विशेष प्रतिनिधी
मुंबई : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना उद्या दुपारी 2.00 वाजेपर्यंत बंद पाळण्याचे आवाहन केले. पण त्यांच्या या आवाहनाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. Maharashtra Bandh cancelled
या याचिकेवर तातडीने सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई हायकोर्टाने हा बंद बेकायदेशीर ठरविला. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा, असा आदेश मुंबई हायकोर्टाने सरकारला दिला. हायकोर्टाच्या आदेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना बंद मागे घेण्याचे आवाहन केले. शरद पवारांनी ट्विट करत भूमिका मांडली.
त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. हा बंद महाराष्ट्रातील महिला अत्याचार, मुलींवरचे अत्याचार होत असताना सरकारच्या निष्क्रियतेविरोधात होता. न्यायालय आंदोलनाला कसे बेकायदेशीर ठरवू शकते?? हे न्यायालयात ब्रिटिश काळात असते तर चले जावची चळवळ बेकायदेशीर ठरवली असती. स्वातंत्र्य संग्राम बेकायदेशीर ठरवला असता. या देशात जुलूमशाही, हुकूमशाही सुरु आहे. न्यायालयाने राज्य घटनेचा आदर करुन लोक आंदोलन चिरडता कामा नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे, असे संजय राऊत म्हणाले.
Prithviraj Chavan : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट; दोघांत बंद दाराआड चर्चा
– फडणवीसांनी एक याचिकाकर्ता पाळून ठेवलाय’
लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. संविधानाने दिलेला अधिकार आहे. ही दडपशाही कुणालाच करता येत नाही. कुणीतरी सोम्या, गोम्या याचिकाकर्ता, त्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कोर्टात पाठवतात, तो नेहमीचा आहे, तो मराठ्यांच्याविरोधात जातो, ओबीसींविरोधात कोर्टात जातो, बंदच्या विरोधात तो जातो, देवेंद्र फडणवीसांनी एक याचिकाकर्ता पाळून ठेवलेला आहे, तो न्यायालयात जातो आणि न्यायालय निर्णय देते, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली.
सरकार बेकायदेशीर आहे. त्यावर कुणी निर्णय देत नाही. सरकार राज्य घटनेच्या विरोधात काम करतंय, त्यावर कोर्ट निर्णय देत नाही. बेकायदेशीर सरकार कोर्टात जातं आणि जनतेचं आंदोलन चिरडण्यासाठी याचिका दाखल करतं, त्यावर तात्काळ निर्णय दिला जातो”, असं संजय राऊत म्हणाले.
‘महाराष्ट्रातील लेकी-सूनांच्या संरक्षणासाठी बंद’
यावेळी संजय राऊतांना शरद पवार यांनी बंद मागे घेण्याचं आवाहन केल्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली. ठीक आहे, हे जनता ठरवेल. हा बंद उत्सफूर्त आहे. जनतेचा भावना पाहून आम्ही त्या बंदला पाठिंबा दिला. आता जनतेने ठरवायचं आहे. हा बंद कुणाच्या खाजगी कामांसाठी बंद नाही. महाराष्ट्रातील लेकी-सूनांच्या संरक्षणासाठी बंद आहे, असे संजय राऊत म्हणाले.
काँग्रेसनेही पाठ फिरवली
मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर काँग्रेसनेदेखील उद्धव ठाकरे यांना पाठ दाखवली आहे. काँग्रेसनेदेखील कोर्टाच्या आदेशाचा मान ठेवू, असं म्हणत बंद मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. उद्या काळ्या फित्या बांधून शांततेत आंदोलन करु, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more