विशेष प्रतिनिधी
मुंबई: काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक अखेर बिनविरोध होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसकडून रजनी पाटील यांची निवड निश्चित झाली आहे.Rajya Sabha by-election finally unopposed; Congress’ Rajni Patil’s election is certain
काँग्रेसकडून पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भाजपाने या निवडणुकीसाठी संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती. मात्र, महाराष्ट्राच्या परंपरेनुसार ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देत आणि राज्याची परंपरा कायम राहावी, यासाठी भाजपाचे उमेदवार संजय उपाध्याय त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत.
काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेत निवडणूक बिनविरोध व्हावी, यासंदर्भात विनंती केली होती. विनंतीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि कोअर कमिटीशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
त्यानंतर आज संजय उपाध्याय उमेदवारी अर्ज मागे घेतील, असं जाहीर करण्यात आले असल्याने आज दुपारी ते विधीमंडळात जाऊन अर्ज माघारी घेणार आहेत. राजीव सातव यांचे काही महिन्यांपूर्वी करोनाने निधन झाले. यानंतर त्यांची राज्यसभेतील जागा रिक्त झाली.
या जागेसाठी सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांच्या नावाचाही विचार सुरू होता. यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांचीही नावं चर्चेत होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App