विशेष प्रतिनिधी
मुंबई : Congress विधानसभेला पराभूत झालेल्या काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह उद्धवसेना, शरद पवार गटाविरुद्ध तुतारी फुंकली आहे. तुम्हा तिघांमुळेच आम्ही पराभूत झालो, असा सूर त्यांनी लावला आहे. स्वपक्षातील स्थानिक नेत्यांविरुद्धही त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. नागपूर मध्यचे उमेदवार बंटी शेळके यांनी तर पटोलेंना बदला अशी मागणी दिल्लीश्वर राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंकडे केली आहे.Congress
विधानसभेतील दणदणीत पराभवानंतर चिंतनासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवार, गुरुवारी मुंबईत बैठकीचे आयोजन केले होते. त्यात बुधवारी विजयी १६ आमदारांसह काही नेत्यांनी ईव्हीएमविरोधात सूर लावला होता. गुरुवारी पराभूत उमेदवारांच्या बैठकीत ईव्हीएमविरोधातील सूर काहीसा मावळून तो उद्धवसेना, शरद पवार गट आणि नाना पटोले या त्रिमूर्तीकडे वळाल्याचे दिसले.
पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसने १०१ जागा लढवल्या. त्यापैकी फक्त १६ जागांवर त्यांचे आमदार निवडून आले. या दारुण पराभवाचे पडसाद चिंतन बैठकीत उमटले. भाजप नेतृत्वाप्रमाणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी काम केले नसल्यानेच काँग्रेसच्या अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागल्याचा पाढा थेट पटोले यांच्यापुढेच वाचण्यात आला.
मित्रपक्षांची कुरघोडी
रायगड, पेण, पणवेल, उरण येथे शेकाप आणि उद्धवसेनेचे उमेदवार होते. तेथे पाठिंब्याचा निर्णय अखेरच्या क्षणापर्यंत घेतलाच नाही. अनेक जागांवर मित्रपक्षांनी कुरघोडी केली. अपेक्षित मदत केली नाही, असे पराभूतांचे म्हणणे होते.
आज महाराष्ट्र कार्यकारिणीत मोठ्या फेरबदलाची शक्यता
राहुल गांधींनी शुक्रवारी दिल्लीत बैठक आयोजित केली आहे. त्यात पटोले चिंतन अहवाल सादर करतील. या बैठकीनंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीत मोठ्या फेरबदलाची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.
५०% फिरकलेच नाही
सर्व पराभूतांनी म्हणजे ८५ जणांनी चिंतन बैठकीसाठी मुंबईत यावे, असा आदेश पटोले यांनी दिला होता. प्रत्यक्षात निम्मेच जण आले. त्यातही काही जण फक्त चेहरा दाखवून मुंबईतील इतर कामांसाठी निघून गेले.
सांगलीत बंडखोरांना समजावलेच नाही
लोकसभेला काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांनी उद्धवसेनेच्या चंद्रहार पाटील यांना पराभूत केले. तोच पॅटर्न राबवत काँग्रेसच्या जयश्री पाटील मैदानात उतरल्या होत्या. पण त्याचा फटका काँग्रेसचेच अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना बसला. जयश्री पाटील आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या खासदार विशाल पाटील यांना समजावून सांगण्यात काँग्रेसचे नेतृत्व कमी पडले, असे पृथ्वीराज म्हणाले. विशाल यांच्या विजयामध्ये माझा वाटा असूनही ते माझ्याविरुद्ध गेले. पक्षाने ६ वर्षांसाठी निलंबित केलेल्या त्यांच्या वहिनी जयश्री पाटील यांचा त्यांनी प्रचार करावा हे दुर्दैवी होते, असे पृथ्वीराज पाटील म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App