महोत्सवांचा खर्च कमी, लोककलावंतांना संधी; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलारांचा मोठा निर्णय

खर्चाला कात्री लावत स्थानिक लोककलावंतांना अधिकाधिक संधी; आशिष शेलारांची माहिती

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक विभागानेही खर्चाला लगाम घालण्याचा निर्णय घेतला आहे. मोठे सोहळे आणि महोत्सव कमी करून आवश्यक तेवढेच कार्यक्रम घेण्यात येणार असून, स्थानिक लोककलावंतांना अधिकाधिक संधी देण्यावर भर दिला जाणार आहे. या माध्यमातून वाचणाऱ्या निधीपैकी २५ कोटी रुपये ऐतिहासिक बारवांच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागामार्फत वापरण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

सांस्कृतिक संचालनालयाच्या माध्यमातून दरवर्षी राज्यभरात हजारो कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक कार्यक्रमांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. काही कार्यक्रम पुढील वर्षी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या वर्षी होणारा अनावश्यक खर्च टाळून उपलब्ध निधीचा वापर अधिक गरजेच्या कामांसाठी केला जाणार आहे.

स्थानिक कलावंतांना मिळणार व्यासपीठ

मोठ्या आणि खर्चिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमाण कमी करताना स्थानिक लोककलावंतांना संधी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्याच्या विविध भागांतील लोककला, पारंपरिक कला आणि स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीचा फटका शेतकरी, विद्यार्थी, पशुधन तसेच लोककलावंतांना बसू नये, यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना करण्यात येत असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.

२५ कोटी बारव संवर्धनासाठी

सांस्कृतिक कार्यक्रमांवरील खर्चात कपात केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या निधीपैकी २५ कोटी रुपये ऐतिहासिक बारवांच्या संवर्धनासाठी देण्यात येणार आहेत. हा निधी पुरातत्त्व विभागामार्फत वापरण्यात येणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.

बारव हे केवळ ऐतिहासिक वास्तू नसून पारंपरिक जलव्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे बारवांचे संवर्धन करताना केवळ त्यांचा ऐतिहासिक वारसा जपण्याऐवजी पाण्याचे नियोजन आणि जलसंधारणाच्या दृष्टीनेही त्यांचा उपयोग कसा करता येईल, याचा विचार करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्याचे शेलार यांनी सांगितले.

रस्ते सफाईसाठी टँकरच्या वापराबाबत माहिती नाही

मुंबईतील रस्ते सफाईसाठी टँकरचा वापर केला जात असल्याबाबत विचारणा केली असता, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. या विषयावर मुंबई महापालिका योग्य ते स्पष्टीकरण देईल, असे त्यांनी सांगितले.

मात्र, सार्वजनिक पैशांचा वायफळ खर्च होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मुंबईतील रस्ते स्वच्छ ठेवणेही गरजेचे असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.

‘प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एमपीएससीच्या प्रश्नावर घेतलेल्या भूमिकेबाबत शेलार यांना विचारले असता, प्रत्येक पक्षाला आणि व्यक्तीला आपले मत मांडण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्या आंदोलनात सहभागी व्हायचे, हेदेखील प्रत्येक व्यक्ती ठरवू शकते.

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार काम करत असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी शासनाकडून आवश्यक पावले उचलली जात असल्याचेही शेलार यांनी स्पष्ट केले.

‘अफवांचे पीक पसरवून प्रदूषण’

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इगोमुळे निर्णय घेत नसल्याची टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना शेलार यांनी रोहित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

काही जण अफवांचे पीक पसरवून वातावरणात प्रदूषण करण्याचे काम करत असल्याचा टोला शेलार यांनी लगावला. सरकार निर्णय घेत असून, विविध प्रश्नांवर आवश्यक त्या पातळीवर कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

इंडिया आघाडीच्या मोर्चावरही टीका

इंडिया आघाडीच्या प्रस्तावित मोर्चाबाबतही शेलार यांनी विरोधकांवर टीका केली. विरोधक राजकीय हेतूने मोर्चे काढत असल्याचा आरोप करत, त्यांच्या आंदोलनाची भूमिका मतदारांच्या हिताची आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

विरोधकांनी किती बीएलए (बूथ लेव्हल एजंट) नियुक्त केले आहेत, हे आधी सांगावे. निवडणूक आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहत नाहीत आणि त्यानंतर विविध प्रश्न उपस्थित करतात. ही भूमिका ‘वरातीमागून घोडे’ अशीच म्हणावी लागेल, अशी टीका शेलार यांनी केली.



आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरही काँग्रेसला सवाल

आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकार त्यांच्या पाठीशी असून, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शेलार यांनी सांगितले. मात्र, आदिवासी विद्यार्थ्यांना काँग्रेसच्या कार्यालयात का ठेवण्यात आले, याचे उत्तर काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी द्यावे, असा सवाल त्यांनी केला.

आदिवासी विद्यार्थ्यांना काँग्रेस कार्यालयात डांबून ठेवण्यात आल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना शेलार यांनी, ‘स्वतःच्या राजकीय चष्म्याची काच साफ करा,’ असा टोला लगावला.

‘९६ लाख बोगस मतदारांचा दावा नेमका कशाच्या आधारावर?’

मतदार यादीतील कथित बोगस मतदारांच्या संख्येवरूनही शेलार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ऑक्टोबर २०२५ पासून विरोधकांनी याबाबत पाच वेळा केलेली वक्तव्ये तपासली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

आता ९६ लाख बोगस मतदार असल्याचा दावा केला जात असेल, तर या दाव्यामागील नेमकी भूमिका आणि आकडेवारी आधी स्पष्ट करावी, असे शेलार यांनी म्हटले. मतदार यादीबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी त्यासंदर्भातील ठोस माहिती आणि पुरावेही समोर ठेवावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक खर्चात कपात, स्थानिक कलावंतांना संधी आणि बारव संवर्धनासाठी निधीचा वापर या निर्णयामुळे सांस्कृतिक विभागाच्या आगामी कार्यक्रमांचे स्वरूप बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी एमपीएससी, आदिवासी विद्यार्थी आणि मतदार यादीच्या मुद्द्यांवरून शेलार यांनी विरोधकांवर केलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरणही तापण्याची चिन्हे आहेत.

Reduced festival costs, opportunities for folk artists; Ashish Shelar’s major decision against the backdrop of drought.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात