वृत्तसंस्था
मुंबई : बदलापूरला झालेली घटना अत्यंत वाईट, हृदय हेलावणारी आहे. त्याचे कुणीच समर्थन करणार नाही. परंतु त्या घटनेच्या आधारे आंदोलनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखे फलक झळकवून जो राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न, सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला तो घृणास्पद आहे. अशा प्रकारचे किळसवाणे राजकारण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत कधीच पाहायला मिळाले नाही. त्याचवेळी हे आंदोलन राज्यभर न्यायचे, सरकारची प्रतिमा मलीन करत विधानसभेला राजकीय लाभ मिळवायचा अशा प्रकारचा महाविकास आघाडीतील नेत्यांचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर ( Praveen Darekar ) यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले की, संवेदनहीनतेने महाविकास आघाडीचे नेते वागताना दिसताहेत. म्हणूनच कोर्टाने योग्य अशी चपराक महाराष्ट्र बंदच्या संदर्भात त्यांना लगावली आहे. सरकारलाही याबाबत काळजी घेऊन जनतेच्या हिताची रक्षण करण्याची भुमिका घेण्यास सांगितलेय. अशा प्रकारच्या हीनावणाऱ्या प्रसंगांना राजकीय नौटंकी करणे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला व्यथित करणारी अशी भुमिका आहे.
तसेच झालेल्या प्रकाराबाबत जनतेच्या भावना निश्चितच तीव्र आहेत. त्याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. सरकारही त्याबाबत कडक कारवाई करतेय. आरोपीला अटकही केलीय. प्रकरण फास्ट ट्रॅकवर आणतेय. कठोरात कठोर कारवाई करून लवकरच फाशीची शिक्षा कशी होईल याचा सरकार प्रयत्न करतेय. तथापी या प्रसंगाचा राजकीय फायदा उठवावा असे जनतेला कधीच वाटत नाही, ते मान्यही नाही. मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रसंगाचे राजकारण करणे किळसवाणे आहे. हे जनतेचे आंदोलन नाही. राजकीय दृष्टिकोनातून सुरू असलेले आंदोलन आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांना साथ देणार नाही.
दरेकर पुढे म्हणाले की, संजय राऊत जे बोलतात ते एका साच्यातून असते. गद्दार, खोके, बेकायदेशीर सरकार त्यांची तीच टेप चालवताहेत. बेकायदेशीर सरकार आहे म्हणजे जो काही कारभार चालू आहे तो बेकायदेशीर आहे का? विकासाची कामे बेकायदेशीर आहेत का? लाडक्या बहिणींना आम्ही जो काही दिलासा देतोय ते बेकायदेशीर आहे का? हे संजय राऊत यांनी सांगावे. केवळ राजकीय नौटंकी करण्यासाठीच संजय राऊत अशा प्रकारची वक्तव्य करत असतात.
दरेकर पुढे म्हणाले की, शरद पवार यांची छुपी भुमिका असते. त्यांच्या मनात एक, पोटात एक आणि ओठावर वेगळेच असते. जेव्हा ते बोलतात आमच्या पक्षात मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण नाही तेव्हा त्यांच्या पक्षात कुणीतरी ठरलेला असतो. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन आले. त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ते म्हणताहेत तुमचा तरी जाहीर करा.त्यांना माहित आहे काँग्रेसमध्ये 8-10 जण इच्छुक आहेत. शरद पवार गटातही 3-4 जण इच्छुक आहेत. यांच्यात एकवाक्यता होणार नाही. त्यामुळे सातत्याने त्यांच्यात एकवाक्यता होऊ शकत नाही हे उद्धव ठाकरेंना दाखवून द्यायचे आहे त्यातून टाकलेला त्यांनी हा डाव असल्याचेही दरेकर म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App