प्रतिनिधी
सातारा : Eknath Shinde नाशिक व रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी रायगड, तर दादा भुसे यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदावर दावा सांगितला आहे. यामुळे महायुतीत ताणतणाव सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्रिपदाची अपेक्षा ठेवण्यात काहीच वावगे नाही असे विधान करत अप्रत्यक्षपणे या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकत्वावर शिवसेनेचा दावा सांगितला आहे. यामुळे गोगावले व भुसे यांच्या भूमिकेला एकप्रकारे त्यांनी आपला पाठिंबाच दिला आहे.Eknath Shinde
नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाल्याचे चित्र आहे. पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली तेव्हा रायगडचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांच्यागडे गेले, तर नाशिकचे पालकमंत्रिपद भाजप नेते गिरीश महाजन यांना मिळाले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी या दोन्ही ठिकाणच्या पालकमंत्रिपदावर दावा सांगितल्यानंतर येथील पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती देण्यात आली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नाशिक, रायगडचा प्रश्न लवकरच सुटेल
एकनाथ शिंदे सोमवारी दरे या आपल्या मूळगावी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, नाशिक व रायगडच्या पालकमंत्रिपदावर लवकरच मार्ग निघेल. तुम्ही (पत्रकार) काहीही काळजी करू नका. तुम्हाला चिंता आहे. पण या सर्व चिंता व प्रश्न लगेच सुटतात. आम्हाला काहीच अडचण येत नाही. त्यातच आता नाशिक व रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगितीही देण्यात आली आहे. त्यामुळे यावर लवकरच योग्य तो निर्णय होईल.
पालकमंत्रिपदाची अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही
पत्रकारांनी यावेळी त्यांना महायुतीत सर्वकाही चांगले आहे का? असा थेट प्रश्न त्यांना केला असता एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्हाला असा प्रश्न का पडतो? निवडणुकीपासून सातत्याने तुम्हाला असे प्रश्न पडत आलेत. पण तिकीट वाटपापासून ते आतापर्यंत सर्व प्रश्न सुटत गेले. मंत्रिमंडळाचा व आता पालकमंत्रिपदाचा प्रश्नही लवकरच सुटेल. भरत गोगावले यांनी नाराजी स्पष्ट केली असली तरी पालकमंत्रिपदाची अपेक्षा ठेवण्यात गैर काय? त्यांनी अनेक वर्षांपासून रायगडमध्ये काम केले आहे. त्यामुळे त्यांनी अशी अपेक्षा ठेवून मागणी करण्यात काहीही चुकीचे नाही.
मी नाराज नाही, कामासाठी गावी आलो
मी महायुतीमध्ये आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवारही आमच्यासोबत आहेत. आम्ही तिघे बसून यावर चर्चा करू. योग्य तो तोडगा काढू. आता मी काही कामानिमित्त माझ्या गावी आलो आहे. पण मी इकडे आलो की लगेच तिकडे माझ्या नाराजीची चर्चा सुरू होते. मी नाराज नाही. मी इथल्या विकासकामांसाठी येथे आलो आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App