विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेसाठी इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. इच्छुकांना स्वत:च्या परिचयपत्रासह मतदारसंघातील जातीनिहाय मतदारांची माहिती सादर करावी लागेल. 7 ऑगस्टपासून आंतरवाली सराटी येथे अर्ज स्वीकारला जाणार आहे. अर्जाच्या छाननीसाठी 11 किंवा 21 सदस्यांची कोअर समिती स्थापन केली जाणार आहे. ती अर्ज छाननी करून जरांगेंना माहिती देईल. मग जरांगे उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम निवड करतील, अशी माहिती समोर आली आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणे, सगेसोयरे कायदा लागू करावा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत आदी मागण्या जरांगेंनी राज्य सरकारकडे केल्या आहेत. परंतु, सरकारने केवळ 10 टक्के आरक्षण दिले. ते जरांगेंना मान्य नाही. ओबीसीतूनच आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ती मान्य होणार नाही, असे स्पष्ट होत असल्याने त्यांनी विधानसभेसाठी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी इच्छुकांना 7 ऑगस्टपासून जरांगे यांच्या कोअर कमिटीकडे परिचयपत्र आणि मतदारसंघांचा जातीनिहाय आढावा सादर करावा लागणार आहे. मतदारसंघातील सत्ताधारी व विरोधी पक्षांची व्यूहरचना इच्छुक उमेदवाराला माहिती असली पाहिजे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मतदारसंघात उमेदवार कशा पद्धतीने प्रचार करणार, याचीही माहिती घेतली जाणार आहे.
7 ऑगस्टपासून राज्याचा दौरा
जरांगे 7 ऑगस्टपासून सोलापूर येथून राज्याचा दौरा सुरू करत आहेत. त्यांनी सांगितले की, शांतता रॅलीसाठी मराठा समाज एकत्र येणार आहे. त्यापूर्वी मी पुण्याला जाणार आहे. न्यायालयाचा सन्मान केलाच पाहिजे. न्यायमंदिर न्याय देते व मलाही न्याय मिळेल. सरकारशी खेटायला मी खंबीर आहे. सरकारने आम्हाला वारंवार गुंतवण्याचा प्रयत्न केला. मात्र मी मागे हटणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App