विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर हुरूप वाढलेल्या महाविकास आघाडीत अद्याप जागा वाटपाचा नेमका फॉर्म्युला ठरेलेला नाही, पण जितेंद्र आव्हाड यांनी मात्र शिवसेनाच मोठा भाऊ आहे असे सांगून त्या पक्षाचा काँग्रेसशी कलगीतुरा लावून दिला.
महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक हॉटेल ट्रायडेंटमध्ये पार पडली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यातली थोडी माहिती पत्रकारांना सांगितली. त्यावेळी त्यांनी मुंबई पुरता शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा लागला. वास्तविक जितेंद्र आव्हाडांचा सध्याचा पक्ष म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईत फक्त 6 जागा लढवणार आहे. जागावाटपाचा खरा संघर्ष काँग्रेस आणि शिवसेनेतच आहे. पवारांची राष्ट्रवादी मुंबई, ठाणे पट्ट्यामध्ये महाविकास आघाडीतला तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, पण त्या पक्षाच्या जितेंद्र आव्हाड यांनी मात्र मोठा भाऊ – छोटा भाऊ असला वाद काँग्रेस आणि शिवसेनेत लावून देत कळ लावली आहे.
Nepal : ४० भारतीय प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली, १४ जणांचे मृतदेह बाहेर काढले
मुंबईतल्या विधानसभेच्या 36 जागांसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. 36 जागांपैकी 20 ते 22 जागांसाठी ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे काँग्रेस 13 ते 15, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने 5 ते 7 जागांवर दावा केल्याची माहिती आहे. पण या रस्सीखेचीत मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ असेल, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केले. त्यामुळे काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले.
मुंबईतल्या जागावाटपात चांदिवली आणि वांद्रे पूर्व या जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. चांदिवलीतून शिवसेनेकडून दिलीप लांडे निवडून आले होते. मात्र ते नंतर शिवसेना शिंदे गटात गेले. तेव्हा चांदिवलीच्या जागेवर काँग्रेसचे नेते नसीम खान लढण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे वांद्रे पूर्वचे काँग्रेसचे विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी अजित पवारांसोबत जाण्याची शक्यता आहे. तेव्हा वांद्रे पूर्वमधून ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
पण जागावाटपाच्या या सगळ्या वाटाघाटी शिवसेना आणि काँग्रेस यांच्या मधल्या आहेत. कारण या दोन्ही पक्षांची मुंबईत खरी ताकद आहे. पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईत फारशी ताकदच नाही, तरी देखील जितेंद्र आव्हाड्यांनी मुंबई पुरता शिवसेनाच मोठा भाऊ म्हणत काँग्रेस आणि शिवसेनेत काडी टाकून दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more