वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेतील ( America ) न्याय विभागाने इराणशी संबंधित एका पाकिस्तानी व्यक्तीला अमेरिकन नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतले आहे. त्याचा संबंध ट्रम्प ( Donald Trump )यांच्याशीही जोडला जात आहे. CNN ने न्यायालयाच्या कागदपत्रांचा हवाला देत म्हटले आहे की 46 वर्षीय आसिफ मर्चंटने 2020 मध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे सर्वोच्च कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अमेरिकन नेत्यांच्या हत्येचा कट रचला होता.
मर्चंटबद्दल असा दावा करण्यात आला आहे की, अमेरिकेला जाण्यापूर्वी तो अनेक दिवस इराणमध्ये राहिला होता. आपला प्लॅन अंमलात आणण्यासाठी तो यावर्षी एप्रिलमध्ये पाकिस्तानातून अमेरिकेत पोहोचला. येथे पोहोचल्यानंतर त्याने न्यूयॉर्कमध्ये किलरला हायर करण्याचा प्रयत्न केला.
एका अज्ञात व्यक्तीने मर्चंटबद्दल पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यूएस फेडरल कोर्टाने 16 जुलै रोजी त्याच्या अटकेचे आदेश दिले होते.
एफबीआयने मर्चंटचे इराणशी संबंध उघड केले
बीबीसीच्या म्हणण्यानुसार, एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर रे यांनी सांगितले की मर्चंट एका धोकादायक हत्येची योजना आखत होता, जे हाणून पाडण्यात आले. रे म्हणाले की मर्चंटचा थेट इराणशी संबंध आहे. इराणनेच त्याला अमेरिकन नेत्यांच्या हत्येसाठी पाठवले होते.
अहवालानुसार, न्यायालयाच्या कागदपत्रांमध्ये हा अयशस्वी कट कोणाच्या हत्येचा रचला गेला याचा उल्लेख नाही, परंतु अमेरिकन अधिकारी याचा संबंध ट्रम्प यांच्याशी जोडत आहेत. ही माहिती समोर आल्यानंतर अमेरिकन सरकारने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतर अधिकाऱ्यांची सुरक्षा वाढवली आहे.
रिपोर्टचा दावा- इराण ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचत आहे
13 जुलै रोजी पेनसिल्व्हेनियातील बटलर शहरात एका रॅलीला संबोधित करताना ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. यानंतर सीएनएनच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या हत्येसाठी इराणमध्ये कट रचला जात आहे.
मात्र, ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा इराणशी काही संबंध आहे की नाही, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, यानंतर ट्रम्प म्हणाले होते की, जर इराण कधीही त्यांना मारण्यात यशस्वी झाला तर अमेरिका त्याला संपवेल अशी आशा आहे. तो जगाच्या नकाशावरून पुसला जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more