विशेष प्रतिनिधी
सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा – ओबीसी संघर्ष संपवण्यासाठी शरद पवारांनी सर्वपक्षीय बैठकीचे दिलेले निमंत्रण हे लबाडाघरचे आवताण आहे, अशा परखड शब्दांत ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके आज जोरदार तोफ डागली. मनोज जरांगे नावाचा भस्मासूर कोणी उभा केला??, तो भस्मासूर महाराष्ट्रातले वातावरण बिघडवत असताना पवार दोन वर्षे शांत का बसले??, असे बोचरे सवाल लक्ष्मण हाके यांनी केले, इतकेच नाही तर विधानसभा निवडणूक जवळ येताच मतदानापूर्वी मनोज जरांगे हे त्यांना चावी देणाऱ्या पक्षाला पाठिंबा देऊन मोकळे होतील, असे भाकित लक्ष्मण हाके ( laxman Hake ) यांनी वर्तविले. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.
लक्ष्मण हाके म्हणाले :
गेली दोन वर्षे महाराष्ट्राचे वातावरण दूषित होत असताना शरद पवार हे शांत का होते?? आता त्यांनी विधानसभेच्या तोंडावर केलेले सर्वपक्षीय बैठकीचे आवाहन म्हणजे लबाडाघरचे आवताण आहे. पवारांना आज सर्वपक्षीय बैठक सुचली, पण मग मनोज जरांगे नावाचा भस्मासूर या महाराष्ट्रात कोणी उभा केला?? जरांगे नावाचा हा भस्मासूर एवढा मोठा होऊन समाजातील वातावरण बिघडत जाणे हे पवार आणि महाराष्ट्र दोघांसाठीही त्रासदायक आहे. पुलाखालून एवढे पाणी वाहून गेल्यावर आता अशा पद्धतीचे पवारांचे वक्तव्य म्हणजे म्हातारपणी शृंगार केला या ग्रामीण भागातील म्हणीप्रमाणेच आहे.
गेले वर्षभर राज्यात अराजकता असताना बीड सारखे शहर जळत असताना तुम्ही लोकसभेत माणसे निवडून आणून फक्त स्वतःची पोळी शेकली. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला सर्वपक्षीय बैठकीचे हे शहाणपण सुचले का??
तुम्ही पुरोगामी नेते आहात, तर संविधानाला अपेक्षित असणारी भाषा बोला ना, तुम्ही एकत्रित बसून निर्णय घ्या असली भाषा तुम्ही करणार असाल आणि संविधानाच्या विरोधात कोणाची मागणी असेल तर ती ओबीसी कदापी मान्य करणार नाही.
मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली, तर आम्ही नक्की जाऊ, पण तिथे संविधानाची आणि कायद्याचीच भाषा बोलू. कोणी तरी गरीब झालाय म्हणून त्याला ओबीसींमधून आरक्षण द्या म्हणाल तर ते अजिबात चालणार नाही. आम्ही ते चालवू देणार नाही. यासाठी रस्त्यावरची , बॅलेटची सर्व प्रकारची लढाई लढण्यास ओबीसी तयार आहेत.
जरांगे बिनबुडाचा लोटा : लक्ष्मण हाके
जरांगेनी काय कोणाला पाडावे त्यांनी एकट्याने उभे राहून दाखवावे असे आवाहन देत त्यांचा प्रोग्रॅम ठरलेला असून त्यांचा रिमोट कंट्रोल चालवणारा महाराष्ट्रातला नेता आहे. त्यांच्या पक्षाला पाठिंबा देतील असा थेट आरोप जरांगे यांच्यावर केला. तो पाठिंबाही निखळ नसून तोही 96 कुळी, 92 कुळीला देतील आणि त्या पक्षाचा कोणी ओबीसी असेल तर त्याचा पराभव करतील, असा टोला लक्ष्मण हाके यांनी हाणला. यासाठी त्यांनी लोकसभेला छत्रपती संभाजीनगर मधून महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला याचे उदाहरण दिले. जरांगे दर 10 मिनिटाला आपली भूमिका बदलतो. तो बिनबुडाचा लोटा आहे.
गेल्या काही महिन्यापासून ओबीसी आपल्या बाजूने कोण बोलले कोणी पाठिंबा दिला याचे ऑडिट करत असून अशा कोणत्याही आमदाराला मतदान करायचे नाही हा आमचा निर्णय आहे. कधीही महाराष्ट्रात जनगणना केली तरी 50 ते 60 % आम्ही ओबीसी असून आमची ताकद या विधानसभेत दिसेल असा इशाराही हाके यांनी दिला. ओबीसी समाज असंघटित आहे या भ्रमात कोणी राहू नये या विधानसभेला आपल्या हक्कासाठी समाज नक्कीच योग्य ठिकाणी मतदान करून ताकद दाखवेल, असा विश्वास हाके यांनी व्यक्त केला .
जरांगे नावाच्या खुळखुळ्याला आम्ही अजिबात स्थान देत नाही : लक्ष्मण हाके
ओबीसी घाबरला म्हणणाऱ्यांनी नक्की निकाल पाहावेत असे सांगताना जरांगे नावाच्या खुळखुळ्याला आम्ही अजिबात स्थान देत नाही. हा भस्मासूर महाराष्ट्र आणि पवार नावाच्या पुरोगामी राजकारण्याचे राजकारण देखील उद्ध्वस्त करेल, असा इशाराही हाके यांनी दिला. आम्ही पहिले मतदान ओबीसीला आणि दुसरे मतदान एस्सी आणि एसटी यांना करायला लावणार आहे. आपले हक्क आणि आरक्षण वाचवण्याचे आवाहन आम्ही सर्व समाजबांधवांना करून एकत्रित मोट बांधणार मग होऊन जाऊदे दूध का दूध असे आव्हान लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना दिले
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more