नाशिक : शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच ठाकरे ब्रँड विरुद्ध हिंदुत्व ब्रँड यांच्यातील लढाई मुंबईत आमने-सामने आल्याने एक राजकीय विसंगती समोर आली. शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ठाकरे ब्रँड हिंदुत्व ब्रँडपासून अलग दाखविला गेला, जो वास्तविक कधी अलग करणे कुणालाही शक्य नव्हते. पण उद्धव ठाकरेंनी गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय वाटचालच अशी काही केली की त्यामुळे ठाकरे ब्रँड आणि हिंदुत्व ब्रँड एकमेकांपासून अलग झाले. त्याचेच पडसाद शिवसेनेच्या दोन वर्धापन दिनांमधून उमटले.
19 जून शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुंबईत ठाकरे ब्रँडचे फलक झळकले. त्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो लागले. मुंबई आणि महाराष्ट्रात फक्त ठाकरेच चालणार असा ब्रँड चालवणारी घोषणा या फलकांवर लिहिली गेली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन मेळावा ज्या षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे, त्या हॉलच्या परिसरात ठाकरे बँडचे मोठमोठे फलक झळकवले गेले आहेत. यातून निष्ठावंत शिवसैनिकांचा कुटुंब मेळावा अशी मोठी जाहिरातही केली गेली आहे. पण यामध्ये कुठेही हिंदुत्वाचा उल्लेख नाही. त्यामुळे ठाकरे हिंदुत्वापासून कायमचे दूर गेले की काय अशी शंका राजकीय वर्तुळात निर्माण झाली.
पण त्याच वेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वरळीमध्ये वर्धापन दिन मेळावा होतोय. त्यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने “हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी” असे हिंदुत्वाचे ब्रँडिंग करणारे फलक सगळीकडे झळकवले. यावर शिवसेनेच्या मोठ्या वाघा बरोबर एकनाथ शिंदे भगवा ध्वज घेऊन चाललेत असे व्यंगचित्र काढले यातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा आणि व्यंगचित्र कलेचा वारसा आपणच जपल्याचे दाखवून दिले.
महाराष्ट्रात महापालिका आणि जिल्हा परिषद आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन शिवसेनेचे मेळावे आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भाषणे महाराष्ट्रातल्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. एकीकडे उद्धव ठाकरेंच्या भाषणाची यासाठी उत्सुकता आहे इथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेची युती जाहीर करणार की शिवसेना स्वबळावर लढवण्याची घोषणा करणार?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
तर दुसरीकडे पडद्यामागून राज ठाकरे यांना शिवसेनेबरोबरच्या युतीत सामील करायचा खेळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने चालवल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची देखील मोठी उत्सुकता महाराष्ट्राला लागून राहिली आहे.
वास्तविक मुंबई महापालिका निवडणुकीची सूत्रे एकनाथ शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपविल्याची बातमी आली आहे, तर त्याच वेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सूत्रे आदित्य ठाकरे यांच्याकडे आहेत त्यामुळे शिवसेनेतल्या चौथ्या पिढीत मुंबई महापालिकेसाठी संघर्ष वाढणार अशीच चिन्हे दिसत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आदित्य ठाकरे यांची तसे ब्रॅण्डिंग केले आहे, पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने फलकांवर एकनाथ शिंदे यांचा फोटो झळकवून सध्या तरी श्रीकांत शिंदे यांचे ब्रॅण्डिंग टाळले आहे. तो पत्ता अजून शिंदेंनी उघड केलेला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App