विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कधीही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार नाहीत. गेल्या वेळी झाले ते झाले. आता मात्र शरद पवार यांना सुप्रिया सुळे, नाना पटोले यांना मुख्यमंत्री करायचे आहे. उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्रिपदासाठी भाजपला सोडले. उद्धव ठाकरेंना तर भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतून मोकळे करतील, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली. त्यांनी बदलापूरच्या घटनेवरून विरोधी पक्षावर टीका केली.
उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे असल्याने ते दिल्लीत जाऊन हातपाय जोडत आहेत. शरद पवारसुद्धा उद्धव ठाकरेंना कंटाळले आहेत. भविष्यात शरद पवार यांनी मला मुख्यमंत्री केले नाही असेही उद्धव ठाकरे म्हणतील. काँग्रेसने दिल्लीतून ठाकरे यांना परत पाठवले. संजय राऊत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेचे नाव घेत आहेत. मात्र त्यांच्या शब्दाला आता महाविकास आघाडीत किंमत राहिली नाही, असे बावनकुळे म्हणाले.
हर्षवर्धन पाटील यांनी संयम ठेवावा हर्षवर्धन पाटील पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांनी संयम ठेवावा. समरजित घाटगे यांनी दावा केलेली जागा अजित पवार गटाकडे आहे. त्यामुळे त्यांची नाराजी आहे. मात्र ज्यांना थांबायचे नाही त्यांना आम्ही थांबवू शकत नाही, असेही बावनकुळे म्हणाले. महायुतीबाबत कितीही अपप्रचार केला तर जनतेला माहीत आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला, आता मात्र परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा महायुतीचे सरकार येईल, असेही ते म्हणाले.
नेत्यांचे रस्ते अडवले जात असल्याने पवारांना सुरक्षा
दरम्यान, शरद पवारांना केंद्र सरकारने दिलेल्या झेड प्लस सुरक्षेविषयी बावनकुळे म्हणाले की, शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याबाबत आम्हाला आदर आहे. त्यांच्याबाबत कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी त्यांना केंद्राने सुरक्षा दिली. मागील काही काळात अनेक जण नेत्यांचे रस्ते अडवत आहेत. रास्ता रोको करत आहेत. तेथे काही वेगळे होऊ नये, असे वाटत असल्याने पवारांना उच्च दर्जाची सुरक्षा दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App