विशेष प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांना आज हेलिकॉप्टर हलकाव्याचा एकत्र अनुभव घ्यावा लागला. त्यामुळे दुसरे उपमुख्यमंत्री घाबरले होते. पण पहिल्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना धीर दिला आणि हेलकावे खात असलेले हेलिकॉप्टर सेफ लँड झाले!!
यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हेलिकॉप्टर प्रवासात काहीवेळा हेलकावे अनुभवले आहेत. पण आज, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रवास केल्यानंतर आलेला प्रवास अनुभव अजित पवारांनी सांगितला. गडचिरोली जिल्ह्याच्या वडलापेठ येथील सुरजागड इस्पात प्रा. लि. या आर्यरन स्पोंज उत्पादन करणाऱ्या कारखान्याचा भूमिपूजन सोहळा झाला. या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) एकाच हेलिकॉप्टरमधून पोहोचले होते.
अजित पवारांनी आपल्या भाषणात गडचिरोलीकडे येताना हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर पोटात गोळा आल्याचा प्रसंग सांगितला. गडचिरोली मागास दुर्गम भाग असला तरी निसर्गाने या भागाला भरभरुन दिले आहे. सुरजागड येथील खाणीत हजारो कोटी रुपयांचा लोह खनिज आहे. आधी लॉयड्स मेटल्सने काम सुरू केले आता सुरजागड इस्पात या कंपनीने कारखाना सुरु केला आहे. धर्मराव बाबा आत्राम यांचे खास कौतुक करतो, त्यांनी आपली वडिलोपार्जित दीडशे एकर जमीन या कारखान्यासाठी दिली आहे. तर, उर्वरित जागा कंपनीने खरेदी केल्याची माहिती अजित पवारांनी आपल्या भाषणात दिली. तसेच, हेलिकॉप्टरमध्ये बसून गडचिरोलीकडे येताना घडलेला प्रसंगही सांगितला.
अजित पवार म्हणाले :
तुम्हाला कल्पना नाही, भविष्यात किती मोठे बदल या भागात होतील. जेव्हा आम्ही येत होतो, खूप ढग होते. नागपुरातून उड्डाण केले तेव्हा बरे वाटत होते, मात्र गडचिरोलीजवळ आलो, हेलिकॉप्टर ढगात शिरले, तेव्हा माझ्या पोटात गोळा आला. मी इकडे तिकडे पाहत होतो. आम्ही सर्वजण घाबरलो होतो, मात्र देवेंद्र फडणवीस निवांत होते. त्यांना म्हणालो, पाहा आपण ढगात जात आहोत. तेव्हा फडणवीस म्हणाले घाबरु नका. माझे आजवर 6 अपघात झाले. पण मला मात्र कधीही काही झाले नाही. मी हेलिकॉप्टरला असलो तर कधीही काही होत नाही आणि तसेच झाले आम्ही सुखरूप लँड झालो, असा किस्सा अजित पवारांनी सांगितला. त्यावेळी, उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यानंतर, त्यांच्या पूर्वजांची पुण्याई आहे ही!!, असे अजित पवार म्हणाले.
लाडक्या बहिणींना आवाहन
रक्षा बंधनाच्या सुमारास जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे आपल्याला महाराष्ट्राच्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यात द्यायचे आहेत. त्यामुळे महिलांचे फॉर्म नीट भरून घ्या, असे आवाहनही अजित पवार यांनी गडचिरोलीतून केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App