विशेष प्रतिनिधी
नाशिक : लाडक्या बहिणी बरोबरच लाडक्या भावाची देखील राज्य सरकारने काळजी घेतली असून आता आमच्या शेतकरी भावांना वीज बिल भरण्याची आवश्यकता नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी केला आहे. यापुढे शेतकऱ्यांना वीज बिल भरावे लागणार नाही. कनेक्शन कापण्यासाठी वायरमन आला तर त्याला अजितदादांनी सांगितले असे सांगा, असे म्हणत अजित पवार यांनी लाडक्या बहिणी बरोबरच लाडक्या भावांना देखील साद घातली आहे.
राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर लाडक्या भावाला काहीच मिळाले नसल्याची टीका विरोधकांनी केली होती. मात्र, विरोधकांच्या या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही लाडक्या भावांसाठीदेखील योजना सुरू केली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता शेतीचे वीज बिल भरावे लागणार नाही, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. राज्य सरकारच्या सौरपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना वीजेवर अवलंबून राहावे लागणार नसल्याचे ते म्हणाले. सौर ऊर्जेच्या माध्यमातून एकही पैसा न भरता सौर पंपाचा वापर करून आता शेतीला पाणी देणे शक्य होणार आहे, असेदेखील अजित पवार यांनी म्हटले आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
.कुठे बचत करून योजनांना पैसा देता येतो, हे मला माहिती – अजित पवार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काढली आहे. या यात्रेची सुरुवात आज नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून झाली आहे. या वेळी त्यांनी मार्गदर्शन करताना लाडक्या बहिणी आणि लाडका भाऊ दोघांनाही त्यांनी साद घातली. मी दहा वर्ष राज्याचा अर्थमंत्री राहिलो आहे. मी दहा अर्थसंकल्प मांडले आहेत. त्यामुळे कुठे बचत करून योजनांना पैसा देता येतो, हे मला माहिती आहे. लाडकी बहीण योजना ही पुढील पाच वर्ष सुरू राहील, असेदेखील अजित पवार यांनी म्हटले.
बहिणींनी पैसे खर्च केल्यास बाजारपेठेला चांगला उठाव
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेचा पैसा 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जमा करणार आहे. या संदर्भातली माहिती देखील अजित पवार यांनी दिली. कालच मी सहा हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही करून आलो असल्याचे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. आतापर्यंत सव्वा कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या असून 17 तारखेपर्यंत आकडा दीड ते दोन कोटींवर जाईल, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. लाडक्या बहिणींनी पैसे खर्च केल्यास बाजारपेठेला चांगला उठाव मिळेल, असेही ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App