विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mahavikas Aghadi विधानसभा निवडणुकीतील हाराकिरीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीत उमेदवारांनी स्वबळाची भाषा केली आहे. यामु्ळे विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाला आहे.Mahavikas Aghadi
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अवघ्या 49 जागा मिळाल्या. त्यातही शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वाट्याला अवघ्या 20 जागा आल्या. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीचा सामना करणाऱ्या या पक्षामध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा आग्रह धरला आहे.
काही उमेदवारांचा वेगळा सूर
ठाकरे गटाच्या निवडणूक लढवलेल्या उमेदवारांची मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीत काही उमेदवारांनी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढवण्याची मागणी केली, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली. ते म्हणाले, शिवसेना पक्षातील काही नेत्यांचा सूर आहे की, आपण स्वतंत्रपणे लढले पाहिजे. एक – दोन नव्हे तर अनेकांनी असे मत व्यक्त केले आहे. शिवसेनेने स्वतंत्र वाटचाल केली पाहिजे. शिवसेनेला सत्ता हवी आहे असे काहीही नाही. पण कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याची भावना व्यक्त केली आहे.
अंबादास दानवे यांनी यावेळी अनेक पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केल्याचेही सांगितले. आमच्या पक्षाच्या बैठकीत विजयी उमेदवारांच्याही अनेक तक्रारी होत्या. अनेक ठिकाणच्या मतांमध्ये प्रचंड तफावत आहे. या सर्वांचा विचार केला तर कुठेतरी पाणी मुरत असल्याचे स्पष्ट होते. मतदान बॅलेट पेपरवर व्हावे अशी आमची मागणी आहे. या प्रकरणी देशपातळीवर आंदोलन झाले पाहिजे. निवडणूक आयोगाने कन्नड मतदारसंघातील घटनेवर पारदर्शकपणे उत्तर द्यावे, असे ते म्हणाले.
मोदींना स्वतःचा पक्ष सांभाळण्याचा सल्ला
अंबादास दानवे यांनी यावेळी शिवसेनेच्या पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी स्वतःचा पक्ष सांभाळावा. भाजपला 132 जागा जिंकूनही स्वतःचा मुख्यमंत्री ठरवता येत नाही. त्यांनी ते पहावे. याच शिवसेनेने लोकसभेत काँग्रेसच्या मदतीने तुमच्या नाकी नऊ आणले होते.
कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न – वडेट्टीवार
दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेवरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही विधानसभा निवडणूक आघाडी म्हणून लढलो. आता निकालानंतर कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आमची काय भूमिका आहे? हे आमचे प्रदेशाध्यक्ष सांगतील, पण आम्ही या प्रकरणी कोणतीही घाई करणार नाही. काँग्रेस हायकमांडशी चर्चा झाल्यानंतर या प्रकरणी योग्य तो निर्णय घेतला जाईल. हा सर्वस्वी इच्छेचा प्रश्न आहे, असे ते म्हणाले. ठाकरे गटाची स्वबळाची इच्छा असेल तर आमचीही तीच भावना आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App