विशेष प्रतिनिधी
पुणे : संपूर्ण स्मार्ट फोनवर चित्रीत झालेला पहिला मराठी सिनेमा घडविणारं ‘पाँडीचेरी’ २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पाँडीचेरी. दूरवर पसरलेले अथांग समुद्रकिनारे, फ्रेंच धाटणीची रंगीबेरंगी घरे आणि तेथील निसर्गसौंदर्य. कोणाही पर्यटकाला सहज भुरळ पडेल, असे हे रम्य ठिकाण. याच पाँडीचेरीमध्ये घडणार आहे आगळीवेगळी कथा. ‘गुलाबजाम’ सारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे सचिन कुंडलकर ‘पाँडीचेरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटात सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुळकर्णी, गौरव घाटणेकर, तन्मय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
पाँडीचेरी सारख्या सुंदर निसर्गरम्य शहरात घडणारी मराठी माणसाची गोष्ट आहे. नवीन पिढीच्या नात्याचे प्रतिनिधित्व करणारा हा सिनेमा असून विस्थापित झालेले लोक कोणत्या पध्दतीची नाती निर्माण करतात, यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. एकंदरच नात्याची आणि कुटुंबाची नवीन व्याख्या या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यात सई, वैभव आणि अमृता यांच्या नात्याचा नवीन प्रवास आपल्यासमोर उलगडणार आहे. या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा भारतातील पहिला चित्रपट आहे, जो संपूर्ण स्मार्ट फोनवर चित्रित करण्यात आला आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी आणि क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत या चित्रपटासाठी सचिन कुंडलकर यांनी तिहेरी भूमिका साकारली आहे, दिग्दर्शनासोबतच त्यांनी लेखनाची आणि निर्मात्याची धुराही सांभाळली आहे. याव्यतिरिक्त नील पटेलही या चित्रपटाचे निर्माता आहेत. मोह माया फिल्म्स आणि इंक टॅंक निर्मित हा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
‘पाँडीचेरी’बद्दल ‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’प्लॅनेट मराठी जगातील पहिले मराठी ओटीटी असून त्यावर पहिली थिएटर फिल्म ‘जून’ झळकली होती. आम्ही नेहमीच नवनवीन प्रयोग करण्याच्या प्रयत्नात असतो. असाच वेगळा प्रयोग ‘पाँडीचेरी’मध्येही करण्यात आला आहे. जी स्मार्ट फोनवर चित्रीत करून प्रदर्शित होणार आहे. अशा पध्दतीची ही पहिली फिचर फिल्म आहे. अत्यंत मोजक्या टीममध्ये केवळ एक महिन्यात एका उत्तम चित्रपटाची निर्मिती होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण ‘पाँडीचेरी’ आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. असाच एक वेगळा विषय, कथा आपल्याला ‘पाँडीचेरी’ मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अनेक जमेच्या बाजू आहेत. दिग्दर्शक, कथा, कलाकार आणि नैसर्गिक सौंदर्याने खुललेले नयनरम्य ‘पाँडीचेरी’. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल आणि याचा अनुभव आपल्या कुटुंबासह चित्रपटगृहातच घ्यावा.”
दिग्दर्शक सचिन कुंडलकर चित्रपटाबद्दल सांगतात, ”हा एक वेगळा विषय आहे. टिझरवरून हा चित्रपट लव्ह ट्रायंगल वाटत असला तरी चित्रपटाचा हा विषय अजिबात नाही. हा एक भावनिक प्रवास असून या तिघांच्या नात्याचा शेवट कुठे होतो, हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा संपूर्ण चित्रपट मोबाईलवर चित्रित करण्यात आल्याने साहजिकच यात भरपूर मोठा तांत्रिक फरक आहे. कुठेही त्याचा समतोल बिघडू नये, यासाठी काळजीपूर्वक चित्रीकरण करण्यात आले आहे. यात छायाचित्रणकार मिलिंद जोग यांचेही कसब दिसते. या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक अष्टपैलू कलाकार एकत्र आले आहेत. ही अनोखी भावनिक कथा प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.”
नाशिकहून सुरतला पोहोचा अवघ्या सव्वा तासांत; नितीन गडकरी यांच्याकडून महामार्गाबाबत माहिती
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App