विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकेकाळी शरद पवारांशी जवळीक असलेला उल्हासनगर मधला गुंड माफिया राजकारणी पप्पू कलानी याला पुन्हा शरदनिष्ठ गटाकडे ओढण्यासाठी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि त्याला शरदनिष्ठ गटात राखून ठेवण्यात यश मिळाल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत.After Pappu Kalani was released from prison on parole, NCP leader efforts
पप्पू कलानी तुरुंगातून पॅरोलवर सुटून आल्यानंतर जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी कलानी महालात जाऊन त्याची भेट घेतली. रोहित पवारांनीही नंतर तिथेच जाऊन कलानी कुटुंबीयांची भेट घेतली. ही फार मोठी मुत्सद्देगिरी रोहित पवारांनी दाखविल्याचे सांगत पप्पू कलानी शरदनिष्ठ गटाकडे कसा राहिला याचे वर्णन या बातम्यांमध्ये केले आहे.
पप्पू कलानी उल्हासनगर मधील विविध घोटाळ्यांमध्ये तुरुंगात सजा भोगत आहे. पण सध्या तो पॅरोलवर बाहेर आहे. कलानी कुटुंब उल्हासनगर मधल्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. पवारांशी त्याची फार जुनी जवळीक आहे. पवारांनीच मुख्यमंत्रीपदावर नेमलेले सुधाकरराव नाईक यांनी मात्र पप्पू कलानी वर कायद्याचा आसूड चालविला. त्यावेळी सुधाकरराव नाईक आणि शरद पवार यांच्या जोरदार राजकीय संघर्ष झाला होता. पण पप्पू कलानी वरच्या केसेस मागे घेतल्या गेल्या नाहीत.
मात्र, कलानी कुटुंब गेल्या पाच वर्षांपासून सत्ता आणि संरक्षणासाठी सत्ताधाऱ्यांच्या गोटात सहभागी झाले. त्यात हा विकास आघाडीची सत्ता असताना वर्षभरापूर्वी कलानी कुटुंब पुन्हा राष्ट्रवादीत स्वगृही परतले होते. पण राष्ट्रवादीतील फुटीनंतर कलानी गटाला तटस्थ भूमिका घ्यावी लागली.
पण पप्पू कलानींचे शरद पवारांसोबत असलेले जुने संबंध, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्या कलानी महलात होणाऱ्या भेटी आणि त्यानंतर नुकतीच रोहित पवार यांनी पप्पू कलानी यांची घेतलेली भेट पाहता आगामी निवडणुकांसाठी कलानी गटाचा कल शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडेच राहण्याची शक्यता आहे.
उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीची सत्ता असली तरी शहरातील राजकारणावर आणि सिंधी समुदायामध्ये आजही कलानी कुटुंबाचा करिष्मा कायम आहे. गेल्या पाच वर्षांत महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कलानी गटाने राष्ट्रवादीसोबत फारकत घेऊन भाजपला साथ देत महापौरपद मिळवले होते. मात्र, त्यानंतर भाजप आणि कलानी गटात झालेल्या राजकीय कुरघोड्यांनंतर कलानी गटाने शिवसेनेला पाठिंबा दिला अन् महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसवून भाजपपासून फारकत घेतली.
मात्र त्यानंतर लागू झालेल्या प्रशासकीय राजवटीच्या काळात कलानी गटाचा कल पुन्हा राष्ट्रवादीकडे वळला. या काळात पप्पू कलानी हे कारागृहातून पॅरोलवर बाहेर असल्याने जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांना डावलत कलानी कुटुंबाच्या निवासस्थानी भेट देत कलानी गटाला पुन्हा राष्ट्रवादीत, स्वगृही आणण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शहरातील एका गटाने अजित पवारांना पाठिंबा दर्शविला होता.
कलानी गटाने एकीकडे अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थिती लावली, तर काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या बैठकीला. त्यामुळे स्वतः पप्पू कलानीने तटस्थ भूमिका घेतली होती. मात्र गेल्या काही काळात कलानी गट हा जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
तसेच, पप्पू कलानी यांचे शरद पवारांशी असलेले जुने संबंध पाहता कलानी गटाचा कल शरदनिष्ठ राष्ट्रवादीकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. तोच गणेशोत्सवाचे निमित्त साधत आमदार रोहित पवार यांनी कलानी कुटुंबाच्या निवासस्थानी भेट देत पप्पू कलानी यांची भेट घेतली. त्यामुळे आगामी सर्वच निवडणुकांसाठी कलानी गटाचा कल शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडे असल्याची चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App