अनुभवी, राजकारणात मुरलेले पवार काका – पुतण्या “जे” टाळू शकले नाहीत, “ते” तरुण वरूण गांधींनी टाळून दाखविले, असे म्हणायची वेळ पवार काका – पुतण्या आणि वरूण गांधी यांच्या वेगवेगळ्या राजकीय कृतींनी आणली आहे. Pawars couldn’t avoid BJP sponsored family fight in baramati, but varun gandhi successfully avoided it in raibareli
याची कहाणी अशी :
वरूण गांधींना उत्तर प्रदेशात त्यांच्या मूळच्या पीलीभीत मतदारसंघातून भाजपने तिकीट नाकारले. मात्र, त्यांच्या मातोश्री मनेका गांधी यांना सुलतानपूर मधून तिकीट दिले. त्या तिथून निवडणूक लढवत आहेत.
वरूण गांधींचे गेल्या 3 वर्षांपासून भाजपच्या वरिष्ठांशी खटकत होतेच. केंद्रातील मोदी सरकारच्या काही धोरणांविषयी वरूण गांधी विरोधात बोलत होते. त्यामुळे त्यांचे तिकीट कापले जाणार, अशा अटकळी आधीच बांधल्या गेल्या होत्या. त्या खऱ्या ठरल्या आणि पीलीभीत लोकसभा मतदारसंघातून वरूण गांधींचे तिकीट कापले गेले.
पण ही कहाणी इथेच थांबत नाही. त्यापुढे जाऊन वरूण गांधींना भाजपने रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची ऑफर दिल्याची बातमी समोर आली. रायबरेली मतदारसंघात भाजपने दिनेश शर्मा, विनय कटियार आदी नेत्यांच्या उमेदवारीची चाचपणी केली, पण भाजप श्रेष्ठींच्या अपेक्षेबरहुकूम ती चाचपणी खरी उतरली नाही. त्यामुळे भाजपने वरूण गांधींना रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. वरूण गांधींनी आठवडाभर विचार करून ती ऑफर नाकारली.
दरम्यानच्या काळात काँग्रेस मधून रायबरेली इथून प्रियांका गांधी यांचे नाव पुढे आले. सोनिया गांधी यांच्या ऐवजी प्रियांका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवतील, अशा अटकळी बांधल्या गेल्या. या पार्श्वभूमीवर भाजपच्या अतिवरिष्ठांना रायबरेलीत “गांधी विरुद्ध गांधी” अशी लढत लावायची असल्याच्या बातम्या आल्या.
रायबरेली तसाही इंदिरा गांधी यांच्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. तो भेदणे बाकी कुठल्या पक्षाला अद्याप तरी शक्य झालेले नाही, पण भाजपने तिथे मजबूत उमेदवार देण्याचा प्रयत्न म्हणून वरूण गांधींकडे पाहिले आणि त्यांना निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. पण रायबरेलीत म्हणजेच आपल्या आजीच्या मतदारसंघात “गांधी विरुद्ध गांधी” अशी लढत होऊ शकते, याचा अचूक अंदाज बांधून वरूण गांधींनी भाजपने दिलेली ऑफर नाकारली. भाजपला हवी असलेली कौटुंबिक लढाई लढण्यास नकार दिला.
नेमका हाच प्रकार बारामतीच्या बाबतीत पवारांना टाळता आला नाही. शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळेच्या विरोधात तगडी फाईट द्यायची असेल, तर अजित पवारांना भरीस घालून त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली, तर आणि तरच अजित पवार बारामतीची लढाई प्रतिष्ठेची करून शरद पवारांकडून बारामतीचा बालेकिल्ला आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील, ही भाजप नेत्यांची अटकळ होती. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी बारामतीत सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध सुनेत्रा पवारांनाच लढवा हा अजित पवारांकडे आग्रह धरला आणि तो आग्रह अजित पवारांना मान्य करावा लागला.
खुद्द शरद पवारांना देखील सुप्रिया सुळे यांच्या ऐवजी “सरप्राईज कॅंडिडेट” म्हणून वेगळा उमेदवार देता आला नाही. त्यामुळे बारामतीत “पवार विरुद्ध पवार” ही लढाई लावण्याचा भाजपच्या नेत्यांचा डाव यशस्वी झाला. महाराष्ट्राच्या राजकारणात जुन्या लोणच्यासारखे मुरलेले पवार काका – पुतणे बारामतीत “पवार विरुद्ध पवार” ही “भाजप पुरस्कृत” लढाई टाळू शकले नाहीत. त्याउलट तुलनेने तरुण असलेल्या वरूण गांधींनी रायबरेली मध्ये भाजप पुरस्कृत “गांधी विरुद्ध गांधी” ही लढाई टाळून दाखविली, हे वरुण गांधींचे पवारांपेक्षा जास्त मोठे क्रेडिट ठरले!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App