प्रतिनिधी
संभाजीनगर : आदित्य ठाकरे जसे बंडखोर आमदारांना गद्दार, पाठीत खंजीर खुपसणारे असे संबोधून एकेकाला टार्गेट करत आहेत, तसे बंडखोर आमदार खासदार देखील आता जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. खासदार राहुल शेवाळे, आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांची नावे घेऊन त्यांना टार्गेट केले आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री सुभाष देसाई देखील बंडखोर आमदारांच्या टार्गेटवर आहेत. Not only Aditya Thackeray, but also Subhash Desai targeted by rebels
माजी पालकमंत्री सुभाष देसाई हे विकास निधीसाठी जिल्ह्यातील आमदारांकडून 10 % कमीशन घ्यायचे, असा आरोप वैजापूर मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांनी केला आहे. 1 कोटींचा निधी दिला तर ते त्यासाठी 10 लाख रुपये कमीशन मागायचे, त्यांनी माझ्याकडून 10 % कमीशन घेतले, असा आरोप बोरनारे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.
पुढे बोलताना बोरनारे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार असताना विकासनिधीसाठी शिवेसेना नेत्यांनी नेहमीच आडकाठी केली. त्यामुळे राज्यभरातील शिवसेना आमदारांनी उठाव केला. आम्हाला जिथे अडचण आली, त्यावेळी आम्ही एकनाथ शिंदेंकडे तक्रार करायचो. त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही बाहेर पडलो. आमच्यावर ठाकरे कुटुंबीयांनी काही जरी आरोप केले तरी आम्ही काही बोलणार नाही, आमच्यावरील होणारा अन्याय एकनाथ शिंदे यांनी दूर केला.
– चमच्यांना सोडणार नाही
शिवसेना वाढवण्यासाठी आम्ही 25 वर्षे रक्त आटवले. राष्ट्रवादीसोबत आघाडी केली तेव्हा भाजपने आम्हाला गद्दार म्हटले. आता आम्ही भाजपशी युती केली आहे. ठाकरे कुटुंबीय आता आमच्यावर आरोप करत आहेत. आदित्य ठाकरे आम्हाला वारंवार गद्दार म्हणत आहेत, मात्र ठाकरे कुटुंबाबद्दल आम्ही बोलणार नाही पण त्यांच्या चमच्यांना सोडणार नाही, असा इशारा बोरनारे यांनी दिला.
– खैरेंना उघडे पाडू
शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बंडखोरांवर टीकास्त्र सोडले आहे. सत्तेच्या लालसेपायी आणि दबावापोटी आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. त्यावर उत्तर देताना बोरनारे म्हणाले की, चंद्रकांत खैरे खूप बोलतात, पण एक दिवस त्यांचे कपडे उतरविन, मला त्यांच्याबद्दल खूप माहिती आहे, ती कधी ना कधी बाहेर काढणारच.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App