दिशा सालियन प्रकरणातील तपासाबाबत हायकोर्टाच्या निकालातील काही निरीक्षणे वगळण्याची मागणी; याचिकेवर लवकरच सुनावणीची शक्यता
विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिचे वडील सतीश सालियन यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने सीबीआयकडे तपास सोपवताना दिलेल्या निकालातील काही निरीक्षणे वगळण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी नव्या याचिकेत केली आहे. विशेषतः, तपासातून एखाद्या व्यक्तीविरोधात वाजवी संशय घेण्याइतपत पुरेशी कारणे उपलब्ध होईपर्यंत त्या व्यक्तीला आरोपी मानू नये, या न्यायालयाच्या निरीक्षणावर त्यांनी आक्षेप घेतला आहे.
सतीश सालियन यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, या निरीक्षणामुळे संभ्रम निर्माण होत असून, ज्याच्याविरोधात औपचारिक आरोप करण्यात आले आहेत, अशा व्यक्तीला आरोपी म्हणून संबोधण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या विविध आदेशांमध्ये भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. संबंधित निरीक्षणाचा प्रमुख आरोपींकडून गैरवापर होण्याची शक्यता असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.
या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
हायकोर्टाने सीबीआयकडे सोपवला तपास
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला आहे. सीबीआयने नियमित गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
२ सप्टेंबर रोजी निकाल जाहीर करताना न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोंसले यांच्या खंडपीठाने तपासादरम्यान सबळ पुरावे मिळण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीला आरोपी ठरवू नये, असे निरीक्षण नोंदवले होते.
न्यायालयाच्या आदेशानुसार, सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार असून, ते याचिकाकर्त्याचा जबाब नोंदवतील आणि त्यानुसार नियमित गुन्हा दाखल करून तपास करतील. दिशा सालियन यांच्या मृत्यूशी संबंधित सर्व बाबींचा तपास करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
तपासादरम्यान जमा होणाऱ्या पुराव्यांच्या आधारे एखाद्या व्यक्तीविरोधात वाजवी संशय घेण्याइतकी पुरेशी कारणे उपलब्ध असल्याचे तपास अधिकाऱ्याला वाटल्यास त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
गुन्हा आढळल्यास अहवाल, अन्यथा अंतिम अहवाल
सीबीआयचा तपास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील तरतुदींनुसार केला जाणार आहे. तपासात गुन्हा घडल्याचे निष्पन्न झाल्यास सक्षम न्यायालयासमोर योग्य अहवाल सादर केला जाईल. तपासात गुन्हा घडल्याचे आढळले नाही, तर अंतिम अहवाल सादर केला जाईल. Satish Salian
अशा अंतिम अहवालाला आव्हान देण्यासाठी याचिकाकर्त्याला निषेध याचिका दाखल करण्याचा अधिकार असल्याचेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मालवणी पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी तपासाशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि वस्तू सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
२८ ऑगस्ट रोजी राखून ठेवलेला निकाल २ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला होता. निकाल जाहीर झाल्यानंतर न्यायालयात उपस्थित असलेल्या सतीश सालियन यांनी हात जोडून न्यायालयाचे आभार मानले होते.
मृतदेह आणि वैद्यकीय पुराव्यांवरूनही प्रश्न
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिशा सालियन यांच्या मृतदेहासंदर्भातील पंचनामा आणि वैद्यकीय नोंदींवरूनही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले होते. दिशाच्या मृतदेहावर कपडे नसल्याचा उल्लेख रुग्णालयातील पंचनाम्यात असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावर संबंधित डॉक्टरांचा जबाब नोंदवण्यात आला आहे का, असा सवाल न्यायालयाने सरकारी वकिलांना केला होता.
सरकारी वकील शिशिर हिरे यांनी या दाव्यात तथ्य नसल्याचे सांगत दिशाचा रुग्णालयातील फोटो न्यायालयासमोर सादर केला होता. या फोटोमध्ये दिशा कपड्यांमध्ये असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी न्यायालयाने मृत्यूच्या परिस्थितीशी संबंधित जखमांबाबतही प्रश्न उपस्थित केले. त्यावर दिशा उंचावरून पडताना तोंडावर पडली होती, तिच्या कवटीला फ्रॅक्चर झाले होते तसेच जबड्याला गंभीर दुखापत झाली होती, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली. अन्य जखमाही असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
या प्रकरणात कोणताही निष्कर्ष आताच काढायचा नसून, घटनाक्रमात संशय घेण्यासारखे काही आहे का, याचा तपास होणे महत्त्वाचे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते.
मुंबई पोलिसांच्या तपासावरही गंभीर आरोप
सतीश सालियन यांनी आपल्या याचिकेत मुंबई पोलिसांच्या तपासावरही गंभीर आरोप केले आहेत. दिशा सालियन यांचा मृतदेह बंद दाराआडून हलवून बाहेर फेकण्यात आला आणि त्यांनी १४व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र घटनास्थळाशी संबंधित अनेक बाबींमध्ये विसंगती असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
दिशाच्या मृतदेहावर घटनेशी संबंधित अपेक्षित खुणा नसल्याचा दावा करत, शवविच्छेदनास ५० तासांचा विलंब करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच कुटुंबीयांना घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यास भाग पाडण्यात आल्याचा दावा याचिकेत आहे.
घटनेच्या दिवशी संबंधित इमारत आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याचा तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही व्यक्तींचे मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल रेकॉर्ड तपासण्यात आले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
‘मुलीचा मृत्यू अपघाती नसल्याचा दावा’
दिशा आपल्या करिअरबाबत गंभीर होती आणि ती आत्महत्या करेल, असे वाटत नसल्याचे सतीश सालियन यांनी याचिकेत म्हटले आहे. सुरुवातीला तिचा मृत्यू अपघाती असल्याचे भासवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा दावा सतीश सालियन यांनी याचिकेत केला आहे. तत्कालीन मुंबई महापौर किशोरी पेडणेकर आणि मालवणी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडून कुटुंबावर दबाव आणण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मुंबई पोलिसांनी दिशा सालियन यांच्या कथित सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पुरावे दडपण्यासाठी साक्षी, न्यायवैद्यक अहवाल आणि शवविच्छेदन अहवालात फेरफार केल्याचा गंभीर आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.
मात्र, हे सर्व आरोप सध्या याचिकाकर्त्यांनी केलेले दावे आहेत. त्यांची सत्यता तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे. आता उच्च न्यायालय या नव्या याचिकेवर काय भूमिका घेते आणि निकालातील संबंधित निरीक्षणांबाबत कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App