राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून 1 महिना होत आला. निवडणूक आयोगाने शरदनिष्ठ आणि अजितनिष्ठ या दोन्ही राष्ट्रवादींना नोटीसा पाठवल्या. त्या नोटिसांना अद्याप उत्तरे न दिल्याने राष्ट्रवादीची झाकली मूठ सव्वा लाखाची आहे, असे मराठी माध्यमे म्हणतात. पण राष्ट्रवादीची ही झाकली मूठ सव्वा लाखाची नसून आमदारांच्या आकडेवारीनुसार फक्त 54 ची आहे!! आता त्यापैकी नेमके कोण कुठं??, हा सवाल समोर आला आहे!! तरीही 54 आमदारांच्या मर्यादित झाकल्या मुठीत राष्ट्रवादीचे नेते मात्र अजितदारांच्या मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पाहात आहेत!! Large scale confusion in NCP’s both factions, with limited 54 mlas ajit pawar supporters day dreaming chief ministership
राष्ट्रवादीत प्रचंड राजकीय संभ्रमावस्था आहे. राष्ट्रवादी खरंच फुटली आहे की नाही??, शरद पवारांचा अजित पवारांना छुपा अथवा उघड पाठिंबा आहे की नाही??, काका – पुतण्यांच्या असलेल्या किंवा नसलेल्या राजकीय संघर्षात आपण नेमकी कोणती भूमिका घ्यायची??, कोणाकडे वळायचे काय करायचे?? हे यक्षप्रश्न राष्ट्रवादीतल्या 54 आमदारांना पडले आहेत. यापैकी 30 – 32 आमदार अजित पवारांकडे, तर उरलेले 15 – 16 आमदार शरद पवारांकडे असल्याचे बोलले जाते.
पण त्यावर उघडपणे कोणीच काही बोलायला तयार नाही. कारण उद्या हे काका – पुतणे एक व्हायचे आणि आपली कंबख्ती ओढवायची ही भीती राष्ट्रवादीतल्या आमदारांना वाटते आहे.
कधी नव्हे, ते शरद पवारांच्या मूळ भूमिकेविषयीच राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये प्रचंड संभ्रम पसरला आहे. त्यामुळे विधिमंडळात शरदनिष्ठ गटाचे आमदार अजित पवारांना जाऊन भेटत आहेत. जयंत पाटील सुनील तटकरे यांना मिठी मारत आहेत आणि कधीतरी अजितदादांसारख्या कर्तृत्ववान माणसाला नेत्याला मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल, असा आशावाद प्रफुल्ल पटेल व्यक्त करत आहेत!!
83 वर्षांच्या योद्धाच्या पक्षात 54 वर्षाच्या योद्ध्या “गप्प” आहेत आणि 54 आमदारांमध्ये संशयकल्लोळ वाढतो आहे.
निधीसाठी अजितदादा आणि…
निधीसाठी अजितदादा आणि पुन्हा निवडून येण्यासाठी शरद पवार असा “मध्यम मार्ग” काढण्याचा काही आमदार प्रयत्न करत असल्याचे बोलले जाते. पण त्यांची गॅरंटी कोणीच घ्यायला आणि द्यायला तयार नाही. अजितदादांबरोबर गेलो, तर साधारण वर्षभरासाठी सत्तेची वळचण मिळेल आणि शरद पवारांबरोबर गेलो, तर अजितदादांचा कायमचा रोष ओढवून निधीचा तुटवडा भासेल ही भीती आमदारांना वाटते आहे. त्यामुळे अजितदादा आणि शरद पवार दोघेही अजून तरी आपापल्या आमदारांची संख्या उघडपणे सांगायला तयार नाहीत.
अजितदादांची सरकारला गरज नाही
तसेही अजितदादांच्या पाठिंब्याच्या बळावर शिंदे – फडणवीस सरकार उभेच नाही. कारण त्यांच्याकडे स्वतःचे 167 आमदारांचे बहुमत आहे. अजितदादांना त्यांनी एक्स्ट्रा खेळाडू म्हणून सत्तेच्या वळचणीला आणून बसवले आहे. लोकसभा निवडणुकीतल्या पुरवणी मतांच्या टक्केवारीची ती बेरीज आहे. याखेरीज भाजपच्या दृष्टीने अजितदादांच्या महायुतीतल्या एन्ट्रीला फारसे महत्त्व नाही.
राजकीय भवितव्याचा रस्ता आर्थर रोडकडे
त्या उलट अजितदादा आणि त्यांच्या समर्थकांसाठी मात्र आपल्या राजकीय भवितव्याचा रस्ता आर्थर रोडच्या दिशेने जाऊ नये, असा भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अर्थ आहे. त्यामुळे भाजप देईल ते गोड मानून अजित पवारांना राहावे लागत आहे. आता त्यासाठी अधून मधून आपल्या समर्थकांना खुश करताना प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे नेते अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची पुडीही सोडून देत आहेत. पण त्या महत्त्वाकांक्षेला सध्या राजकीय पुडीपेक्षा फारसे महत्त्व नाही.
शरदनिष्ठ आमदारांची कोंडी
पण त्यापलीकडे जाऊन पाहिले तर, निदान अजितदादा उघडपणे सत्तेच्या वळचणीला तरी येऊन बसले आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थक आमदारांना उघडपणे ते काही निधी देखील देऊ शकले आहेत. त्यावर शरदनिष्ठ गटाची फार मोठी कोंडी आणि कुचंबणा झाली आहे. निधीसाठी अजितदादांच्या तोंडाकडे पहावे लागते आणि त्यांच्या तोंडाकडे पाहिले की पवार डोळे वटारण्याची भीती वाटते, अशा कात्रीत शरदनिष्ठ आमदारांचा गट सापडला आहे. त्यामुळे मग सुनील तटकरे यांना मिठी मारण्याचा “मध्यम मार्ग” जयंत पाटलांसारखे नेते पत्करत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून शरदनिष्ठ गटाचे 8 – 10 आमदार अजितदादांना भेटूनही आले. तिथे काही डाळ शिजते का पाहून आले. पण त्या पलीकडे शरदनिष्ठ गटाची कोणतीही राजकीय हालचाल दिसत नाही. निवडणूक आयोगाने दिलेल्या नोटिशीवर शरद पवार नेमके काय उत्तर देणार??, याविषयी तर शरदनिष्ठ गटात कमालीचा संशय आणि संभ्रम आहे.
जयंत पाटलांवर शरदनिष्ठांचा भडीमार
शरदनिष्ठ आमदारांना या कायदेशीर लढाई विषयी काहीही माहिती नाही. पण शरद पवारांना ते थेट काही विचारू शकत नाहीत. मग निदान जयंत पाटलांना विचारू, असे म्हणत शरदनिष्ठ आमदारांनी जयंत पाटलांवर प्रश्नांचा भडीमार केला. तो चुकवताना जयंत पाटलांच्या नाकीनऊ आले, अशी चर्चा विधिमंडळाच्या लॉबीत रंगली.
चाणक्यांची झाकली मूठ घटली!!
पण राष्ट्रवादीच्या चाणक्यांची झाकली मूठ मराठी माध्यमे नेहमी सव्वा लाखाची ठेवायचे, पण आता ती फक्त 54 आमदारांपुरती उरली आहे आणि त्यातले नेमके कुठे कोण हेच कोणाला समजेनासे झाले आहे आणि तरीही राष्ट्रवादीतले आमदार 54 आमदारांच्या झाकल्या मुठीच्या बळावर अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहत आहेत, ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय विसंगती आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more