरकार विरुद्ध आणि भाजप विरुद्ध आक्रमकपणे लढत असताना राष्ट्रवादी काँग्रेस मात्र बचावात्मक पवित्र्यात आहे किंवा शिवसेनेच्या लढ्याकडे मुद्दामून दुर्लक्ष करत आहे, अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उघडपणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर घातल्या आहेत. Shivsena – NCP Feud NCP lags behind BJP

राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या आमदारांच्या निधी वाटपात आघाडीवर आहे, पण भाजपशी पंगा घेताना मात्र पिछाडीवर जाते अशी तक्रार मुख्यमंत्र्यांनी पवारांकडे केली आहे. त्याची उदाहरणेच मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांपुढे नावानिशी दाखवून दिली आहेत. राष्ट्रवादीचे काही नेते भाजपच्या नेत्यांशी वैयक्तिक संबंध साधून आहेत. त्यातूनच राष्ट्रवादी शिवसेनेच्या लढ्याकडे मुद्दामून दुर्लक्ष करते आहे. याचा शिवसेनेला राग आहे असे मुख्यमंत्री शरद पवारांना स्पष्ट म्हणाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे.



एकीकडे केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीतील नेत्यांना ठरवून टार्गेट करत असताना राष्ट्रवादीचे नेते बोटचेपी भूमिका घेत असल्याची नाराजी उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे. जेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपाला एकत्रितपणे टक्कर देण्याची वेळ आली तेव्हा राष्ट्रवादी हेतुतः बॅकफूटवर गेल्याच्या काही घटनाही उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.

– मुख्यमंत्र्यांनी नोंदविलेले आक्षेप :

  • १३ मार्चला मुंबई पोलिसांनी फोन टॅपिंग प्रकरणात भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना बीकेसीमधील सायबर विंगच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. पण तो निर्णय आयत्या वेळी बदलला आणि त्या ऐवजी फडणवीसांचा जवाब त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन पोलिसांनी नोंदवला त्यामुळे ठाकरे सरकारने माघार घेतल्याची बातमी आली. माघार प्रत्यक्षात राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांनी घेतली, पण बातमी ठाकरे सरकारने माघार घेतल्याची आली.
  • राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर शिवसेनेने भाजप वर प्रखर हल्लाबोल केला पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांकडे बोलताना दोन्ही बाजूंनी संयम राखावा आणि गोष्टी हाताबाहेर जाण्यापासून रोखावे असे सांगून मवाळ भूमिका घेतली
  • भाजपाच्या 12 आमदारांना सभागृहातून एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले. तेव्हा देखील अजित पवारांनी पुन्हा मवाळ भूमिका घेत आमदारांना काही तास किंवा एका दिवसासाठी शिक्षा होऊ शकते, पण १२ महिन्यांसाठी नाही असे म्हटले होते.
  • २८ मार्च रोजी राज्यसभा खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे स्तुती करणारे ट्विट केले. पण ही स्तुती करताना माजिद मेमन यांनी मुद्दामून विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या उणिवांवर बोट ठेवले.
  • भाजपा विरोधात फक्त शिवसेनाच स्वतःच्या आणि राष्ट्रवादीच्या वतीने लढत आहे. शिवसैनिक फ्रंटफूटवर जाऊन लढत असताना राष्ट्रवादी मात्र बॅकफूटवर दिसत आहे. राष्ट्रवादी कोणत्या भीतीपोटी भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेत नाही?, असा सवाल शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निधी वाटपात जास्तीत जास्त निधी ओढून घेण्यासाठी आघाडीवर आहे पण भाजपची पंगा घेताना मात्र पिछाडीवर जातील याबद्दल शिवसेनेत संताप असल्याचे नेत्यांनी सांगितले आहे.
  • केंद्रीय तपास संस्थांशी आणि भाजपशी पंगा घेताना राज्याची पोलिस यंत्रणा शिवसेनेला संपूर्णपणे आपल्या पद्धतीने वापरायची आहे. आणि तिथेच खरा वाद आहे. गृह खाते राष्ट्रवादीकडे असल्याने पोलिसांचा परिणामकारक वापर करता येत नसल्याचा शिवसेना नेत्यांचा गंभीर आरोप आहे. याची पुष्टी राष्ट्रवादीच्या एका नेत्याने देखील केली आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते भाजपच्या नेत्यांची “विशिष्ट वैयक्तिक संबंध” राखून आहेत आणि त्यामुळेच भाजप विरोधात आक्रमक भूमिका घ्यायला ते मागेपुढे पाहत राहतात, याकडे उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचे आवर्जून लक्ष वेधले आहे. हा एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी थेट शरद पवारांवर “राजकीय वार” केल्याचे मानले जात आहे. त्यामुळेच पवारांनी येत्या काही काळात बदल दिसेल, असे सूचक आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिल्याचे इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत नमूद केले आहे.

Shivsena – NCP Feud NCP lags behind BJP

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात