विशेष प्रतिनिधी
मुंबई : Vinod Tawde भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी बुधवारी नालासोपारा येथे घडलेल्या घटनेमागे कोणतेही कट कारस्थान नसल्याचा दावा केला आहे. काल मी नालासोपारा येथे जाणार असल्याची माहिती भाजपच्या कोणत्याही नेत्याला नव्हती. मी अचानक तिथे गेलो होतो. त्यामुळे त्या घटनेमागे काही कारस्थान असल्याचा आरोप चुकीचा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.Vinod Tawde
विनोद तावडे यांना मंगळवारी विरार पूर्वच्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये कथितपणे पैसे वाटताना पकडण्यात आले होते. त्यानंतर खासदार संजय राऊत यांच्यासह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ही घटना भाजपच्याच अंतर्गत राजकारणातून घडल्याचा दावा केला होता. तसेच या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला होता. या पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांनी बुधवारी आपला मताधिकार बजावल्यानंतर आपली बाजू स्पष्ट केली.
मी केवळ चहा घेण्यासाठी गेलो होतो
विनोद तावडे म्हणाले, मी नालासोपारा इथे जाणार हे भाजपमधील कोणत्याच नेत्याला ठावूक नव्हते. कारण, वाड्याहून परत येताना मी उमेदवार राजन नाईक यांना फोन केला. त्यांच्याकडून मतदारसंघातील स्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी मी कार्यकर्त्यांसोबत असल्याचे सांगितले. तसेच मला चहासाठी येण्याचीही विनंती केली. मला वाटले तिथे 10-12 जण असतील असा विचार करून तिथे गेलो.
त्यामुळे यात कुणाचेही कट कारस्थान नाही. आपसातील वाद नाही किंवा इतर कोणतेही कारण नाही. माझ्या मते, विरोधी पक्षांना आपला पराभव डोळ्यापुढे दिसत असल्यामुळे त्यांनी एका राजकीय घटनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. पोलिस किंवा निवडणूक आयोगाला काहीच मिळाले नाही. त्यानंतरही असे म्हणणे हे चुकीचे आहे. माझ्याकडे एक पैसाही सापडला नाही. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले.
शरद पवारांचे मानले आभार
विनोद तावडे यांनी यावेळी आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल शरद पवारांचेही आभार मानले. शरद पवार एक समंजस नेते आहेत. ते खूप ज्येष्ठ आहेत. ते मला खूप जवळून ओळखतात. त्यामुळे असा प्रकार मी करू शकत नाही हे त्यांना चांगलेच ठावूक आहे, असे ते म्हणाले.
संजय राऊतांच्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या कॅशकांडामागे राज्याचे गृहमंत्री अर्थात देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप केला आहे. याविषयी पत्रकारांनी पुन्हा एकदा विनोद तावडे यांना छेडले असता त्यांनी संजय राऊत खोटे बोलत असल्याचा दावा केला. संजय राऊत खोटे बोलत आहे. चुकीचा दावा करत आहेत. मी तिथे जाणार आहे हे केवळ मलाच माहिती होते. केवळ 2 मिनिटांत हा कार्यक्रम ठरला होता. माझे तिथे जाणे अचानक झाले. त्यामुळे या आरोपांत कोणतेही तथ्य नाही, असे तावडे म्हणाले.
नाना पटोले – सुप्रिया सुळेंच्या ध्वनिफितीवर भाष्य
विनोद तावडे यांनी यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीत बिटकॉईन वाटपाच्या मुद्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, माझ्या मते ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत, त्या ऑथेंटिक गोष्टी आमच्या सुधांशू त्रिवेदी यांनी सांगितल्या आहेत. सुधांशु त्रिवेदी ठोस माहिती असल्याशिवाय पत्रकार परिषद घेत नाहीत. सुप्रिया सुळे यांनी आपले म्हणणे मांडले आहे. त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. पुढे चौकशी होईल व त्यातून वस्तुस्थितीही समोर येईल.
सुप्रिया सुळे यांनी काल माझ्याविषयी काल माझ्याकडे 5 कोटी असल्याचे खोटे विधान केले. परंतु माझ्याकडे एक पैसा मिळाला नाही. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी माझे 5 कोटी मला परत करावे, असेही विनोद तावडे यावेळी बोलताना म्हणाले.
आता पाहू काय आहे बिटकॉईनचे प्रकरण
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांच्या आरोपाने खळबळ उडाली. रवींद्र पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीत परकीय चलन वापरल्याचा व अनेक आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप केला. भाजपा खासदार व प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री एका पत्रकार परिषदेमध्ये हा आरोप केला. तसेच यासंबंधीची कॉल रेकॉर्डिंग व व्हॉट्सएप चॅट्सचे स्क्रीनशॉटही दाखवले. भाजपाच्या या आरोपांनंतर सुप्रिया सुळेंनी आपल्यावरील आरोप फेटाळलेत. शरद पवारांनीही हे आरोप जोरकसपणे फेटाळून लावलेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App