विशेष प्रतिनिधी
मुंबई : आली आली, बऱ्याच दिवसांनी शरद पवार भाकरी फिरवण्याची बातमी आली. शरद पवार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकऱ्या फिरवणार अशी ही बातमी आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल 80 % स्ट्राइक रेट गाठल्यानंतर प्रचंड उत्साहात आलेल्या शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीत सगळा महाराष्ट्र पालथा घातला. त्यांनी महाविकास आघाडीमध्ये 87 जागा लढवल्या होत्या त्यापैकी 85 जागा निवडून आणण्याची घोषणा त्यांचे नातू रोहित पवारांनी केली होती. कोणत्याही स्थितीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणायचा निर्धार पवारांनी केला होता. त्यामुळे पवार आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांनी महाराष्ट्रात प्रचाराचा मोठा धुरळा उडवला होता.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल पूर्ण विपरीत लागले. पवारांना त्यांच्या राजकीय कारकीर्द सगळ्यात कमी म्हणजे फक्त 10 आमदार निवडून आणता आले. पक्षाचा पूर्ण धुव्वा उडाला. ठाकरे, पवार आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी पूर्ण कोलमडली.
या पार्श्वभूमीवर शरद पवारचा पक्षांतर्गत भाकरी फिरवण्याची बातमी आली. शरद पवार भाकरी फिरवणार, चाणक्य खेळी करणार, वस्ताद डाव टाकणार, अशा बातम्यांची भरमार लोकसभा निवडणुकीनंतर मराठी माध्यमांनी चालवली होतीच. पण विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा शरद पवारांच्या पक्षाबरोबरच मराठी माध्यमांनाही हबका बसला होता. त्यामुळे भाकरी फिरवण्याच्या बातम्या किंवा वस्ताद डाव टाकण्याच्या बातम्या मध्यंतरी थांबल्या होत्या.
छगन भुजबळ ते अभयसिंहराजे भोसले; राष्ट्रवादीतल्या खच्चीकरणाचे किस्से, त्यांच्याच नेत्यांनी चव्हाट्यावर आणले!!
पण नव्या वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेऊन पक्षाची फेरबांधणी करण्यासाठी पवार पक्षामध्ये वेगवेगळ्या संघटनेचे अध्यक्ष बदलणार, पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलणार, अशी बातमी आली आहे. येत्या 7 – 8 जानेवारी या दोन दिवसांमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाची बैठक होणार असून या बैठकीमध्ये राजकीय मंथन करून पवार पक्ष संघटनेत मोठे बदल करणार आहेत. त्यात नव्या रक्ताला वाव देऊन महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नव्याने उभारणी करू शकणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मोठ्या पदांवर बसवणार आहेत.
पण सवाल फक्त हा आहे की, आता पवारांच्या पक्षाचे फक्त 10 आमदार निवडून आल्यामुळे आणि त्यांची भाजप आणि अजित पवारांच्या सत्तेच्या वळचणीला जाण्याची घाई झाल्यामुळे पवारांनी फिरवण्या इतपत पक्षात भाकऱ्या उरल्या आहेत का?? पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करून शिल्लक राहिलेले मंत्री पटकावयच्या बेतात असल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे पवारांपुढे भाकऱ्या फिरवण्यापेक्षा आहेत ते नेते आणि कार्यकर्ते पक्षात टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. हे आव्हान पवार आणि सुप्रिया सुळे कसे पेलतात??, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App