पैसे देऊन आमदार झाल्याचा आरोप, माझ्या नादाला लागू नका : विक्रम काकडे यांचा उमेश पाटलांना थेट इशारा

Vikram Kakade

विशेष प्रतिनिधी

पुणे : पैसे देऊन आमदार झाल्याच्या कथित वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात वादाची ठिणगी पडली आहे. पक्षाचे विधान परिषद सदस्य विक्रम काकडे यांनी पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्यावर थेट निशाणा साधत, “माझ्या नादाला लागू नका,” असा इशारा दिला.

मावळमध्ये आमदार सुनील शेळके यांच्या वतीने आयोजित पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना काकडे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले.

“मी पैशांच्या जोरावर आमदार झालो, अशी चर्चा केली जात आहे. पण पवार कुटुंबाला विकत घेऊन आमदार होणारा माणूस महाराष्ट्रात अजून जन्माला यायचा आहे,” असे काकडे म्हणाले.
उमेश पाटील यांच्यावर थेट टीका करताना काकडे म्हणाले, “सोलापूरहून एक पार्सल आले आहे, त्याचे नाव उमेश पाटील. त्यांनी मी पैसे देऊन आमदार झालो, असे म्हटले आहे. उमेश पाटील, माझ्या नादाला लागू नका.”



अशा प्रकारचे आरोप वारंवार केले गेले तर खोटी गोष्टही कालांतराने खरी वाटू लागते, म्हणूनच आपण सार्वजनिकरित्या उत्तर देत असल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले.
पवार कुटुंबाला पैसे देऊन आपल्याला राजकीय संधी मिळाल्याचा आरोपही त्यांनी फेटाळला.

“काही लोक म्हणतात की विक्रम काकडे पैशांच्या जोरावर आमदार झाला, त्याने पवारांना पैसे दिले. पण अजित पवार यांच्याशी माझे काय संबंध आहेत, हे त्यांना माहीत नाही. पार्थ पवार माझा लहानपणापासूनचा मित्र आहे,” असे काकडे म्हणाले.

स्वतःच्या पक्षातूनच अशा प्रकारचे आरोप होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.“आपल्याच पक्षातील लोक असे बोलतात, याचे वाईट वाटते. पवार कुटुंबाला विकत घेऊन आमदार होणारा महाराष्ट्रात अजून जन्माला आलेला नाही. अशी वक्तव्ये बंद करा. पार्थ पवार यांचे कान भरणे बंद करा,” असा इशाराही काकडे यांनी दिला.

आपण सामान्यतः अशा भाषेत बोलत नसल्याचे सांगत त्यांनी पुन्हा एकदा उमेश पाटील यांना उद्देशून, “मी स्पष्टपणे सांगतो, माझ्या नादाला लागू नका,” असे म्हटले.

Vikram Kakade hits back over ‘money-for-candidature’ allegation

 

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात